सांगा डॉ. फारूकी, अप्रामाणिकता आणि अनैतिकतेच्या कुबड्या घेऊन किती दिशाभूल करणार?; आचारसंहितेचे किती धिंडवडे काढणार?


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): मौलाना आझाद कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे ‘अनफिट’ प्राचार्य डॉ. मझहर फारूकी यांची नियमबाह्य नियुक्ती आणि शासकीय वैद्यकीय मंडळाने जारी केलेले फिटनेस प्रमाणपत्र सादर करण्यात त्यांनी केलेल्या बनवाबनवीचा भंडाफोड न्यूजटाऊनने पुराव्यानिशी केल्यामुळे डॉ. फारूकी यांचे पित्त खवळले असून त्यांनी न्यूजटाऊनला कायदेशीर नोटीस बजावली आहे. न्यूजटाऊनने खोटी आणि चुकीची माहिती प्रकाशित करून माझी बदनामी केली, असे एका नामांकित संस्थेच्या नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाच्या खुर्चीत बसलेल्या डॉ. फारूकी यांनी म्हटले आहे. परंतु न्यूजटाऊनने प्रकाशित केलेली नेमकी कोणती माहिती आणि कोणते पुरावे खोटे व चुकीचे आहेत, हे त्यांनी अधोरेखित केले नाही. मूळात डॉ. फारूकी यांनीच फेरनियुक्तीच्या प्रक्रियेपासूनच अप्रामाणिकता आणि अनैतिकतेच्या कुबड्या घेऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी प्राचार्यपदाच्या आचारसंहितेचेही धिंडवडे काढले आहेत. ते असे अजून किती दिवस करणार? हा न्यूजटाऊनचा त्यांना सवाल आहे.

ही कायदेशीर नोटीस बजावतानाही डॉ. मझहर फारूकी यांनी खोटारडेपणाचा आधार घेतला आहे. मौलाना आझाद एज्युकेशन सोसाटीने विहित प्रक्रिया पूर्ण करूनच आपली प्राचार्यपदी नियुक्ती केली. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर विहित प्रक्रियेचे पालन करून आणि पीअर रिव्ह्यू कमिटीच्या शिफारशीनुसार आपणाला आणखी पाच वर्षे मौलाना आझाद महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी मुदतवाढ दिली आहे, असा दावा डॉ. फारूकी यांनी केला आहे. तो धांदात खोटा आहे.  आपल्या नियुक्तीत काहीच बेकायदेशीर आणि अनियमितता नाही, असा खोटा दावाही डॉ. फारूकी यांनी या नोटिशीत केला.

हेही वाचाः ‘अनफिट’ डॉ. मझहर फारुकींची प्राचार्यपदी नियमबाह्य पुनर्नियुक्ती, आक्षेपावर तीन वर्षांपासून विद्यापीठाकडून शून्य कारवाई

वस्तुतः डॉ. मझहर फारूकी यांची मौलाना आझाद महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी दुसऱ्या टर्मसाठी झालेली नियुक्तीच नियमबाह्य आहे. महाराष्ट्र शासनाने ८ मार्च २०१९ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार जर व्यवस्थापनाचा विद्यमान प्राचार्यांची फेरनियुक्ती करण्याचा इरादा असेल तर व्यवस्थापनाला किमान सहा महिने आधी पीअर रिव्ह्यूची प्रक्रिया करावी लागेल, अशी स्पष्ट तरतूद करण्यात आलेली आहे. या तरतुदीला हरताळ फासूनच डॉ. मझहर फारूकी यांची प्राचार्यापदी फेरनियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचाः डॉ. मझहर फारूकींचे ‘फिटनेस’ वारंवार मागूनही ‘मौलाना आझाद’चा विद्यापीठाला ठेंगा, सेवासमाप्तीचा आदेशही केराच्या टोपलीत!

३१ ऑगस्ट २०२१ रोजी डॉ. मझहर फारूकी यांची प्राचार्यपदाची पहिली टर्म संपण्याच्या अवघे सहा दिवस आधी म्हणजे २६ ऑगस्ट २०२१ रोजी मौलाना आझाद एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापनाने विद्यापीठाकडे डॉ. फारूकी यांच्या फेरनियुक्तीचा प्रस्ताव पाठवला. त्याच दिवशी विद्यापीठाने कुलगुरू प्रतिनिधी दिला आणि २७ ऑगस्ट रोजी एक्स्टर्नल पीअर रिव्ह्यू कमिटीने डॉ. फारूकी यांच्या फेरनियुक्तीची शिफारस केली. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयात जर सहा महिने आधी पीअर रिव्ह्यूची प्रक्रिया सुरू करण्याचा घालून दिलेला दंडक मौलाना आझाद एज्युकेशन सोसायटीने पायदळी तुडवला. न्यूजटाऊनने प्रसिद्ध केलेल्या बातमीत तेच नमूद करण्यात आले आहे. मग सांगा डॉ. फारूकी यात खोटी आणि चुकीची कोणती माहिती आहे? तसे नसेल तर मग बदनामीचा प्रश्न येतोच कुठे?

नियमानुसार डॉ. मझहर फारूकी यांच्या प्राचार्यपदी फेरनियुक्तीची प्रक्रिया सहा महिने आधी करणे अनिवार्य होते. परंतु नियम धाब्यावर बसवून कार्यकाळ संपण्याच्या सहा दिवस आधी ही प्रक्रिया करण्यात आली. त्याचा हा घ्या पुरावा! सांगा डॉ. मझहर फारूकी, हा शासन निर्णय खोटा आहे का?

वस्तुस्थितीची खातरजमा करूनच खऱ्या कागदपत्रांच्या आदारे न्यूजटाऊनने सत्य, खऱ्या, बिनचूक बातम्या द्याव्यात असा शहाजोगपणाचा आव आणून डॉ. फारूकी यांनी या कायदेशीर नोटिशीत सल्ला दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने डॉ. मझहर फारूकी यांचे फिटनेस प्रमाणपत्र सादर करण्याबाबत मौलाना आझाद एज्युकेशन सोसायटीला वारंवार तोंडी आणि लेखी कळवले. २३ नोव्हेंबर २०२१, ३ जानेवारी २०२२ आणि १९ मार्च २०२२ रोजी विद्यापीठाने फिटनेस प्रमाणपत्र सादर करण्याबाबतचे निर्देश मौलाना आझाद एज्युकेशन सोसायटीला दिले.

हेही वाचाः विद्यापीठाने मागितले मेडिकल बोर्डाचे फिटनेस प्रमाणपत्र, डॉ. मझहर फारूकींनी चक्क ‘डिस्चार्ज सर्टिफिकेट’ सादर करून केली फसवणूक!

२१ मार्च २०२२ रोजी तर डॉ. फारूकी यांनी दहा दिवसात शासकीय वैद्यकीय मंडळाने जारी केलेले फिटनेस प्रमाणपत्र सादर केले नाही तर त्यांची सेवासमाप्त करा, असेही विद्यापीठाने बजावले होते. तरीही डॉ. फारूकी यांना फिटनेस प्रमाणपत्र सादर केलेच नाही. हा सगळा पत्रव्यवहार न्यूजटाऊनने चव्हाट्यावर आणला. सांगा डॉ. मझहर फारूकी विद्यापीठाने फिटनेस प्रमाणपत्रासाठी वेळोवेळी केलेला पत्रव्यवहार खोटा आहे का? न्यूजटाऊनने प्रसिद्ध केलेली ही कागदपत्रे खरी आणि वास्तविकच आहेत. खऱ्या कागदपत्रांचे पुरावे सादर करून न्यूजटाऊनने बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. मग सांगा डॉ. फारूकी यात तुमची बदनामी कशी झाली?  

हेही वाचाः  ‘कायदेशीरदृष्ट्या अंध’ डॉ. फारूकी अजूनही प्राचार्यपदी कार्यरत कसे?;  विद्यापीठ, उच्च शिक्षण संचालकांकडून कारवाई का नाही?

डॉ. मझहर फारूकी यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता असताना खातेमा कारक नूर मोहम्मद या अफगाणी विद्यार्थिनीला अनैतिक मार्गाचा अवलंब करून तिचा प्रवेश रद्द केलेला असतानाही तिचा परीक्षा फॉर्म भरून घेतला बेकायदेशीरपणे तिला बी. एस्सी. तृतीय वर्षाच्या पाचव्या आणि सहाव्या सेमिस्टरला परीक्षेला बसण्याची परवानगी दिली. विद्यापीठाच्या चौकशी समितीनेच डॉ. मझहर फारूकीच्या ‘चारसौ बीसी’चे बिंग फोडले. न्यूजटाऊनने हीच वस्तुस्थिती मांडली. सांगा डॉ. मझहर फारूकी, विद्यापीठाच्या चौकशी समितीने तुम्हाला दोषी ठरवले, यात खोटे काय आहे? ते जर खरे असेल तर तुमच्या बदनामीचा प्रश्न येतोच कुठे?

डॉ. फारूकी, माफी तर तुम्हीच मागायला हवी!

न्यूजटाऊनच्या चुकीच्या माहितीमुळे अनेक लोकांनी माझ्याशी संपर्क केला आणि त्या खोट्या बातम्यांबाबत चौकशी केली आणि त्यामुळे मला अत्यधिक पूर्वग्रह आणि सदभावना, प्रतिष्ठेची हानी झाली, असेही डॉ. फारूकी यांनी या नोटिशीत म्हटले आहे आणि तातडीने बिनशर्त माफी मागा आणि बातम्या छापणे बंद करा, असेही बजावले आहे.

न्यूजटाऊनने प्रकाशित केलेला शब्द न शब्द आणि प्रत्येक दस्तावेज खरा आहे. डॉ. फारूकी यांनी या नोटिशीत घेतला तसा खोटारडेपणाचा आधार अजिबात घेतलेला नाही. उलट डॉ. फारूकी यांनीच विद्यापीठाने शासकीय वैद्यकीय मंडळाचे फिटनेस प्रमाणपत्र सादर करण्यास बजावूनही घाटीतील नेत्ररोगतज्ज्ञाचे प्रमाणपत्र सादर करून विद्यापीठाचीच दिशाभूल आणि फसवणूक केली.

आवश्य वाचाः परदेशी विद्यार्थिनीच्या बेकायदेशीर पदवी प्रकरपणी ना फौजदारी गुन्हे, ना निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी!

महाराष्ट्र सरकारच्या ८ मार्च २०१९ च्या शासन निर्णयातच ‘कोड ऑफ प्रोफेशनल इथिक्स’  म्हणजेच व्यावसायिक आचारसंहिताही देण्यात आली आहे. प्राचार्यपदासाठी असलेल्या आचारसंहितेत ‘१. प्राचार्याने पारदर्शकता, निष्पक्षता, प्रामाणिकपणा, उच्च दर्जाची नैतिकता पाळावी आणि महाविद्यालयाच्या हिताचे निर्णय घ्यावे, २. समाजाला त्याच्याकडून अपेक्षित असलेले जबाबदार आचरण आणि वर्तन करावे, ३. व्यवसायाच्या प्रतिष्ठेशी सुसंगतपणे त्याच्या खासगी व्यवहारांचे व्यवस्थापन करावे, असे म्हटले आहे.

प्राचार्यपदाच्या खुर्चीत बसून डॉ. मझहर फारूकी यांनी फेरनियुक्ती मिळवण्यापासूनच अप्रमाणिकता आणि अनैतिकता दाखवून दिली आहे आणि या आचारसंहितेलाच हरताळ फासला आहे. त्यामुळे अशा अप्रामाणिक आणि अनैतिक मार्गाचा अवलंब करणाऱ्या प्राचार्याकडून समाजाने जबाबदार आचरण आणि वर्तनाची अपेक्षा तरी कशी ठेवायची? खरे तर या अप्रामाणिक आणि अनैतिकतेबद्दल डॉ. मझहर फारूकी यांनीच समाजाची जाहीरपणे माफी मागून पापक्षालन करायला हवे!

 Journalism without fear & Favor  असे ब्रीद घेऊन न्यूजटाऊन कोणाचीही भीडभाड न ठेवता तटस्थ आणि वस्तुनिष्ठ पत्रकारिता करते. न्यूजटाऊनची निष्ठा फक्त आणि फक्त संवैधानिक मूल्यांवर असल्यामुळे तुमच्यासारख्या अप्रमाणिक व्यक्तींनी नोटिशींचा धाक दाखवून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कितीही गळचेपी करण्याचा प्रयत्न केला तरी न्यूजटाऊन अशा प्रयत्नांना अजिबात भीक घालणार नाही, हे पक्के ध्यानात ठेवा!


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!