भारतीय नोटांवर गणपती आणि लक्ष्मीचेही फोटो छापाः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची मागणी

नवी दिल्लीः भारतीय चलनी नोटांवर गणपती आणि लक्ष्मीचेही फोटो छापा, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. याबाबत आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असल्याचेही केजरीवाल म्हणाले. केजरीवाल यांनी केलेली ही मागणी हिंदुत्वाच्या राजकारणातील एक मोठी खेळी मानली जात आहे. बऱ्याच काळापासून अरविंद केजरीवाल हे सॉफ्ट हिंदुत्ववादी नेता म्हणून आपली प्रतीमा विकसित करण्याच्या प्रयत्नाला लागले होते. आज त्यांनी नोटांवर गणपती आणि लक्ष्मीचे फोटो छापण्याची मागणी करून हिंदुत्ववादी राजकारणाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकल्याचे मानले जात आहे.

 केजरीवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. दिवाळीच्या रात्री पूजा करताना हा विचार आपल्या मनात आला. अनेक लोकांशी आपली याबाबत चर्चा झाली. कोणीही त्यावर आक्षेप घेण्याचे कारण नाही, असे केजरीवाल म्हणाले. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत असल्याचा उल्लेख करत केजरीवाल यांनी देवी-देवतांचे आशीर्वाद असतील तरच प्रयत्नांना यश मिळते, असे ते म्हणाले.

 भारताची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी बरीचसी पावले उचलण्याची गरज आहे. परंतु सोबतच आम्हाला देवी-देवतांच्या आशीर्वादाचीही आवश्यकता आहे. जर भारतीय नोटांवर महात्मा गांधीजींचा फोटो सध्या आहे तसा एका बाजूला असावा आणि दुसऱ्या बाजूला गणपती आणि लक्ष्मीचे फोटो असावे. त्यामुळे संपूर्ण देशाला त्यांचा आशीर्वाद मिळेल, असे केजरीवाल म्हणाले.

इंडोनेशियात ८५ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या मुस्लिमांची आहे आणि दोन टक्क्यांहूनही कमी हिंदूंची लोकसंख्या आहे. तरीही इंडोनेशियाच्या नोटांवर गणपतीचा फोटो छापलेला आहे. केंद्र सरकारने या दिशेने पावले उचलली पाहिजे, असे केजरीवाल म्हणाले. सर्वच नोटा बदलल्या पाहिजे, अशी आपली मागणी नाही. मात्र आता ज्या नवीन नोटा छापल्या जातील, त्यावर गणपती आणि लक्ष्मीचे फोटो छापले पाहिजे, असे केजरीवाल म्हणाले.

केजरीवाल यांच्या या मागणीचा संबंध गुजरात विधानसभा निवडणुकीशी जोडला जात आहे. गुजरातमध्ये  लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. पंजाब विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यापासूनच अरविंद केजरीवाल हे सातत्याने गुजरातचे दौरे करू लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी ही मागणी केल्याचे मानले जात आहे.

हा यूटर्नचा प्रयत्न-भाजपः नोटांवर गणपती आणि लक्ष्मीचे फोटो छापण्याची अरविंद केजरीवाल यांनी केलेली मागणी हा हिंदुत्वाच्या मुद्यावर यू-टर्न घेण्याचा प्रयत्न आहे. अरविंद केजरीवाल हे राम मंदिराला विरोध करत आले आहेत. केजरीवाल सरकारमधील माजी मंत्री राजेंद्रपाल गौतम यांनी काही दिवसांपूर्वीच हिंदू देवी-देवतांच्या विरोधात टिप्पणी केली होती. त्यानंतरही केजरीवाल यांनी त्यांना पक्षातून काढून टाकले नाही, असे भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले. अरविंद केजरीवाल आज हिंदू बनण्याचा प्रयत्न करत असून हा यू-टर्नचा प्रयत्न आहे, असे पात्रा म्हणाले.

दोघे मिळून देशाला फसवत आहेत-पटोलेः चलनी नोटांवर गणपती आणि लक्ष्मीचे फोटो छापण्याच्या केजरीवालांच्या मागणीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मोदी सरकार आणि केजरीवाल हे दोघे मिळून देशाला फसवत आहेत. आपल्याला माहीत आहे की, देशाचा रुपया संपायला आलेला आहे. आज ज्या पद्धतीने रुपयाची घसरण सुरू आहे, ती वाचवणे गरजेचे आहे. ही मागणी ज्या व्यक्तीने केली आहे, ती व्यक्ती उच्चशिक्षित आहे. त्यांना या विषयाची जाण आहे. मात्र मतांच्या राजकारणासाठी या पद्धतीने मागणी करत धार्मिक वाद निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. मोदी सरकार आणि केजरीवाल दोघे मिळून देशवासियांची फसवणूक करत आहेत, असे पटोले म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!