पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत पोस्ट केल्यामुळे लखनऊ विद्यापीठाच्या प्राध्यापिकेवर देशद्रोहाचा गुन्हा, वाचा नेमके काय आहे प्रकरण?


लखनऊः पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे उत्तर प्रदेश पोलिसांनी लखऊन विद्यापीठाच्या भाषाशास्त्र विभागाच्या सहायक प्राध्यापक डॉ. माद्री काकोटी यांच्याविरुद्ध देशद्रोहासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून केंद्र सरकारवर केलेल्या टिकेमुळे भोजपुरी गायिका नेहासिंह राठौरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी प्रा. डॉ. काकोटी यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) या उजव्या विचारसरणीच्या संघटनेचा सदस्य आणि विद्यापीठाचा विद्यार्थी जतीन शुक्ला याने दिलेल्या फिर्यादीवरून प्रा. डॉ. माद्री काकोटी यांच्याविरुद्ध लखनऊच्या हसनगंज पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

प्रा. डॉ. माद्री काकोटी या आपल्या सोशल मीडियावरील विशेषतः एक्सवरील पोस्टमध्ये सातत्याने भारताची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वाला लक्ष्य करून शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणत आहेत, असा आरोप जतीन शुक्लाने दिलेल्या फिर्यादीत करण्यात आला आहे. दि प्रिंटने हे वृत्त दिले आहे.

भारतात दंगली भडकवण्याच्या इराद्याने प्रा. डॉ. माद्री काकोटी यांनी पोस्ट केल्या आहेत. प्रा. डॉ. काकोटी या आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नेहमीच ‘भगवा दहशतवाद’सारखे शब्द वापरत आहेत. त्यांच्या काही पोस्ट पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्सवर शेअर करण्यात येत आहेत, असा आरोपही या फिर्यादीत करण्यात आला आहे.

हेही वाचाः भोजपुरी गायिका नेहासिंह राठौरवर देशद्रोहाचा गुन्हा, पहलगाम हल्ल्यावरून मोदी सरकारला सवाल करणे पडले महागात!

या फिर्यादीवरून प्रा. डॉ. माद्री काकोटी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) विविध कलमान्वये देशद्रोहाबरोबरच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून धार्मिक द्वेषाचा प्रचार करणे, समूहांमध्ये शत्रुत्वाला प्रोत्साहन देणे, इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे वक्तव्य, खोटी माहिती, अफवा पसरवणे आणि प्रकाशित करणे, शांततेचा भंग करण्यासाठी हेतुतः अपमान करणे, धार्मिक भावना दुखावण्याच्या इराद्याने शब्द उच्चारणे, भारताची एकता धोक्यात घालणे इत्यादी कलमांबरोबरच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये सोमवारी (२८ एप्रिल) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एफआयआर दाखल झाल्यानंतर प्रा. डॉ. काकोटी यांनी माध्यमांना दिलेल्या निवेदनात लोकांच्या भावना दुखावतील असे कोणतेही वक्तव्य करण्यास नकार दिला. नंतर मंगळवारी एक्स या मायक्रो ब्लॉलिंग सोशल मीडियावर एक पोस्ट करून त्यांनी वापरलेल्या शब्दांबाबत स्पष्टीकरण दिले आणि माफीही मागितली.

‘मी केलेल्या पोस्ट आणि व्हिडीओमध्ये दहशतवादी-दहशतवादी हे शब्द फक्त आणि फक्त पाकिस्तानद्वारे समर्थित आणि प्रायोजित दहशतवादासाठीच आहेत, ज्यांनी पहलगाममध्ये भारतीयांची धर्म विचारून नृशंस हत्या केली… एक शिक्षक असूनही माझ्या म्हणण्याचा हेतू काय आहे, हे मी समजावून सांगू शकले नाही. भाषाशास्त्राची पदवीधर असूनही माझी भाषा माझा संदेश व्यक्त करण्यासाठी पुरेशी स्पष्ट नव्हती, याबद्दल मला दुःख वाटते. माझ्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढला गेला आणि त्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या गेल्या त्याबद्दल दिलगीर आहे,’ असे प्रा. डॉ. काकोटी यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे.

प्रा. डॉ. माद्री काकोटी या एक्सवर डॉ. मेडुसा नावाने ओळखल्या जातात. त्यांचे  १.५ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. प्रा. डॉ. काकोटी या दिल्ली विद्यापीठ आणि जवाहरलाला नेहरू विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी आहेत. एक्सवर केलेल्या अनेक पोस्टमध्ये त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत भाष्य केले आणि याच विषयावर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या पोस्ट्स त्यांनी रिशेअरही केल्या आहेत.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी प्रा. डॉ. माद्री काकोटी यांनी एक पोस्ट केली. ‘एखाद्याचा धर्म विचारून गोळी मारणे हा दहशतवाद आहे. त्याचप्रमाणे धर्म विचारून लिचिंग करणे, धर्म विचारून नोकरीवरून काढून टाकणे, धर्म विचारून घर न देणे आणि धर्म विचारून घरावर बुलडोझर चालवणेही दहशतवादच आहे. खरा दहशतवाद ओळखायला शिका’, असे प्रा. डॉ. काकोटी यांनी त्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रा. डॉ. माद्री काकोटी यांनी केलेल्या पोस्टपैकी ही एक पोस्ट होती ज्यामुळे त्या एबीव्हीपी सदस्याच्या निशाण्यावर आल्या. एबीव्हीपीच्या सदस्याने प्रा. डॉ. काकोटी यांची प्रोफाईल तपासली आणि नंतर फिर्याद दिली.

रविवारीच उत्तर प्रदेश पोलिसांनी भोजपुरी गायिका नेहासिंह राठौरविरुद्ध देशद्रोहासह भारतीय न्याय संहितेच्या ११ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. नेहाने पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून मोदी सरकारवर टिकास्त्र सोडले होते आणि भाजपच्या नेतृत्वातील सरकार पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या मुद्यावर बिहारच्या निवडणुकीत मते मागेल, असा दावा केला होता.

भाजप देशाला कमकुवत करण्याचे काम करत आहे. भारतातील हिंदू-मुस्लिम अजेंडा देशाला कमकुवत करत नाही काय? दहशतवाद्यांना हेच हवे आहे, असेही नेहासिंह राठौरने एका व्हिडीओ क्लिपमध्ये म्हटले होते. नंतर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी नेहासिंह राठौरच्या समर्थनार्थ एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यात नेहाचा व्हिडीओ दाखवून नेहासिंहविरुद्ध करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध केला.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!