मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गावर चालवली बिल्डरची गाडी, काँग्रेसने केला खळबळजनक आरोप

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रविवारी बहुचर्चित समृद्धी महामार्गावरून प्रवास करत या महामार्गाचा आढावा घेतला. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः गाडी चालवली तर त्यांच्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसले होते. नागपूर ते शिर्डी या टेस्ट ड्राइव्हसाठी फडणवीस-शिंदेंनी वापरलेली गाडीच आता वादाचा विषय ठरली आहे. ही गाडी एका बिल्डराच्या मालकीची असून त्यावरून काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आता राज्य चालवायला बिल्डरांच्या हातात देणार का? असा सवाल काँग्रेसने केला आहे.

फडणवीस आणि शिंदे यांचा टेस्ट ड्राइव्ह नागपूरहून सुरू झाला, तो शिर्डीत संपला. या टेस्ट ड्राइव्हसाठी शिंदे- फडणवीसांनी मर्सिडीज बेन्झ एजी, जी ३५० डी ही अलिशान गाडी वापरली. एमएच ४९ बीआर ०००७ क्रमांकाची ही गाडी कुकरेजा इन्फ्रास्ट्रक्चर्सच्या मालकीची असल्याची कागदपत्रेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आली आहेत. ऍक्सिस बँकेकडून कर्जावर घेतलेल्या या गाडीची पासिंग नागपूर (पूर्व) च्या आरटीओ कार्यालयात झालेली आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी समृद्धी महामार्गावर बिल्डरच्या मालकीची ही अलिशान गाडी चालवत या महामार्गाचा आढावा घेतल्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे.

हेही वाचाः उपमुख्यमंत्री फडणवीसांनी समृद्धी महामार्गावर चालवली पीयूसीची मुदत संपलेली गाडी! वादानंतर बिल्डर मालकाने दुसऱ्याच दिवशी…

शिंदे-फडणवीसांनी चालवलेल्या या गाडीची ऑनलाइन आरसी ही कागदपत्रे शेअर करत  ‘मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बिल्डरची गाडी चालवतायत मग आता राज्य चालवायला बिल्डरच्या हातात देणार का?’ असा खोचक सवाल काँग्रेसने केला आहे.

काळे झेंडे, निषेधाच्या घोषणांनी दुमदुमला समृद्धी महामार्गः  दरम्यान, शिंदे- फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाने जालना जिल्ह्यात प्रवेश करताच त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. हे दोघे समृद्धीचा आंनद घेत जालना जिल्ह्यात येताच येथील शेतकऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. समृद्धी महामार्गावर गाडी दामटायला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे वेळच वेळ आहे, मात्र सरकार शेतकऱ्यांची वीज कापत आहे त्याचे काय? असा संतप्त सवाल करत शेतकऱ्यांनी शिंदे-फडणवीसांना काळे झेंडे दाखवले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा ताफा अडवून चर्चा करण्याचा या शेतकऱ्यांनी प्रयत्न केला, पण शेतकऱ्यांशी कुठलीही चर्चा न करताच हा ताफा पुढे निघून गेला.

एकीकडे शेतकरी आपल्या मार्गाने निषेध व्यक्त करत असतानाच समृद्धी महामार्गावर राज्यपाल हटावच्या मागणीसाठी असंख्य कार्यकर्ते रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करत होते. पोलिसांनी या सर्वांना आवरण्याचा अटोकाट प्रयत्न केला परंतु मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात शेतकरी आणि कार्यकर्ते यशस्वी झाले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या या टेस्ट ड्राइव्हमध्ये समृद्धी महामार्ग विरोधाच्या घोषणांनी दुमदुमून गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!