MHT CET-2025:  पीसीएम गटाच्या परीक्षेत तांत्रिक त्रुटींचा परीक्षार्थ्यांना मनःस्ताप, ५ मे रोजी होणार २७ हजार ८३७ परीक्षार्थ्यांची फेरपरीक्षा


मुंबई: राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून २७ एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी२०२५ (पीसीएम गट) सामाईक प्रवेश परीक्षेच्या सकाळच्या सत्रामध्ये घेण्यात आलेल्या इंग्रजी माध्यमाच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील तांत्रिक त्रुटींचा मनःस्ताप परीक्षार्थ्यांनाच सहन करावा लागणार असून या विषयाची फेरपरीक्षा ५ मे रोजी घेण्याचे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे.

 एमएचटी-सीईटी२०२५ (पीसीएम गट) सामाईक प्रवेश परीक्षेच्या सकाळच्या सत्रामध्ये इंग्रजी माध्यमातील गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तांत्रिक त्रुटी संदर्भात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे अनेक विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या. या तक्रारींची तातडीने दखल घेऊन या विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. त्यामुळे या सत्रातील सर्व उमेदवारांसाठी फेरपरीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही फेरपरीक्षा ५ मे रोजी होणार आहे, अशी माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने दिली आहे.

यावर्षी एमएचटी-सीईटी पीसीएम गटाची परीक्षा १९ ते २७ एप्रिलदरम्यान १५ सत्रांमध्ये १९७ परीक्षा केंद्रांवर पार पडली. एकूण ४ लाख ६४ हजार २६३ परीक्षार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी ४ लाख २५ हजार ५४८ उमेदवारांनी परीक्षा दिली.

२७ एप्रिलच्या सकाळी घेतलेल्या सत्रात इंग्रजी, मराठी व उर्दू माध्यमांतून एकूण २७ हजार ८३७ उमेदवारांनी परीक्षा दिली होती. परीक्षेनंतर काही उमेदवार आणि पालकांनी इंग्रजी माध्यमातील गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तांत्रिक त्रुटी असल्याबाबत तक्रारी केल्या होत्या . त्या अनुषंगाने राज्य सीईटी कक्षाने  तज्ञांमार्फत प्रश्नपत्रिकेची पडताळणी केली असता २१ प्रश्नांमध्ये तांत्रिक त्रुटी असल्याचे आढळून आले.

ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून २७ हजार ८३७ उमेदवारांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित उमेदवारांनी अधिकृत www.mahacet.org या वेबसाइटवर भेट देऊन अद्ययावत माहितीची नोंद घ्यावी, असे आवाहन सीईटी कक्षाकडून करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!