उपमुख्यमंत्री फडणवीसांनी समृद्धी महामार्गावर चालवली पीयूसीची मुदत संपलेली गाडी! वादानंतर बिल्डर मालकाने दुसऱ्याच दिवशी…


मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाच्या टेस्ट ड्राइव्हसाठी वापरलेली अलिशान मर्सिडिज बेन्झ कार कुकरेजा बिल्डरच्या मालकीची असल्याचे उघड झाल्यानंतर निर्माण झालेला वाद थांबतो न थांबतो तोच नवा वाद निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चालवलेल्या या कारच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची (पीयूसी) मुदत तीन महिन्यांपूर्वीच संपल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, हा वाद निर्माण होताच आज दुसऱ्याच दिवशी या कारच्या पीयूसीचे नुतनीकरण करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी  हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राइव्ह घेतली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूरहून शिर्डीपर्यंत या महामार्गावर मर्सिडिज बेन्झ एजी, जी ३५० डी ही एमएच ४९ बीआर ०००७ क्रमांकाची अलिशान गाडी चालवत आणली. त्यांच्या शेजारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसले होते.

 हेही वाचाः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गावर चालवली बिल्डरची गाडी, काँग्रेसने केला खळबळजनक आरोप

समृद्धी महामार्गावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी बुगांट पिटाळलेली ही अलिशान मर्सिडिज बेन्झ गाडी कुकरेजा इन्फ्रास्ट्रक्चर्सच्या मालकीची असल्याची कागदपत्रे शेअर करत काँग्रेसने गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री बिल्डरची गाडी चालवत आहेत, आता राज्य चालवायला बिल्डरच्या हातात देणार काय? असा खोचक सवालही या गाडीच्या मालकीची कागदपत्रे शेअर करत काँग्रेसने केला होता. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय भाजप नेते व बांधकाम व्यावसायिक विक्की कुकरेजा यांच्या मालकीची ही गाडी आहे.

फडणवीसांनी चालवलेल्या मर्सिडिज बेन्झच्या मालकीवरून निर्माण झालेला वाद शमतो न शमतो तोच या मर्सिडिज बेन्झ गाडीच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची (पीयूसी) मुदत तीन महिन्यांपूर्वीच म्हणजे २५ ऑगस्ट २०२२ रोजीच संपलेली असल्याचे निष्पन्न झाले होते. या गाडीच्या एम परिवहन ऍपवरील तपशीलाचे फोटो शेअर करत अनेकांनी आक्षेप घेतले होते. पीयूसी नसलेल्या वाहनातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कसे काय प्रवास करू शकतात? राज्याचे मुख्यमंत्री आणि गृह खात्याचे प्रमुख- उपमुख्यमंत्री यांना कायदा तोडण्याचा अधिकार आहे का? असा अनेकांचा आक्षेप होता.

… आणि झटपट केले नुतनीकरणः हा वाद निर्माण झाल्यानंतर या अलिशान मर्सिडिज बेन्झचे मालक कुकरेजा इन्फ्रास्ट्रक्चर यांनी फडणवीसांनी गाडी चालवल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज, सोमवारी तातडीने या मर्सिडिज बेन्झच्या पीयूसीचे झटपट नुतनीकरण करून घेतले. आता या गाडीच्या पीयूसीची मुदत ४ डिसेंबर २०२३ पर्यंत आहे. परिवहन मंत्रालयाच्या एम ऍपवर ही माहिती अपडेटही झालेली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!