महाराष्ट्राप्रमाणेच तेलंगणातही ऑपरेशन लोटस?, टीआरएसच्या आमदारांना ५० कोटींची ऑफर, तिघे पोलिसांच्या ताब्यात


हैदराबादः महाराष्ट्रामध्ये सत्तांतर घडवून आणण्यासाठी आमदारांना ‘पन्नास खोके’  दिल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली असतानाच ही चर्चा थंडावत नाही तोच तेलंगणामध्येही महाराष्ट्राप्रमाणेच सत्तांतर घडवून आणण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप आहे. तेलंगणातील सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीच्या (टीआरएस) आमदारांनी पक्षांतर करावे यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर देण्यात आल्याचा आरोप टीआरएसने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका फार्म हाऊसवर धाड टाकून तिघांना ताब्यात घेतले आहे.

एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार तेलंगणा राष्ट्र समितीच्या चार आमदारांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी महत्वाच्या व्यक्तीला १०० कोटी आणि प्रत्येक आमदाराला ५० कोटींची ऑफर देण्यात आली. ज्या आमदारांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न झाला, त्यांनीच ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी  बुधवारी सायंकाळी अजीज नगर येथील फार्म हाऊसवर धाड टाकून तिघांना ताब्यात घेतले आहे. या आमदारांनी स्वतःच पोलिसांना फोन केला. पक्षांतरासाठी आपल्याला प्रलोभने दिली जात असल्याची तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली. पक्षांतरासाठी आपल्याला मोठी रक्कम आणि पदे देऊ केली जात आहे, अशी या आमदारांची तक्रार होती, अशी माहिती सायराबादचे पोलिस आयुक्त स्टीफन रविंद्र यांनी दिली.

पुढील काही महिन्यात तेलंगणा विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत टीआरएसची सरळ लढत भाजपशी आहे. विशेष म्हणजे ऑपरेशन लोटसवरून गेल्या काही दिवसांत दिल्ली आणि पंजाबच्या राजकारणात मोठे वादळ उठले होते. या राज्यातील सरकारांनी आपले सरकार पाडण्याचा भाजप नेते प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता.

सायराबादचे पोलिस आयुक्त स्टीफन रविंद्र यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या माहितीनुसार, टीआरएसच्या चार आमदारांनी बुधवारी सायंकाळी पोलिसांना फोन करून तक्रार केली होती की, त्यांना राजकीय पक्ष बदलण्यासाठी लाच देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मोइनाबादच्या अजीज नगर येथील एका फार्म हाऊसवर धाड टाकली.

या धाडीत फार्म हाऊसवर आमदारांना लाच देण्याचा प्रयत्न करत असलेले तीन लोक आढळून आले. या तीन लोकांमध्ये हरियाणातील फरीदाबादचे पुजारी सतीश शर्मा उर्फ रामचंद्र भारती, तिरूपती येथील श्रीमनाथ राजा पीठमचे पुजारी सिम्हैयाजी आणि व्यावसायिक नंदाकुमार यांचा समावेश आहे. आमदारांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी याबाबत कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. पुढील चौकशी सुरू आहे.

 या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या तिन्ही लोकांची पार्श्वभूमी तपासली जात आहे. हे तिन्ही लोक बनावट ओळखपत्रांच्या आधारे हैदराबादमध्ये आले होते, असेही स्टीफन रविंद्र म्हणाले. या चारही आमदारांना मोठी रक्कम देऊ करण्यात आली होती. मात्र या रकमेबाबत आताच काही सांगता येणार नाही, असे स्टीफन म्हणाले. सूत्रांच्या मते, महत्वाची भूमिका निभावणाऱ्या व्यक्तीस १०० कोटी रुपये तर प्रत्येक आमदाराला ५०-५० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. याबाबत टीआरएस प्रमुख व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (वायएसआर) यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.

 ज्या आमदारांनी पोलिसांकडे तक्रार केली त्यात गुववाला बलाराजू, बी. हर्षवर्धन रेड्डी, रेगा कांताराव आणि पायलट रोहित रेड्डी यांचा समावेश आहे. ज्या फार्म हाऊसवर लाच देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे, ते फार्म हाऊस आमदार रोहित रेड्डी यांच्या मालकीचे आहे.

 रामचंद्र भारती हा आरएसएसचा अत्यंत जवळचा आहे आणि तो केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक भाजप नेत्यांसोबत वावरताना दिसतो आहे. नंदा कुमार केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांच्या जवळचा आहे, असे द न्यू  इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

टीआरएस प्रमुख के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या पक्षाचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती केले होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत केसीआर राष्ट्रीय राजकारणात आपले स्थान बळकट करू पहात आहेत. त्या पार्श्वभूमीवर या ऑपरेशनकडे पाहिले जात आहे.

टीआरएसवर शिवसेनेचा प्रयोग?:  जून महिन्यातच महाराष्ट्रात मोठे राजकीय नाट्य घडले. सत्ताधारी शिवसेनेच्या ५५ पैकी तब्बल ४० आमदारांनी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली बंडखोरी केली. मोठ्या संख्येने शिवसेना आमदार- खासदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. तेव्हा शिवसेनेने ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून भाजपने आमचे आमदार फोडल्याचा आरोप केला होता. बंडखोरीसाठी या आमदारांना पन्नास खोके दिल्याचा आरोपही करण्यात आला होता. आता तोच प्रयोग तेलंगणात टीआरएसच्या आमदारांवर केला जात असल्याचा आरोप होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!