
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आता जवळपास सर्वच राजकीय पक्ष स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागलेले असतानाच आगामी महानगरपालिका निवडणुकीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये (औरंगाबाद) उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी महापौर नंदकुमार घोडेले हे ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवबंधन सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन निवडणुकीचे नियोजन करण्यास सुरूवात केली आहे. ही तयारी सुरू असतानाच आगामी महानगरपालिका निवडणुकीपर्वीच उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगरचे (औरंगाबाद) माजी महापौर नंदकुमार घोडेले हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आज प्रवेश करणार आहेत.
नंदकुमार घोडेले हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर घोडेले यांनी आज स्वतःच टीव्ही ९ शी बोलताना भूमिका मांडली.
‘जवळपास ३० वर्षांपासून शिवसेनेत काम करत आहे. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मागच्या काळात राज्यात ज्या प्रकारे काम झाले आहे, त्या कामामुळे प्रभावित होऊन आम्ही शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहोत,’ असे घोडेले म्हणाले.
‘उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्ववादी भूमिका सोडायला नको होती. काँग्रेस पक्षासोबत युती केल्यामुळे त्याचा फटका बसला. आता भविष्यात नागरिकांची कामे करायची असतील तर सत्तेसोबत असणे गरजेचे आहे. या भूमिकेतून आम्ही शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. ठाकरे गटातील कोणावरही माझी नाराजी नाही. शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यानंतर आणखी काम करण्याची संधी मिळेल,’ असेही घोडेले म्हणाले.
घोडेले यांच्या या निर्णयावर ठाकरे गटाकडून प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. माजी खासदार चंद्रकात खैरे यांनी घोडेले यांच्यावर टिकास्त्र सोडले. नंदकुमार घोडेले यांना शिवसेना ठाकरे गटाने छत्रपती संभाजीनगरचे (औरंगाबाद) महापौर केले होते. आता ते स्वार्थासाठी तिकडे गेले आहेत. शिंदे गटात जाऊन त्यांना काय मिळणार आहे? जो मानसन्मान इकडे होता, तो मानसन्मान त्यांना तिकडे मिळणार नाही, असे खैरे म्हणाले.
ठाकरे गटाचे आणखी एक नेते अंबादास दानवे यांनीही घोडेले यांच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. संघटना ही एक प्रक्रिया असते. त्यामुळे ही प्रक्रिया सुरू असते. जसे संघटनेतून बाहेर गेले तसे अनेक जण आलेलेही आहेत. काही लोकांना कमी वेळेत जास्त गोष्टी हव्या असतात. परंतु आतापर्यंत जी पदे मिळाली आहेत, त्याचाही विचार प्रत्येकाने केला पाहिजे, असे दानवे म्हणाले.
