नागपूरः राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील यांचे हिवाळी अधिवेशन संपेर्यंत निलंबन करण्यात आल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने मोठा निर्णय घेतला असून जयंत पाटलांचे निलंबन मागे घेतले जाईपर्यंत विधानसभेच्या कामजावर बहिष्कार टाकला आहे. विधान परिषदेच्या कामकाजात मात्र विरोधी पक्षाचे आमदार सहभागी होणार आहेत.
जयंत पाटील यांच्यावर कारवाई करण्यात आल्यानंतर आम्ही सभात्याग केला होता. आजही आमची तिच भूमिका राहणार आहे. जयंत पाटील यांचे वागणे, बोलणे, स्वभाव हे गेल्या ३२ वर्षांच्या कारकिर्दीत सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे त्यांना सभागृहात बसू दिले पाहिजे. त्यांच्यावरील कारवाई मागे घेतली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. ही मागणी मान्य होत नसल्यामुळे आम्ही कामकाजावर बहिष्कार टाकला, अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.
दरम्यान, या निर्णयानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलनही केले. शिंदे- फडणवीस सरकारने आवाज दाबण्यासाठी आमचे सहकारी जयंतराव पाटील यांच्या केलेली कारवाई आणि कर्नाटक सरकारच्या चिथावणीखोर वक्तव्याविरोधात आज महाविकास आघाडीच्या सर्व लोकप्रतिनिधींनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केले, अशी माहितीही अजित पवार यांनी ट्विट करून दिली.
सरकार सत्तामेव जयतेच्या बाजूनेः शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनीही महाविकास आघाडीच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. सभागृहात मिळणारी वागणूक लोकशाहीसाठी मारक आहे. सत्ताधारी पक्षाला मी कधीच वेलमध्ये येताना, कामकाज बंद पाडताना पाहिलेले नाही. आम्ही सत्यमेव जयतेच्या बाजूने उभे राहत असून सत्ताधाऱ्यांची मात्र सत्तामेव जयतेच्या बाजू आहेत. ती कधीच जिंकणार नाही. आमचा आवाज कितीही दाबला तरी महाराष्ट्र भूखंड विकू देणार नाही, कर्नाटकला घाबरणार नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.