
मुंबईः गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षित असलेल्या राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा आज राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन केली. मुंबई, ठाण्यासह राज्यातील २९ महानगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला. या २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. या २९ महानगरपालिकांच्या क्षेत्रात आजपासूनच निवडणूक आचारसंहिता लागू झालेली आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया ३१ जानेवारी २०२६ च्या आधी पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाला दिले होते. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यात राज्यातील नगरपालिका व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. या निवडणुकांचे निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर केले जाणार आहेत. आता राज्य निवडणूक आयोगाने दुसऱ्यात टप्प्यात राज्यातील २९ महानगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
असा असेल निवडणूक कार्यक्रम
- उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा कालावधीः २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५
- उमेदवारी अर्जांची छानणीः ३१ डिसेंबर २०२५
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदतः २ जानेवारी २०२६
- निवडणूक चिन्हांचे वाटप व अंतिम उमेदवार यादीः ३ जानेवारी २०२६
- मतदानः १५ जानेवारी २०२६
- मतमोजणी आणि निकालः १६ जानेवारी २०२६
कोणकोणत्या महानगरपालिकांच्या निवडणुका?
- मुंबई-एमएमआरडीए विभागः मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, भिवंडी, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, पनवेल.
- पश्चिम महाराष्ट्रः पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, इचलकरंजी.
- उत्तर महाराष्ट्रः नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, मालेगाव.
- मराठवाडाः छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड-वाघाळा, परभणी, जालना.
- विदर्भः नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर.
२९ पैकी २७ महानगरपालिकांची मुदत संपली
आज निवडणुका जाहीर करण्यात आलेल्या २९ महानगरपालिकांपैकी २७ महानगरपालिकांची मुदत संपलेली आहे. विशेष म्हणजे ५ महानगरपालिकांची मुदत २०२० मध्येच संपलेली होती. मुंबईसह १८ महानगरपालिकांची मुदत २०२२ मध्ये तर ४ महानगरपालिकांची मुदत २०२३ मध्ये संपली, अशी माहिती राज्य निवडणूक अधिकारी दिनेश वाघमारे यांनी दिली. मुदत संपलेल्या सर्व महानगरपालिकांवर प्रशासकराज सुरू आहे.
