शासकीय कला महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांचा प्रतापः बोगस हजेरीपट बनवून विद्यार्थ्यांना मिळवून दिली परीक्षेला बसण्याची परवानगी


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे विहित मुदतीत प्रवेश झालेले नसताना आणि ते विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नियमांनुसार परीक्षेला बसण्यासाठी किमान ७५ टक्के हजेरीची अट पूर्ण करत नसतानाही या महाविद्यालयाच्या अधिष्ठात्याने  बोगस हजेरीपट तयार करून विद्यापीठाचीच दिशाभूल केली आणि त्या विद्यार्थ्यांना नियमित परीक्षेला बसण्याची परवानगी मिळवून दिल्याचा धक्कादायक प्रकार माहितीच्या अधिकारातून उघडकीस आला आहे.

किलेअर्क परिसरात असलेल्या शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयात बी.एफ. ए. आणि एम.एफ.ए. असे दोन अभ्यासक्रम शिकवले जातात. यापैकी बी.एफ.ए. अंतिम वर्षासाठी आरती विजयप्रकाश सिंग आणि अनिकेत विठ्ठल घाटगेकर या दोन विद्यार्थ्यांचे विहित मुदतीत प्रवेशच झाले नव्हते. यो दोन्ही विद्यार्थ्यांचे १ डिसेंबर २०२३ पर्यंत प्रवेशच झालेले नसताना हजेरीपटावर मात्र जुलै २०२३ पासून त्यांच्या नावांची नोंद आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने २४ ऑगस्ट २०२३ रोजी जारी केलेल्या पत्रानुसार सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची पात्रता आवेदने विहित शुल्कासह १० सप्टेंबर २०२३ पर्यंत दाखल करणे अनिवार्य होते. परंतु बी.एफ.ए. उपयोजित कला विभागातील अंतिम वर्षाचे विद्यार्थी आरती विजयप्रकाश सिंग आणि अनिकेत विठ्ठल घाटगेकर यांचे १ डिसेंबर २०२३ पर्यंत प्रवेशच झालेले नव्हते. तरीही या विद्यार्थ्यांना २ एप्रिल २०२४ पासून सुरू झालेल्या परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात आली आहे आणि हे दोन विद्यार्थी परीक्षाही देत आहेत.

प्रवेश कधी झाले? नोंदच नाही

सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयात बी.एफ. ए. उपयोजित कला अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला एकूण ३० विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या नावापुढे लिंग आणि प्रवेशाच्या तारखेची नोंद आहे. परंतु आरती विजयप्रकाश सिंग आणि अनिकेत विठ्ठल घाटगेकर या दोन विद्यार्थ्यांचे प्रवेश नेमके कोणत्या तारखेला झाले? याची कुठलीही नोंद महाविद्यालयाच्या दफ्तरी उपलब्ध नाही. महाविद्यालयाच्या अधिष्ठाता प्रा. रमेश वडजे यांच्या स्वाक्षरीनिशी पुरवण्यात आलेल्या माहितीत या दोन्ही विद्यार्थ्यांच्या नावापुढील प्रवेशाच्या तारखेचे रकाने रिकामेच आहेत.

महाविद्यालयाच्या हजेरीपटावर मात्र नोव्हेंबर २०२३ या दोन्ही विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या दिसतात. तरीही त्यांच्या प्रवेशाचे कोडे काही सुटत नाही. त्यामुळे हे दोन विद्यार्थी विद्यापीठाच्या नियमानुसार परीक्षेला बसण्यासाठी ७५ टक्के उपस्थितीची अनिवार्य अट कशी काय पूर्ण करू शकतात? हेही एक कोडेच आहे. तरीही शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा. रमेश वडजे यांनी या दोन विद्यार्थ्यांच्या परीक्षा आवेदनावर स्वाक्षऱ्या करून ती आवेदने विद्यापीठाकडे कशी पाठवली? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

बी.एफ.ए. उपयोजित कला या अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी आरती विजयप्रकाश सिंग आणि अनिकेत घाटगेकर या दोन विद्यार्थ्यांचे प्रवेश नेमके कधी झाले? याची कुठलीही नोंद महाविद्यालयाकडे नाही.

हजेरीपटच बोगस!

शासकीय कला आणि अभिकल्प महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे हजेरीपट बोगस असल्याची धक्कादायक माहितीही माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे. १ ऑक्टोबर २०२३ रोजी रविवार आणि २ ऑक्टोबर २०२३ रोजी म. गांधी जयंतीनिमित्त सार्वजनिक सुटीच्या दिवशीही या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हजेरीपटावर स्वाक्षऱ्या ठोकल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे. सार्वजनिक सुटीच्या दिवशीही हजेरीपटावर असलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्यांमुळे या महाविद्यालयातील वर्ग शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना घाऊकपणे एका दिवशी बोलावून घेतात आणि हजेरीपटावर स्वाक्षऱ्या घेतात, असाच अर्थ त्यातून निघतो. हे बोगस हजेरीपट भरताना किमान सार्वजनिक सुटीच्या दिवसाचेही भान न ठेवल्यामुळे या महाविद्यालयातील बनवेगिरी उघडकीस आली आहे.

चोर चोरी करतो, परंतु मागे पुरावे सोडून जातो आणि अडकतो, तसाच काहीसा प्रकार शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे बोगस हजेरीपट तयार करताना झाला. १ ऑक्टोबर २०२३ रोजी रविवार आणि २ ऑक्टोबरला गांधी जयंतीची सार्वजनिक सुटी असतानाही हजेरीपटावर विद्यार्थ्यांनी स्वाक्षऱ्या ठोकल्या आणि ही बनवेगिरी उघडकीस आली.

प्र-कुलगुरूंकडे तक्रार

शासकीय कला आणि अभिकल्प महाविद्यालयात सुरू असलेल्या बनवेगिरीचा माहितीच्या अधिकारातून पर्दाफाश झाल्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) कार्यकर्ते बॉबी कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. विहित मुदतीत प्रवेश झालेले नसताना आणि परीक्षेला बसण्यासाठी ७५ टक्के हजेरीची अट पूर्ण करत नसतानाही आरती सिंग आणि अनिकेत घाटगेकर या दोन विद्यार्थ्यांना बी.एफ.ए. अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसू देणे, विद्यार्थ्यांचे बोगस हजेरीपट तयार करणे या सर्वच बाबींची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि महाविद्यालयाचे अधिष्ठाता रमेश वडजे यांच्यासह संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी तक्रारीत केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!