आज काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार मल्लिकार्जुन खरगे, २०२४ ची निवडणूक हे मोठे आव्हान!


नवी दिल्लीः मल्लिकार्जुन खरगे हे बुधवारी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. खरगे यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शशी थरूर यांचा पराभव केला आहे. काँग्रेस पक्ष अनेक आव्हानांशी झुंज देत असतानाच्या परिस्थितीत खरगे यांच्याकडे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा आली आहे. खरगे यांच्या समोर २०२४ ची लोकसभा निवडणूक आणि अन्य राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवून देण्याचे मोठे आव्हान आहे. ८० वर्षीय खरगे हे गांधी कुटुंबाचे अत्यंत विश्वासू आहेत. खरगे अध्यक्ष झाल्यामुळे पक्ष मजबूत होईल, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे सोनिया गांधी अध्यक्ष असताना काँग्रेसला २००४ व २००९ च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला होता.

खरगे अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील तेव्हा काँग्रेसच्या मावळत्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी, निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसुदन मिस्त्री यांच्यासह काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते अकबर रोडस्थित काँग्रेसच्या मुख्यालयात हजर राहतील. पदभार स्वीकारण्यापूर्वी खरगे यांनी राजघाटावर जाऊन गांधीजींना आदरांजीली अर्पण केली. त्यानंतर ते माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे समाधीस्थळ विजय घाटावरही पोहोचले. तेथे आदरांजली अर्पण केल्यानंतर त्यांनी ‘जवान आणि किसान’च्या हिताचे रक्षण करण्याचा संकल्प केला.  त्यांनी माजी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवन राम यांच्याही समाधीस्थळी पुष्पांजली अर्पण केली.

https://twitter.com/INCIndia/status/1585103167816990721

 खरगे यांच्या समोर काँग्रेसला जिवंत करण्याचे मोठे आव्हान आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. २०२३ मध्ये देशातील १० राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झालेला आहे. त्यामुळे काँग्रेससमोर आता २०२४ ची निवडणूक म्हणजे करा किंवा मरा अशी आहे. अशा स्थितीत खरगे यांना राहुल गांधी यांच्याबरोबरच काँग्रेसचे अन्य पदाधिकारी, नेते व कार्यकर्ते यांच्यासोबत एकोप्याने पावले टाकत काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून द्यावा लागेल. त्याचबरोबर विरोधी पक्षांच्या नेत्यांशीही ताळमेळ राखत एक भक्कम आघाडी उभी करण्याचे आव्हानही खरगे यांच्यासमोर आहे.

सध्या काँग्रेस कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा काढत आहे. या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसला एकजूट करण्याचा राहुल गांधी यांचा प्रयत्न आहे. ३५७० किलोमीटर अंतर ही भारत जोडो यात्रा निघणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून अनेक राज्यांतील लोकांमध्ये पोहोचण्याचा काँग्रेस प्रयत्न करत आहे. जेव्हा ही यात्रा पूर्ण होईल तेव्हा पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह भरण्यात यशस्वी झाली का?, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

कोण आहेत खरगे?: मल्लिकार्जुन खरगे हे कसलेले राजकारणी आहेत. त्यांनी विद्यार्थी दशेपासनच राजकारणात पाऊल ठेवले आहे. ते १९६९ मध्ये पहिल्यांदा गुलबर्गा शहर काँग्रेसचे अध्यक्ष बनले होते. १९७२ मध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली  आणि जिंकली होती. त्यानंतर ते तब्बल ८ वेळा विधानसभेची निवडणूक जिंकले. ते लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी पक्षनेतेही राहिले आहेत.

 कर्नाटकचे मुख्यमंत्री बनण्याची खरगे यांची संधी तीन वेळा हुकली आहे. १९९९, २००४ आणि २०१३ मध्ये खरगे हे कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. परंतु ते मुख्यमंत्री बनू शकले नाहीत. या तिन्ही वेळी अनुक्रमे एस.एम. कृष्णा, धर्मसिंह आणि सिद्धारमैय्या यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागली. १९७६ मध्ये खरगे यांना पहिल्यांदा देवराज उर्स यांच्या सरकारमध्ये मंत्री करण्यात आले होते.

खरगे हे काँग्रेसच्या अनेक सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याची धुराही त्यांनी सांभाळलेली आहे. त्याशिवाय ते कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षही राहिले आहेत. २००९ मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक जिंकली आणि ते राष्ट्रीय राजकारणात आले. मनमोहनसिंग सरकारमध्ये त्यांनी कामगार मंत्रिपदाबरोबरच रेल्वे आणि सामाजिक न्याय मंत्रालयाचा पदभारही सांभाळला.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत खरगे यांचा पराभव झाला. खरगे यांच्या राजकीय जीवनातील हा पहिला पराभव ठरला. परंतु पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवले आणि ते राज्यसभेतील विरोधी पक्षनेते बनले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!