कोहिनूरचा ‘नूर’ बदलला : बोगस पदवी घोटाळ्याचा तपास अचानक सहायक पोलिस आयुक्तांकडून काढला, आता तपास करणार गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  कोहिनूर शिक्षण संस्था आणि खुलताबाद येथील कोहिनूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील बोगस पदवी घोटाळ्याचा तपासात मोठी अपडेट समोर आली आहे. सहायक पोलिस आयुक्त या प्रकरणाचा तपास करत असताना त्यांच्याकडून हा तपास काढून घेऊन त्यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचा अधिकारी असलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकांकडे हा तपास देण्यात आला आहे. या बोगस पदवी घोटाळ्याची व्याप्ती मोठी असताना अचानक तपास अधिकारी बदलण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

कोहिनूर शिक्षण संस्थेची सचिव आस्मा इद्रिस खान आणि सहसचिव पठाण मकसूद खान या दोघांनी पुण्याच्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे नाव व लोगो वापरून एम.फिल. च्या बनावट व खोट्या पदव्या तयार करून त्याआधारे २०२१ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पेट परीक्षेतून सूट मिळवून पीएच.डी.ला प्रवेश मिळवला. या दोघांकडील एम.फिल. च्या पदव्या बनावट व खोट्या असल्याचे डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने कळवल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या फिर्यादीवरून बेगमपुरा पोलिसांनी २६ मार्च रोजी गुन्हा दाखल केला आणि आस्मा खान व या घोटाळ्याचा मास्टरमाइंड डॉ. मझहर खान याला बेड्या ठोकल्या.

हेही वाचाः बोगस पदवी घोटाळ्याच्या मुळाशी जाण्याचा पोलिसांचा प्रयत्न, आता तपासाची व्याप्ती वाढवून ‘प्राधिकारी मासे’ गळाला लावणार का?

पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त तथा तपास अधिकारी संपत शिंदे आणि सिटी चौक ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक तथा सहायक तपास अधिकारी अजित दगडखैर हे तपासाची चक्रे वेगाने फिरवून या बोगस पदवी घोटाळ्याचे वेगवेगळे कंगोरे शोधून या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी आज अचानक या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस आयुक्त संपत शिंदे यांच्याकडून काढून घेतला आणि त्यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे अधिकारी असलेले गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांच्याकडे हा तपास दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचाः बोगस पदवी घोटाळाः कोहिनूर महाविद्यालयातील ‘या’ १२ प्राध्यापकांच्या एमफिल, पीएचडी संशयास्पद, अनेकांकडे ‘लापतागंज’ विद्यापीठाच्या पदव्या?

बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सुरूवातीला या प्रकरणाचा सहायक पोलिस निरीक्षक शेषराव खटाणे यांच्याकडे देण्यात आला होता. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून त्यात काही तरी मोठे रॅकेट असण्याची शक्यात वाटल्यामुळे पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनी या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस आयुक्त संपत शिंदे यांच्याकडे सोपवला होता. सहायक पोलिस आयुक्त शिंदे यांनी या तपास कामी सहायक तपास अधिकारी म्हणून सिटी चौक ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अजित दगडखैर यांना सहायक तपास अधिकारी म्हणून सोबतीला घेतले होते.

हेही वाचाः ‘स्वाभिमाना’चा चुथडा: मराठी लिहिता-वाचताही न येणाऱ्याला बोगस पदव्यांच्या आधारे अध्यापकाची नियुक्ती दिल्याप्रकरणी प्रा. डॉ. शंकर अंभोरे गजाआड

या प्रकरणाची तपास टीम बोगस पदवी घोटाळ्यातील एक एक कंगोरे शोधून या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत होती. या प्रकरणात आजपर्यंत अनेकांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत. हे सगळे सुरू असतानाच आज अचानक या प्रकरणाचे तपास अधिकारीच बदलण्यात आल्याची माहिती पोलिसांतील सूत्रांनी दिली. ही टीम कोहिनूर महाविद्यालयातील १२ प्राध्यापकांच्या बोगस पदव्यांच्याही शोध घेत होती. तपासाचा भाग म्हणून ही टीम आज खुलताबादला कोहिनूर महाविद्यालयात जाऊनही आली होती. या तपासात टीमच्या हाती अनेकांच्या बोगस पदव्या हाती लागल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

हेही वाचाः कोहिनूर महाविद्यालयात १२ वर्षांपूर्वीच बोगस पदव्यांवर तीन जणांनी मिळवली सहायक प्राध्यापकाची नोकरी, ‘दयावान’ विद्यापीठाने केली फक्त मान्यता रद्द!

सहायक पोलिस आयुक्त संपत शिंदे यांच्या नेतृत्वातील टीम बोगस पदव्यांची झाडाझडती घेत असतानाच आज अचानक या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस आयुक्त संपत शिंदे यांच्याकडून काढून घेऊन तो त्यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे अधिकारी असलेले गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांच्याकडे देण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नागपुरातील बोगस शालार्थ आयडीचे प्रकरण गाजत असतानाच छत्रपती संभाजीनगरातील (औरंगाबाद) हे बोगस पदव्यांचे प्रकरण उघडकीस आले. त्यामुळे राज्याच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ माजलेली असतानाच तपास अधिकारी नेमका का व कश्यामुळे बदलण्यात आला? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

हेही वाचाः बोगस एमफिलवर बायको-भावाच्या पीएचडी प्रवेशप्रकरणी ‘कोहिनूर’चा अध्यक्ष डॉ. मझहर खान गजाआड, तरीही विद्यापीठात पाठराखण करणारा ‘विष्णू’आका कोण?

हेही वाचाः उच्च शिक्षणमंत्र्यांच्याच कॉलेजमध्ये बोगस प्रवेश दाखवून तयार केल्या शिवाजी विद्यापीठाच्या बनावट पदव्या आणि कोहिनूर महाविद्यालयात मिळवली नोकरी!

निर्णयामागे राजकीय दबाव?

कोहिनूर शिक्षण संस्था आणि कोहिनूर महाविद्यालयातील बोगस पदवी घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली असताना आणि नागपूरच्या बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याप्रमाणेच हा घोटाळाही गाजण्याची शक्यता असतानाच या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस आयुक्तांकडून गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकांकडे देण्याचा निर्णय राजकीय दबावापोटी घेण्यात आल्याची चर्चा आहे. या प्रकरणात एका मंत्र्याच्या फोन आल्यामुळे सगळी चक्रे फिरल्याचीही चर्चा आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!