मुंबई: आपल्या शैलीदार आणि रसाळ निवेदनामुळे जगभरातील संगीतप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनलेले प्रसिद्ध रेडिओ निवेदक अमीन सायानी यांचे मंगळवारी रात्री ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. गुरूवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
बहनों और भाईयों, अगले पायदान पर है ये गाना…असे म्हणत अनेक वर्षे रेडिओवर बिना का गीतमाला हा कार्यक्रम सादर केला. मनाचा ठाव घेणाऱ्या शैलीदार आणि रसाळ निवेदनामुळे ते जगभरातील संगीतप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनले. रेडिओ सिलोन आणि विविध भारतीवर १९५२ ते १९९४ एवढा प्रदीर्घकाळ चाललेला सर्वाधिक लोकप्रिय रेडिओ कार्यक्रम म्हणून बिना का गीतमाला कार्यक्रमाची नोंद आहे.
जवळपास ४२ वर्षे रेडिओवर हा कार्यक्रम तुफान लोकप्रिय ठरला. नंतर २००० ते २००१ आणि २००१ ते २००३ दरम्यान त्यात काही बदल करून हा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात आला होता.
आवाजाचा अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखल्या गेलेल्या अमीन सायानी यांनी इंग्रजी भाषेतील निवेदक म्हणून त्यांनी रेडिओवरील कारकीर्दीस सुरूवात केली होती. देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी हिंदीतून निवेदनास सुरूवात केली होती.
अमीन सायानी यांच्या नावावर तब्बल ५४ हजार रेडिओ कार्यक्रमांची निर्मिती आणि त्यांना आवाज देण्याचा विक्रम नोंदला गेला आहे. १९ हजार रेडिओ जिंगल्सना आवाज दिल्याबद्दलच्या त्यांच्या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे.
आवाज न ऐकताच बिग बीला केले होते रिजेक्ट
सुमारे ४०-४५ वर्षांपूर्वी बिग बी अमिताभ बच्चन हे ऑडिशन देण्यासाठी मुंबईतील आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये गेले होते. परंतु अमीन सायानी यांच्या भेटीची वेळ न घेताच अमिताभ बच्चन स्टुडिओत पोहोचल्यामुळे अमीन सायानी यांनी त्यांना भेटण्यास नकार दिला आणि अमिताभ बच्चन यांचा आवाज न ऐकताच त्यांना सायानी यांनी रिजेक्ट केले होते.