‘नॉट रिचेबल’ अजित पवार अवतरले; म्हणाले बंद करा ना हे सगळे, बदनामीलाही काही मर्यादा असते….


मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार हे गेल्या दोन दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’ असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. दोन दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करून अजित पवार ‘अचानक गायब’ झाल्याची अफवा माध्यमांत आणि सोशल मीडियावर वेगाने पसरल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले असतानाच आज अजित पवार माध्यमांसमोर प्रकटले आणि त्यांनीच दोन दिवस ‘नॉट रिचेबल’चे नेमके कारण सांगितले.

  मीडिया रिपोर्टनुसार, पुण्यातील दोन दिवसांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून अजित पवार अचानक ‘नॉट रिचेबल’  झाले होते. पवार कुठे गेले आहेत, याची माहिती शुक्रवारी रात्रीपर्यंत त्यांच्या निकटवर्तीयांसह पोलिसांनाही नव्हती. ये यापूर्वी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी असेच ‘नॉट रिचेबल’ झाले होते, अशा बातम्या माध्यमात पसरल्या.

 त्यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक ट्विट करून या राजकीय चर्चेत आणखीच तेल ओतले. या ट्विटमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीचा फोटो टाकला आणि त्यावर ‘किळसवाणे राजकारण, मी पुन्हा येईन’ असे दमानिया यांनी लिहिले.

शरद पवारांचेही स्पष्टीकरण

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज माध्यमांच्या प्रतिनिधींनी ‘अजित पवार नॉट रिचेबल आहेत का?’ असा थेट प्रश्न विचारला होता. त्यावर ‘मला याबद्दल माहिती नाही. अजित पवार माझ्या संपर्कात आहेत. उद्या सुप्रिया सुळेही नॉट रिचेबल असल्याचे म्हणतील. त्या घरात आहेत, पण तुमच्या समोर नाहीत,’ अशी मिश्कील टिप्पणी करत शरद पवारांनी अजित पवार नॉट रिचेबल असल्याचे खोडून काढले होते.

 आज सकाळी साडेनऊ वाजता अजित पवार हे पुण्यातील कांका ज्वेलर्सच्या शोरूमच्या उद्घाटनासाठी सपत्नीक अवतरले. आणि त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. जागरण आणि दौरे जास्त झाल्यानंतर मला पित्ताचा त्रास होतो. हे आज नाही तर पहिल्यापासून सुरू आहे. मला कसेतरी व्हायला लागल्यामुळे मी डॉक्टरांकडून गोळ्या घेतल्या आणि शांतपणे झोपलो.  आज बरे वाटू लागल्यामुळे आज सकाळपासून मी कार्यक्रमाला सुरूवात केली आहे. परंतु याच काळात माध्यमे कसल्याही बातम्या दाखवत होती. त्या बातम्या पाहून वाईट वाटले, असे अजित पवार म्हणाले.

शरद पवारांची मुलाखत मी एनडीटीव्हीवर पाहिली. शरद पवार हे आमचे सर्वोच्च नेते आहेत. शरद पवारांनी एखादी भूमिका मांडल्यानंतर त्याबद्दल पुन्हा आम्ही बोलू शकत नाही. त्यांची भूमिका हीच आमची आणि पक्षाची भूमिका आहे, असेही अजित पवार म्हणाले.

 बदनामी किती करायची त्यालाही मर्यादा असते….

 नी नॉट रिचेबल आहे, अशा आशयाच्या बातम्या दाखवल्या जात होत्या. हे सगळे बंद करा ना, तुम्ही आधी सत्यता तपासा. ती व्यक्ती कुठे आहे, ते तपासा. कारण नसताना एखाद्याची बदनामी करायचीस असे सुरू आहे. पण बदनामी किती करायची याची एक मर्यादा असते. आम्ही पब्लिक फिगर असल्याने तुम्हाला आमच्या बातम्या देण्याचा अधिकार आहे. वर्तमानपत्रात देखील अशा बातम्या पाहून मला वाईट वाटले, असे अजित पवार म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!