
पुणेः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेतलेल्या माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (एचएससी) म्हणजेच इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के असून यंदाच्या निकालात ९६.७४ टक्के निकालासह कोकण विभागाने बाजी मारली आहे. सर्वात कमी ८९. ४६ टक्के निकाल लातूर विभागाचा लागला आहे. विशेष म्हणजे यंदाच्या परीक्षेत एकाही विद्यार्थ्याला १०० पैकी १०० टक्के गुण मिळालेले नाहीत.
यंदा पहिल्यांदाच मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, नऊ विभागीय मंडळांमधून १४ लाख २७ हजार ०८५ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १४ लाख १७ हजार ९६९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १३ लाख २ हजार ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची महाराष्ट्र राज्याची ही टक्केवारी ९१.८८ टक्के आहे. विशेष म्हणजे यंदा बारावी परीक्षेच्या निकालात मागच्या वर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. मागच्या वर्षी राज्याची निकालाची टक्केवारी ९३.३७ टक्के होती.
एकूण १५४ विषयांत बारावीची परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी ३७ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. म्हणजेच या विषयात परीक्षा देणारे सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातील १ हजार ९२९ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकालही १०० टक्के लागला आहे. राज्यातील ४ हजार ५६२ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल ९० ते ९९.९९ टक्के आहे. तर ३८ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. विशेष म्हणजे राज्यात यंदा एकाही विद्यार्थ्याला १०० पैकी १०० टक्के गुण मिळालेले नाहीत. दरवर्षी ७० ते ८० हून अधिक विद्यार्थी पैकीच्या पैकी गुण मिळवत आले आहेत. यंदाची परीक्षा त्याला अपवाद आहे.
विभागनिहाय निकालाची टक्केवारी
- कोकण विभागः ९६.७४ टक्के
- कोल्हापूर विभागः ९३.६४ टक्के
- मुंबई विभागः ९२.९३ टक्के
- छत्रपती संभाजीनगरः विभाग ९२.२४ टक्के
- अमरावती विभागः ९१.४३ टक्के
- पुणे विभागः ९१.३२ टक्के
- नाशिक विभागः ९१.३१ टक्के
- नागपूर विभागः ९०.६२ टक्के
- लातूर विभागः ८९. ४६ टक्के
लाडक्या लेकींचीच बाजी
यंदा इयत्ता बारावीच्या निकालातही लाडक्या लेकींनीच बाजी मारली आहे. यंदाच्या परीक्षेत मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५१ टक्के तर मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५८ टक्के आहे. म्हणजेच मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ५.०७ टक्क्यांनी जास्त आहे.
शाखानिहाय निकाल
विज्ञान शाखाः ९७.३५ टक्के
कला शाखाः ८०.५२ टक्के
वाणिज्य शाखाः ९२.६८ टक्के
व्यवसाय अभ्यासक्रमः ८३.२६ टक्के
आयटीआय शाखाः ८२.०३ टक्के
१२४ परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द
यंदाच्या परीक्षेत कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबवण्यात आले होते. तरीही काही परीक्षा केंद्रांवर कॉप्यांचे प्रकार आढळून आले. त्यामुळे कॉपी प्रकरणामुले राज्यातील १२४ परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. यंदाच्या परीक्षेत गैरमार्गाचा अवलंब करण्याचे प्रकार कमी झाल्याचा दावा बोर्डाने केला आहे. योग्य पद्धतीने प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका पोहोचवण्याची उत्तम सोय करण्यात आली होती, असा दावाही बोर्डाने केला आहे.
कुठे पहायचा निकाल?
इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी बोर्डाने अधिकृत संकेतस्थळे जाहीर केली आहेत. त्यानुसार खालील संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना ५ मे रोजी दुपारी १ वाजेनंतर त्यांचे निकाल पाहता येतील. ती संकेतस्थळे अशीः
विद्यार्थ्यांना या अधिकृत संकेतस्थळांवर त्यांचा निकाल पाहता येईल. विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका https://www.digilocker.gov.in/ येथे उपलब्ध करून देण्यात येणार असून येथे लॉग-इन करून त्यांना उत्तरपत्रिकेची प्रिंटआऊट काढता येईल तर महाविद्यालयांना एकत्रित निकाल https://www.mahahsscboard.in/ या संकेतस्थळावर त्यांच्या लाग-इनमध्ये पाहता येईल.
गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकन कसे कराल?
इयत्ता १२ वीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ६ मे ते २० मे २०२५ या कालावधीत स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने मिळवलेल्या गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळांकडे ऑनलाइन पद्धतीने बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरून स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करता येतील. अर्ज करताना डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/ यूपीआय/ नेट बँकिंगद्वारे शुल्काचा भरणा करावा लागेल.
पुनर्मूल्यांकनासाठी यंदा ‘ही’ अट
- ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करावयाचे आहे, त्यांच्यासाठी बोर्डाने यंदा एक अट घातली आहे. फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या म्हणजेच इयत्ता १२ वी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करण्यासाठी आधी उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.
- उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामकाजाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विहित नमुन्यातील अर्ज आणि विहित शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल. म्हणजेच उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स प्रती मिळाल्याशिवाय पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येणार नाही.
