पुणेः औरंगजेब या मातीतले नाहीत का? त्यांचा जन्म मुघल साम्राज्यात झाला नाही का? मुळात या देशात ब्रिटिश येण्यापूर्वी मुघल साम्राज्य होते आणि मुघलही याच मातीतले होते. त्यामुळे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या आंदोलनात औरंगजेबाचा फोटो दिसला त्याचे काही नवीन विशेष वाटत नाही, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर केल्याच्या निषेधार्थ एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात शनिवारपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी आंदोलनात औरंगजेबाचे छायाचित्र झळकले. त्यावर आक्षेप घेत भाजपने टीकाही केली होती.
खा. जलील यांच्या आंदोलनात औरंगजेबाचे छायाचित्र झळकल्यामुळे राजकीय टीका-टिप्पणी सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही या विषयावर प्रतिक्रिया नोंदवली आहे. प्रकाश आंबेडकरांनी आपल्या प्रतिक्रियेतून भाजपची हवाच काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
औरंगजेब या मातीतले नाहीत का? त्यांचा जन्म मुघल साम्राज्यात झाला नाही का? मुळात या देशात ब्रिटिश येण्यापूर्वी मुघल साम्राज्य होते आणि मुघलही याच मातीतले होते. त्यामुळे जलील यांच्या आंदोलनात औरंगजेबाचा फोटो दिसला त्याचे काही नवीन विशेष वाटत नाही. ज्यांना यावरून हिंदू-मुस्लिमांमध्ये भेद करायचा आहे, त्यांनी तो करावा, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राजकारणातून जात, धर्म आणि विभाग वर्ज्य करायला सांगितले होते. मात्र तरीही आज राजकारणात जात आणि धर्माचा वापर होतो. त्याचे परिणाम आज दिसत आहेत, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
नेमके काय घडले होते?: शनिवारी नामांतर संघर्ष समितीच्या वतीने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर केल्याच्या निषेधार्थ बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात तरूण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आय लव्ह औरंगाबादचे फलक हातात घेऊन आंदोलक तरूण या आंदोलनात सहभागी झाले होते. दुपारी अचानक काही तरूण आंदोलनस्थळी आले आणि त्यांनी औरंगजेबाचे छायाचित्र झळकवले. त्यामुळे वाद निर्माण झाला होता.
एमआयएमचा खुलासाः या घटनेची कुणकुण लागताच खासदार जलील यांनी यावरून वाद उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन स्पष्टीकरण दिले होते. औरंगाबादच्या नामांतराला उद्योग, सर्वसामान्य जनतेतून विरोध होत असून आपल्या आंदोलनाला बदनाम करण्याच्या उद्देशाने काही तरूणांनी येथे औरंगजेबाचे छायाचित्र झळकवले. त्या घटनेशी एमआयएमचा काहीही संबंध नाही, असा खुलासा जलील यांनी लगेगच केला होता.
अज्ञात तरूणांविरुद्ध गुन्हा दाखलः दरम्यान, एमआयएमच्या आंदोलनात औरंगजेबाचे छायाचित्र झळकवल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या सिटीचौक पोलिसांनी अज्ञात तरूणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. औरंगजेबाचे छायाचित्र हातात घेऊन घोषणाबाजी करणाऱ्या तरूणांची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले होते. आता पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.