मंत्रालयातील चावीवाला आपला दोस्त, पाहिजे तेव्हा तिजोरी खोलतोः भाजप आमदाराचा खळबळजनक दावा; फडणवीसांचाही उल्लेख करत म्हणाले…


जळगावः मंत्रालयातील चावीवाला आपला दोस्त आहे. आपल्याला पाहिजे तेव्हा तिजोरी खोलतो आणि दणदणाट पैसे वाटतो, असा खळबळजनक दावा भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केला आहे. हा दावा करताना त्यांनी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडवणीस यांचाही उल्लेख केला आहे.

सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर चढला आहे. आरोप-प्रत्यारोप आणि दावे-प्रतिदावे करून मतदारांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न प्रत्येकच राजकीय पक्षाचे नेते आणि उमेदवारांकडून केला जात असतानाच काही जणांचा तोल सुटत आहे तर काही जण खळबळजनक विधाने करून वाद ओढवून घेत आहेत. चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी राज्याच्या तिजोरीबाबत असाच वादग्रस्त दावा केला आहे. त्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेतच चाळीसगावचे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी राज्याच्या तिजोरीबाबत अफलातून दावा केला आहे. हा दावा करताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्याही नावाचा उल्लेख केला आहे.

‘देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, सर्व सहकारी मंत्री यांच्याकडे मंत्रालयातील तिजोरीच्या चाव्या आहेत. तिजोरीच्या चावीवाला आपला दोस्त आहे. आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा तिजोरी खोलतो, दणदणाट पैसे वाटतो. एखाद्या गावाने निधी मागितला, तर मी नाही म्हणतच नाही कधी,’ असा दावा आमदार मंगेश चव्हाण यांनी केला आहे.

भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या या विधानामुळे लोकांच्या करातून मंत्रालयाच्या तिजोरीत जमा होणाऱ्या पैशांचा भाजपकडून कोणालाही हवा तसा वाटण्यासाठी वापर केला जातो का? आमदाराच्या हातात तिजोरीच्या चाव्या देणारा मंत्रालयातील तो चावीवाला कोण? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आता मंगेश चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे भाजपच्या हाती राज्याची तिजोरी सुरक्षित नसल्याची टिकाही विरोधकांकडून केली जाण्याची शक्यता आहे.

एकनाथ खडसे यांचे कट्टर राजकीय शत्रू अशी ओळख असलेले आमदार मंगेश चव्हाण यांना आता भाजपकडून सबुरीचा सल्ला दिला जातो की तो सल्ला दिल्या जाण्याच्या आधीच आमदार मंगेश चव्हाण यूटर्न घेत तसे बोलण्याचा माझा हेतू नव्हता, असे म्हणत सारवासारव करतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!