शालार्थ आयडी घोटाळाः छत्रपती संभाजीनगर विभागातील ४ हजार ७५ शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता एसआयटीच्या रडारवर; संचिकांचा शोध, डिजिटायझेशन सुरू


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): राज्यभर गाजत असलेल्या शालेय शिक्षण विभागातील शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) आपला मोर्चा आता छत्रपती संभाजीनगर विभागाकडे वळवला असून २०१२ ते २०२४ या काळात शिक्षकांना देण्यात आलेल्या वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडीच्या संचिका झाडाझडतीसाठी तयार ठेवण्याचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर शिक्षण उपसंचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या पाच जिल्ह्यातील सुमारे ४ हजार ७५ शिक्षकांना देण्यात आलेल्या वैयक्तिक मान्यतेच्या संचिका आणि शालार्थ आयडीच्या संचिकांचा शोध घेऊन त्यांचे डिजिटायझेशन करण्यात येत आहे. एसआयटीने छत्रपती संभाजीनगर विभागाकडे आपला  मोर्चा वळवल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.

नागपूरच्या विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयांतर्गत २०१९ पासून सुमारे ५८० प्राथमिक, माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेचे आदेश तसेच शालार्थ आयडी प्रदान करण्याच्या आदेशांची कोणतीही शहानिशा न करताच बनावट शालार्थ आयडी प्रदान करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला  होता. या घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर पसरलेली असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकारने या घोटाळ्याची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली ७ ऑगस्ट २०२५ रोजी एसआयटीची स्थापना करण्यात आली. या एसआयटीमध्ये पोलिस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मनोज शर्मा आणि शिक्षण आयुक्तालयातील सहसंचालक हारूण आतार यांचा समावेश आहे.

हेही वाचाः बनावट शालार्थ आयडी घोटाळाः मराठवाड्यातील दोन जिल्ह्यांसह राज्यातील सहा जिल्हे एसआयटीच्या रडारवर, ‘या’ चार प्रमुख मुद्द्यावर होणार झाडाझडती!

ही एसआयटी राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या अनुदानित आणि अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडी मान्यता, सेवासातत्य आणि विनाअनुदानित पदावरून अनुदानित पदावर केलेल्या बदल्यांची झाडाझडती घेत आहे. २०१२ ते आजपर्यंतच्या सर्व प्रकरणांचा तपास एसआयटीमार्फत केला जात आहे.

हेही वाचाः बनावट शालार्थ आयडी घोटाळाः छत्रपती संभाजीनगर एसएससी बोर्डाच्या सचिव वैशाली जमादार पोलिसांच्या रडावर, परीक्षेचे कारण देत चौकशीला जाणे टाळले!

नागपूर व नाशिक विभागातील वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडीच्या संचिकांची झाडाझडती घेतल्यानंतर या एसआयटीने आपला मोर्चा आता मराठवाड्याकडे वळवला आहे. या संचिका तपासणीसाठी तयार ठेवून आठवडाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झाल्यानंतर शिक्षणाधिकारी कार्यालयांकडून २०१२ पासूनच्या वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आयडीच्या संचिकांचा शोध घेऊन पडताळणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. उपलब्ध संचिका तपासणीसाठी डिजिटल स्वरुपात उपलब्ध करून देण्याचे निर्देश असल्यामुळे उपलब्ध संचिकांतील प्रत्येक कागदपत्राचे स्कॅनिंग करण्यात येत आहे.

हेही वाचाः बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यात छत्रपती संभाजीनगर एसएससी बोर्डाच्या विभागीय सचिव वैशाली जमादार यांना अटक

एसआयटीचा फेरा येणार असल्यामुळे छत्रपती संभाजीनगर शिक्षण उपसंचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या सर्व शिक्षणाधिकारी कार्यालयांकडून संचिकांची पडताळणी करून नियमानुसार सर्व कागदपत्रे आहेत का? वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडी दिलेले शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची संख्या, मंजूर पदांची संख्या आणि त्यासंख्येनुसार संचिका उपलब्ध आहेत की नाही? याची पडताळणी केली जात आहे.

हेही वाचाः बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यात दोन शिक्षणाधिकाऱ्यांना अटक, १०० कोटींचा घोटाळा केल्याचा ठपका; नस्ती नसलेल्या राज्यभरातील शिक्षकांचीही चौकशी!

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या वैयक्तिक मान्यता प्रकरणाचे अनुदान टप्प्यानुसार, वर्षानुसार जिल्हानिहाय वर्गीकरणही केले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. छत्रपती संभाजीनगर शिक्षण उपसंचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात २०१२ पासून आजपर्यंत एकूण ४ हजार ७५ वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आयडी प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत.

हेही वाचाः शालार्थ आयडीप्रमाणेच ‘एचटीई-सेवार्थ’मध्येही घोटाळा?, बोगस नियुक्त्यांवर वेतन अनुदानाची उधळण; वाचा कन्नडच्या प्राचार्यांच्या नियुक्तीचे धक्कादायक प्रकरण

सध्या या सर्व प्रकरणांच्या संचिका संकलित करून त्यांची पडताळणी करण्यात येत असून उपलब्ध संचिकांचे डिजिटायझेशनही करण्यात येत आहे, असे सूत्रांनी सांगितले. या सर्व संचिकांची लवकरच एसआयटीमार्फत झाडाझडती घेण्यात येणार असल्यामुळे या घोटाळ्यात अडकलेले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि अधिकारी यांचे धाबे दणालले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!