
छत्रपती संभाजीनगरः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय जनार्दन फुलारी यांनी पदभार स्वीकारल्यापासूनच त्यांच्या कार्यपद्धतीबाबत वेगवेगळे आक्षेप घेतले जात असतानाच आता प्राचार्यांशी अपमानास्पद वागणूक, लोकप्रतिनिधींची हेटाळणी, अधिकार मंडळात घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीस हटकून टाळाटाळ, प्रश्न उपस्थित करणाऱ्या अधिसभा सदस्यांवर दडपशाही, विद्यापीठातील प्रश्न चर्चेद्वारे सोडवण्याऐवजी संघर्षाची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न असे विविध गंभीर स्वरुपाच्या २० मुद्यांचे आरोपपत्र ठेवून त्यांच्या कार्यकाळातील एकूणच कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी अधिसभा सदस्य डॉ. संजय कांबळे हे १३ जुलैपासूनच आमरण उपोषण करणार आहेत.
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक राहिलेले डॉ. विजय जनार्दन फुलारी यांची २४ जानेवारी २०२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीनंतर डॉ. फुलारी यांनी कुलगुरूपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर काही दिवसांतच विद्यार्थी-प्राध्यापक संघटना, विद्यापीठाच्या अधिकार मंडळांचे सदस्य यांच्यावर त्यांनी दडपशाही सुरू केल्याचे आरोप झाले. त्याबाबतच्या तक्रारीही विद्यापीठांचे कुलपती तथा राज्यपालांकडे वारंवार करण्यात आल्या आहेत. मात्र त्या तक्रारींवर कोणतीच कारवाई झाली नसल्यामुळे आता अधिसभा सदस्य डॉ. संजय कांबळे यांनी डॉ. विजय फुलारी यांच्या कार्यकाळातील गंभीर स्वरुपाच्या प्रशासकीय, शैक्षणिक व वैधानिक बाबींची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांना कुलगुरूपदावरून हटवण्याच्या मागणीसाठी १३ जुलैपासून विद्यापीठ गेटवर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे केवळ एक विद्यापीठ नसून मराठवाड्याच्या सामाजिक परिवर्तन, शैक्षणिक प्रगती आणि बहुजन समाजाच्या उन्नतीचे प्रतिक आहे. या विद्यापीठाची नाळ थेट समाजाशी जोडलेली असून मराठवाड्यातील गोरगरिब, शेतकरी, शेतमजूर, वंचित आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी या विद्यापीठाचे अस्तित्व निगडित आहे. मात्र डॉ. फुलारी यांनी कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून विद्यापीठ प्रशासन, लोकशाही प्रक्रिया, विद्यार्थी व प्राध्यापकांचे प्रश्न तसेच वैधानिक अधिकार मंडळांच्या कामकाजाबाबत गंभीर स्वरुपाचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. विविध विद्यार्थी संघटना, प्राध्यापक संघटना, अधिसभा सदस्य, लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार निवेदने, पत्रव्यवहार आणि चर्चेद्वारे प्रश्न मांडले, परंतु त्याबाबत अपेक्षित सुधारणा झाली नाही, असे डॉ. कांबळे यांनी कुलपती तथा राज्यपालांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
डॉ. कांबळे यांनी कुलगुरू डॉ. फुलारी यांच्यावर २० गंभीर मुद्यांचे आरोपपत्र ठेवले असून त्याची उच्चस्तरीय चौकशी करून मराठवाड्याच्या हितरक्षणासाठी डॉ. फुलारींना कुलगुरूपदावरून हटवा, अशी आग्रही मागणी कुलपती तथा राज्यपालांकडे केली आहे. कुलगुरू डॉ. फुलारी यांची कार्यपद्धती, प्रशासकीय कामकाजातील त्रुटी आणि विद्यापीठातील विविध प्रश्न याबाबत अनेकदा निवेदने, पत्रव्यवहार व तक्रारी करूनही त्यावर अद्याप कोणताही ठोस कार्यवाही झाली नसल्यामुळे विद्यापीठ, विद्यार्थी, प्राध्यापक व मराठवाड्याच्या शैक्षणिक हिताच्या रक्षणासाठी १३ जुलैपासून आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे डॉ. कांबळे यांनी म्हटले आहे.
डॉ. प्रशांत अमृतकरांवर ‘अतोनात’ प्रेम
डॉ. कांबळे यांनी कुलगुरू फुलारींवर ठेवलेल्या २० मुद्यांच्या आरोपपत्रात सर्वात गंभीर आरोप आहे तो कुलसचिवपदाच्या नियुक्ती प्रक्रियेचा. विद्यापीठाच्या कुलसचिवपदाच्या नियुक्तीची प्रक्रिया वारंवार राबवण्यात आली, जाहिरात प्रसिद्ध करून मुलाखती घेण्यात आल्या, परंतु डॉ. प्रशांत अमृतकर यांना प्रभारी कुलसचिवपदी कायम ठेवण्यासाठी प्रत्येक वेळी ‘योग्य उमेदवार उपलब्ध नाही’ हे कारण पुढे करून नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नाही आणि डॉ. अमृतकर यांनाच पुन्हा पुन्हा मुदतवाढ देत कार्यरत ठेवण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून सहा-सहा महिने कालावधीसाठी मुदतवाढ देण्याची पद्धत अवलंबण्यात आली असून नियमित नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नाही. या संपूर्ण प्रक्रियेमुळे नियुक्ती प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, असे डॉ. कांबळे यांनी म्हटले आहे.
बोधचिन्हाशी छेडछाड, पण कारवाई नाही
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ऐतिहासिक बोधचिन्हामध्ये बदल करून ते एक्स्पो-२०२६ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले. या निर्णयामागील प्रक्रिया, वैधानिक मंजुरी आणि त्याबाबतची जबाबदारी याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विद्यापीठातील विविध शैक्षणिक, प्रशासकीय व वैधानिक प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून विद्यापीठाच्या प्रतिमेवर प्रतिकुल परिणाम होत आहे, असाही डॉ. कांबळे यांचा आरोप आहे.
अधिकार मंडळांनाही ‘कोलदांडा’
विद्यापीठाची अधिसभा, व्यवस्थापन परिषद ही वैधानिक अधिकार मंडळे आहेत. परंतु या अधिकार मंडळांच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची कुलगुरू डॉ. फुलारी हे अंमलबजावणीच करत नसल्याची डॉ. कांबळे यांचा आरोप आहे. एलएलबीच्या परीक्षा घेण्यास विलंब झाल्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले. एलएलबीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर समिती नेमण्याचा निर्णय अधिसभेच्या बैठकीत घेण्यात आला. परंतु त्या निर्णयाची अंमलबजावणीच करण्यात आली नाही. अधिसभेमध्ये मंजूर झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी न करणे, ठराव प्रलंबित ठेवणे आणि वैधानिक संस्थांच्या निर्णयांना बगल देणे ही गंभीर बाब असल्याचे डॉ. कांबळे यांनी म्हटले आहे.
लोकप्रतिनिधींची हेटाळणी, सदस्यांना धमक्या
विद्यापीठातील प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी भेटीची वेळ मागूनही कुलगुरू डॉ. फुलारी हे त्यांना अपेक्षित प्रतिसाद देत नाहीत. अधिसभा सदस्यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून दबाव आणण्यात येतो. अधिसभा सदस्यांविषयी अवमानकारक, धमकीवजा आणि प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारी भाषा वापरण्यात येते. प्राचार्यांच्या बैठकीतही त्यांच्या सन्मानास अनुरूप वागणूक दिली जात नाही. अपमानास्पद भाषेचा वापर करण्यात येतो. डॉ. फुलारी हे मराठवाडा विभागाबाबत वारंवार अवमानकारक टिप्पणी करतात, त्यामुळे समाजात नाराजी निर्माण झाली आहे, असे डॉ. कांबळे यांनी निवेदनात म्हटले आहे.
संवादाऐवजी संघर्षावर ‘भर’
कुलगुरू डॉ. फुलारी हे अधिसभा सदस्य, प्राध्यापक-विद्यार्थी संघटना आणि विविध शिष्टमंडळांच्या पत्रांना उत्तरे देत नाहीत. त्यांच्याशी संवाद टाळतात. विद्यार्थी, प्राध्यापक, अधिसभा सदस्य आणि लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेले प्रश्न चर्चेद्वारे सोडवण्याऐवजी कुलगुरूंकडून संघर्षाची परिस्थिती निर्माण केली जाते. न्याय्य मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठात मोर्चे, आंदोलने केली तर त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले. विद्यार्थ्यांवर दाखल केलेल्या एफआयआरबाबत अधिसभेमध्ये वस्तुस्थितीपेक्षा भिन्न माहिती देऊन दिशाभूल करण्यात आली, असे विविध २० आरोप डॉ. कांबळे यांनी केले असून या आरोपांची दखल घेऊन कुलगुरू डॉ. फुलारी यांच्याविरुद्ध ठोस कार्यवाही न झाल्यास १३ जुलैपासून विद्यापीठ गेटवर आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

