नांदेड ऑनर किलिंगः शुभांगीचा गळा घोटताना हात थरथरू नये म्हणून बाप, भाऊ, मामांनी आधी ढोसली येथेच्छ दारू; मग…


नांदेडः प्रेम प्रकरणाच्या विरोधातून नांदेड जिल्ह्यातील पिंपरी महिपाल येथे ऑनर किलिंगला बळी पडलेल्या शुभांगी जोगदंड हत्या प्रकरणात लिंबगाव पोलिसांनी हिवरा परिसरातून मांडी, डोक्यासह हाडांचे काही अवशेष गोळा केले आहेत. ही हाडे शुभांगीचीच असल्याचे सिद्ध करण्याचे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. दरम्यान, शुभांगीचा गळा घोटताना हात थरथरू नये म्हणून तिचा बाप, भाऊ, काका आणि मामांनी येथेच्छ दारू ढोसली होती. नंतर तिचा गळा घोटून खून केल्याची माहिती समोर आली आहे.

प्रेम प्रकरणाच्या विरोधातून नांदेड जिल्ह्यातील पिंपरी महिपाल येथील शुभांगी जोगदंड या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरूणीची तिचेच वडिल, भाऊ आणि मामांनी निर्घृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र हळहळला होता. शुभांगी नांदेडच्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात बीएएमएमच्या तिसऱ्या वर्षाला शिकत होती. शुभांगीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह शेतात जाळून राख आणि हाडे नजीकच्याच ओढ्यात फेकून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नही करण्यात आला.

लिंबगाव पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून तपासात त्यांना हिवरा परिसरातील ओढ्यातून डोके आणि मांडीच्या हाडासह शरीराच्या काही भागाचे अवशेष सापडले आहेत. हे अवशेष न्यायवैद्यक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. डीएनए चाचणीतून ही हाडे शुभांगीचीच आहेत का? हे स्पष्ट होणार आहे.

एका निनावी  फोनमुळे शुभांगी जोगदंडच्या हत्येला वाचा फुटली. तिच्या हत्याप्रकरणातील अनेक बाबींचा उलगडा होणे अद्याप बाकी आहे. त्या दृष्टीने पोलिस तपास करत आहेत. या प्रकरणी तिचा वडील जनार्दन लिंबाजी जोगदंड (वय ४८), भाऊ कृष्णा (वय १९), चुलत भाऊ गिरधारी (वय ३०), गोविंद (वय ३२) आणि मामा केशव शिवाजी कदम (वय३७) अशा पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

गळा घोटताना हात थरथरू नये म्हणून ढोसली दारू

शुभांगीचा काटा काढण्याचा प्लान ठरल्यानंतर तिचा गळा घोटताना आपले हात थरथरू नये म्हणून या सर्व आरोपींनी आधी येथेच्छ दारू ढोसली होती. त्यानंतर तिचा गळा घोटण्यात आला. नंतर तिचा मृतदेह शेतात नेऊन जाळण्यात आला. तिची राख आणि अस्थी नजीकच्याच ओढ्यात टाकून देण्यात आली. ज्या ठिकाणी प्रेत जाळले त्या ठिकाणी नांगर फिरवून त्यावर पाणी सोडण्यात आले. या सगळ्या कुरापती या नराधमांनी पुरावा नष्ट करण्यासाठी केल्या खऱ्या, परंतु पोलिसांना आलेल्या एका निनावी फोनमुळे या हत्येचे बिंग फुटले.

आठवीत असतानाच करणार होते लग्न

जनार्दन जोगदंड यांना दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन अपत्ये आहेत. घरची आर्थिक परिस्थितीत बेताचीच असल्यामुळे त्यांनी मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले. मोठ्या मुलीचे गावातच लग्न लावून दिल्यानंतर शुभांगी आठवीत असतानाच तिचेही लग्न लावून देण्याचा तिच्या वडिलांचा विचार होता. परंतु तुमची लेक हुशार आहे, तिला शिकू द्या, ती नाव कमवेल, असा आग्रह शिक्षकांनी धरला आणि जनार्दन जोगदंड यांनीही तिला  शिकण्याची संधी दिली. ती शिकली. तिने शिकवणी न लावताच नीट परीक्षेत चांगले गुण घेतले आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाला तिने प्रवेशही घेतला. परंतु शुभांगीचे गावातील एका तरूणाशी प्रेमसंबंध जुळले. हे प्रेमसंबंधातून कुटुंबाच्या खोट्या प्रतिष्ठेपायी तिची हत्या करण्यात आली.

प्रियकराने काडी केली अन् सोयरिक मोडली


शुभांगीचे गावातीलच एका तरूणाशी प्रेमसंबंध जुळले. तिच्या प्रेमसंबंधाची कुणकुण तिच्या घरच्यांना लागली. त्यांनी तिला समजही दिली. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न लावून देण्याचे ठरवले. वडिलांच्या इच्छेमुळे तिने लग्नास होकार दिला. तिची सोयरिक झाली आणि कुंकवाचा कार्यक्रमही पार पडला होता. मात्र त्यानंतर तिच्या प्रियकराने वराकडील मंडळींना तिचे असलेले प्रेमसंबंध सांगून काही फोटो दाखवले. त्यामुळे नियोजित वराकडील मंडळींनी सोयरिक मोडली. यामुळे आपली गावात बदनामी झाली, याचा राग तिच्या कुटुंबाच्या मनात भरला. या संतापाच्या भरात आणि कुटुंबाच्या खोट्या प्रतिष्ठेपायी जन्मदाता बापाने भाऊ, मामा आणि काकांच्या मदतीने तिचा खून केला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!