शेतकरी तरूणाशी लग्न करायला मुली तयारच होईनात, सरपंचाने लढवली शक्कल; जाहीर केली अशी भन्नाट योजना!

अहमदनगरः शेतकरी हा जगाचा पोशिंदा, अन्नदाता अशा भारी भक्कम शब्दांत आपण सगळेच शेतकऱ्यांचे कौतुक करतो. परंतु त्याच शेतकऱ्याशी जेव्हा बेटी व्यवहार करण्याची वेळ आली तर मात्र काय करतो तुमचा मुलगा? शेती? असे म्हणून आपण ज्याची रोटी खातो, त्याच्याशी बेटी व्यवहार करायला मात्र सपशेल नकार देतो. ही समस्या महाराष्ट्राच्या जवळपास सर्वच गावांत कमीअधिक प्रमाणात गंभीर स्वरुप धारण करू लागली आहे. यावर तोडगा म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील एका सरपंचाने शक्कल लढवली आणि एक भन्नाट योजना जाहीर केली आहे. सध्या ही योजना चांगलीच चर्चेत आहे.

 गावातील शेतकऱ्यांच्या मुलांना मुली द्यायला कोणीच तयार होत नसल्यामुळे त्यांचे लग्न कसे व्हायचे? हा प्रश्न गंभीर बनत चालल्याचे पाहून एका सरपंचाने शक्कल लढवली आणि एक भन्नाट योजना जाहीर केली आहे. शेतकरी अर्धांगिनी योजना असे त्या योजनेचे नाव असून जी मुलगी शेतकऱ्याच्या मुलाशी लग्न करेल, त्या मुलीला रोख ५ हजार ५५५ रुपये आणि संसारोपयोगी साहित्य भेट देण्याची घोषणा अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील दरेवाडीच्या सरपंचाने केली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, गावातील शेतकऱ्यांची मुले उच्च शिक्षित असूनही ते केवळ शेती करतात म्हणून त्यांच्याशी लग्न करायला कोणतीही मुलगी तयार होत नसल्यामुळे संगमनेर तालुक्यातील दरेवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच आनंदा दरगुडे यांनी ही अनोखी शक्कल लढवली आहे. दरेवाडी गावची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार तशी जेमतेम ११२ च्या आसपास. आता या लोकसंख्येत वाढ झाली आहे.

या गावातील अनेक तरूण उच्च शिक्षित आहेत. त्यांनी नोकरीच्या मागे न धावता गावातच शेती करण्याचा निर्णय घेतला आणि ते चांगल्या पद्धतीने शेतीही करू लागले आहेत. मात्र त्यांचा हा निर्णयच त्यांच्या लग्नात मोठा अडथळा बनला आहे.

हे शेतकरी तरूण उच्च शिक्षित असूनही ते केवळ शेती करतात म्हणून त्यांचे लग्न जमणे अवघड होऊन बसले आहे. मुलीकडचे पाहुणे आले की, मुलगा काय करतो? अशी विचारणा करतात. मुलगा शेती करतो, असे सांगितल्याबरोबर ते मुलगी द्यायला नकार देतात. मुलीकडच्यांच्या या नकारघंटेमुळे दरेवाडीतील जवळपास ५० ते ५५ शेतकरी तरूणांचे लग्नच जमलेले नाही.

या तरूण शेतकऱ्यांचे लग्न जमावे म्हणून गावचे सरपंच आनंदा दारगुडे यांनी एक शक्कल लढवली आहे. जी मुलगी दरेवाडी गावातील शेतकरी तरूणाशी लग्न करेल, त्या मुलीला रोख रक्कम ५ हजार ५५५ रुपये आणि संसारोपयोगी साहित्य भेट देण्याचा निर्णय दारगुडे यांनी घेतला आहे. या योजनेला त्यांनी शेतकरी अर्धांगिनी योजना असे नावही दिले आहे.

सरपंच आनंदा दारगुडे यांनी स्वखर्चातून ही योजना सुरू केली आहे. मुलीला रोख रक्कम आणि संसारोपयोगी साहित्य ते स्वतःच्या खर्चाने देणार आहेत. सरपंच आनंदा दारगुडे यांच्या या योजनेचे सर्वत्र कौतुक होत असून या योजनेसाठी त्यांना उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य आणि ग्रामसेवकाचेही सहकार्य लाभत आहे.

दरेवाडीच्या सरपंचाने घेतलेल्या या पुढाकारामुळे तरी मुलीकडे लोक आता मनाचा मोठेपणा दाखवून शेतकऱ्यांच्या मुलांना आपल्या मुली देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शहरात गेलेली अनेक कुटुंबे कोरोना काळात खेड्यात आली. त्यांना खेड्यानीच आश्रय आणि धीर दिला. परंतु तीच माणसे आजकाल खेड्यात आपल्या मुली द्यायला नकार देतात, ही मानसिकता चुकीची असल्याचा सूर या गावातील नागरिक बोलून दाखवत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!