
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील डीएमआयसीच्या ऑरिक हॉल बिल्डिंगमध्ये कार्यालय थाटण्यासाठी सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सवलतीच्या दरात म्हणजेच २५ रुपये प्रतिचौरस फूट दराने भाड्याने जागा उपलब्ध करुन देण्याबाबतची मागणी मान्य करण्यात आली असून याबाबत महाराष्ट्र इंडस्ट्रिय टाऊनशिप लिमिटेडच्या (एमआयटीएल) वतीने परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल हे उद्योजकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते. त्यावेळी शेंद्रा येथील ऑरिक हॉल बिल्डिंगमध्ये पार पडलेल्या बैठकीत उपस्थित विविध औद्योगिक संघटनांनी ऑरिक हॉल बिल्डिंगमध्ये ५० रुपये प्रतिचौरस फूट दराऐवजी २५ रुपये प्रतिचौरस फूट दराने कार्यालयासाठी जागा भाड्याने उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
उद्योजकांच् या मागणीबाबत या सकारात्मक निर्णय घेण्याच्या सूचना गोयल यांनी महाराष्ट्र इंडस्ट्रिय टाऊनशिप लिमिटेडला केल्या होत्या. त्यानुसार महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेडने (एमआयटीएल) ऑरिक हॉल बिल्डिंगमध्ये कार्यालय थाटण्यासाठी ५० रुपयांऐवजी २५ प्रतिचौरस फूट दराने जागा भाड्याने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) उद्योजकांच्या हितासाठी घेण्यात आला आहे.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) उद्योजक उद्योग उभारण्यासाठी भूखंड खरेदी करतात व सदर भूखंडावर उद्योग उभारण्यासाठी काही कालावधी लागतो अशा कालावधीत त्यांना त्यांचे कार्यालय सुरू करण्यासाठी कमी दराने जागा उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीत शेंद्रा येथील ऑरिक हॉल बिल्डिंगमध्ये २५ रुपये प्रतिचौरस फूट या सवलतीच्या दराने सर्व सोईयुक्त जागा भाड्याने सहज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे उद्योजकांस उद्योग उभारणीस मदत होईल, असे एमआयटीएलने म्हटले आहे.

