भंते अभयपुत्र प्रकरणात ‘संबोधी’च्या हत्तीअंबीरेंचा भिक्खू संघाविरुद्धच द्रोह, ‘उपऱ्यां’ना हाताशी धरून धम्म चळवळ बदनाम करण्याचे षडयंत्र!


सुरेश पाटील/ छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद):  छत्रपती संभाजीनगरातील (औरंगाबाद) ऐतिहासिक बुद्ध लेणीच्या पायथ्याशी असलेल्या विजयिंद अरण्यविहाराच्या जागेवरून भंते अभयपुत्र यांच्याशी वाद उभा करून संबोधी अकादमीचे संस्थापक भीमराव हत्तीअंबीरे यांनी धम्म चळवळच संशयाच्या भोवऱ्यात उभी केली आहे. पैसा आणि सत्ता हाती असल्यामुळे हत्तीअंबीरे यांना भिक्खू संघही गौण वाटू लागला असून भिक्खू संघाच्या नियमांनुसार धम्म प्रसारासाठी चीवर परिधान केलेले भंते अभयपुत्र यांचा मूळ नावाने उल्लेख करून हत्तीअंबीरे यांनी भिक्खू संघाविरुद्धच द्रोह केला आहे. विजयिंद अरण्यविहाराची जागा बळकावण्याच्या हेतुने ‘बाहेर’च्या लोकांना हाताशी धरून हत्तीअंबीरे यांनी धम्म चळवळच बदनाम करण्याचे षडयंत्र रचल्याचे एकूण घटनाक्रमावरून दिसू लागले आहे.

ऐतिहासिक बुद्ध लेणी क्रमांक ७  च्या पायथ्याशी भंते अभयपुत्र यांनी विजयिंद अरण्यविहार स्थापन केले आहे. गट क्रमांक २९ मध्ये असलेल्या या विहाराच्या परिसरात प्रारंभी संबोधी अकादमीचे भीमराव हत्तीअंबीरे यांनी भंते अभयपुत्र यांच्याशी संधान साधून बोधी वृक्षाची झाडे लावली. ही झाडे लावण्यामागे हत्तीअंबीरे यांचा धम्म चळवळीला हातभार लावण्याचा हेतू असल्याचा समज झाल्यामुळे भंते अभयपुत्र यांनी त्यावर कोणताही आक्षेप घेतला नाही. झाडे लावल्यानतंर हत्तीअंबीरे यांनी तेथे फलकही लावला. त्यावरही भंते अभयपुत्र यांनी आक्षेप घेतला नाही. पण भीमराव हत्तीअंबीरे यांचा या मागे जमीन बळकवण्याचा डाव आहे, हे भंते अभयपुत्र यांच्या लक्षातच आले नाही.

आवश्य वाचाः बाबासाहेबांच्या पीईएसमध्ये संघाचा ‘ऍनाकोंडा’, संस्थेच्या सदस्यपदी दोन भाजप समर्थकांची वर्णी, ‘महाउपासक’ गायकवाडांकडून ‘रेशीमबागे’ची उपासना!

हत्तीअंबीरे यांनी या झाडांची निगाराखण्याच्या नावाखाली ठिबक सिंचनाची सोय केली, एक जोडपेही आणून ठेवले. त्यांना राहण्यासाठी पत्र्याचे एक शेडही ठोकले. त्यानंतर हत्तीअंबीरे यांनी संबोधी अकादमीच्या विद्यार्थ्यांना दररविवारी तेथे आणून मोठ्या आवाजात ध्वनीक्षेपक लावून नाचगाणे सुरू केले. त्यावर भंते अभयपुत्र यांनी आक्षेप घेतला आणि वादाची ठिणगी पेटली.

हेही वाचाः बाबासाहेबांच्या पीईएसमध्ये संघाच्या ऍनाकोंडाच्या घुसखोरीमुळे आंबेडकरी समाज संतप्त, २० ऑगस्टला ठरणार आंदोलनाची दिशा

त्यानंतर हत्तीअंबीरे यांनी भंते अभयपुत्र यांची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल केली. भंते अभयपुत्र यांना धमकावण्यास सुरूवात केली. आमच्या नादाला लागला तर तुझे हातपाय तोडून टाकीन. ही जागा तुझ्या बापाची जागा आहे का? महापालिकेच्या अतिक्रमण पथकाला सांगून विहाराचे अतिक्रमण पाच मिनिटात हटवायला लावू शकतो, अशा अर्वाच्च भाषेत हत्तीअंबीरे यांनी भंते अभयपुत्र यांचा पाणउतारा केला. अनुसूचित जातीच्या गोरगरिब पोरांचे पोट मारून कमवलेल्या पैश्यामुळे चढलेल्या मग्रुरीमुळे हत्तीअंबीरे यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून भंते अभयपुत्र यांना विजयिंद अरण्यविहारात जाण्यास मज्जाव केला. त्यानंतर भंते अभयपुत्र भिक्खू संघाला घेऊन आमरण उपोषणाला बसले. प्रशासनाने त्यांना विजयिंद अरण्यविहारात जाण्याची परवानगी दिली आणि त्यांनी उपोषण मागे घेतले.

एकट्या अभयपुत्र नव्हे, भिक्खू संघाविरुद्धच द्रोह!

भंते अभयपुत्र यांचे उपोषण सुटल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे ३ मार्च रोजी भीमराव हत्तीअंबीरे यांनी संबोधी अकादमीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी भंते अभयपुत्र यांचा उल्लेख वारंवार त्यांच्या मूळ नावाने म्हणजेच आनंद लांजेवार असाच केला. भंते अभयपुत्र हे भिक्खू नसून आनंद लांजेवार ही व्यक्ती आहे, असे भासवण्याचा प्रयत्न हत्तीअंबीरे यांच्याकडून पत्रकार परिषद आणि महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांकडेही केला गेला. भंते अभयपुत्र यांनी भिक्खू संघाच्या नियमानुसार गृहस्थ जीवनाचा त्याग करून दीक्षा घेतली आणि चिवर परिधान केले आहे.

हेही वाचाः ‘पीईएस’मध्ये संघाचा ऍनाकोंडाः आंबेडकरी समाजाच्या संतापानंतर डॉ. एस. पी. गायकवाडांची कल्टी; आता म्हणतात ना बैठक झाली, ना सदस्य नेमले!

ज्या दिवशी त्यांनी चिवर परिधान केले, त्याच दिवशी त्यांचे मूळ नाव आपोआपच गळून पडले आहे. तरीही हत्तीअंबीरे यांनी भंते अभयपुत्र यांना वारंवार आनंद लांजेवार असे संबोधून एकट्या भंते अभयपुत्र यांचाच नव्हे तर संबंध भिक्खू संघाविरुद्धच द्रोह करून त्यांचा अपमान केला आहे. एरवी धम्म चळवळीचे संरक्षण घेऊन कोट्यवधींची माया कमवणाऱ्या हत्तीअंबीरे यांनी विजयिंद अरण्यविहाराच्या परिसरातील जमिनीच्या तुकडा बळकावण्याच्या शुद्र हेतूपायी भिक्खू संघातील भंते हे चिवर परिधान केल्यानंतरही गृहस्थ जीवन जगतात, असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

हत्तीअंबीरेंनाच आक्षेप का?

भीमराव हत्तीअंबीरे यांनी बुद्ध लेणी क्रमांक ७ च्या पायथ्याशी असलेले विजयिंद अरण्यविहार हे गट क्रमांक २९ मधील शासकीय जागेवरील अतिक्रमण आहे, अशी हाकाटी पिटण्यास सुरूवात केली आहे. ते हटवण्यासाठी ते महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून सर्वशक्तीनिशी प्रयत्न करत आहेत. धम्म आणि धम्म चळवळीशी संबंध नसलेल्या चांदणे, डुमणेसारख्या ‘बाहेर’च्या लोकांना हाताशी धरून त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसवले. हत्तीअंबीरे हे दबावतंत्राचा वापर करून भंते अभयपुत्र यांच्या निमित्ताने भिक्खू संघालाच आपल्या वळचणीला बांधण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना?, अशी शंकाही यानिमित्ताने घेतली जाऊ लागली आहे.

हेही वाचाः बाबासाहेबांच्या ‘पीईएस’मध्ये संघाच्या ऍनाकोंडाच्या घुसखोरीविरुद्ध आंबेडकरी जनतेचा एल्गार, विभागीय आयुक्तालयावर धडकणार महामोर्चा!

फेब्रुवारी २०२३ मध्ये भीमराव हत्तीअंबीरे यांचे बंधू सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांनी ११० बौद्ध भिक्खूंच्या सहभागासह परभणी ते चैत्यभूमी अशी अस्थिकलश धम्म पदयात्रा काढली होती. त्यासाठी थायलंडच्या आंतरराष्ट्रीय भिक्खू संघाकडून किती पैसै उकळले, हे अजून बाहेर आलेले नाही. परंतु आम्ही धम्म चळवळीच्या प्रसारासाठी किती काम करतो, हे दाखवण्याचा हत्तीअंबीरे यांनी या निमित्ताने केलेला प्रयत्न केवळ ढोंग होते, हेच भीमराव हत्तीअंबीरे यांनी विजयिंद अरण्यविहारच्या जागेवर आक्षेप घेऊन ते अतिक्रमण हटवण्यासाठी सुरू केलेल्या षडयंत्रामुळे उघड झाले आहे. समजा ही जागा शासकीय जमीन आहे आणि भंते अभयपुत्र यांनी तेथे अतिक्रमण केले आहे, असे गृहित धरले तरी त्यावर भीमराव हत्तीअंबीरेंना आक्षेप असण्याचे कारणच काय? बौद्ध धम्माच्या बाहेरील व्यक्तीने या जागेवर आक्षेप घेतला असता तर ते समजण्यासारखे होते. परंतु अन्य कुणीही आक्षेप न घेता हत्तीअंबीरे यांनीच आक्षेप घेत भंते अभयपुत्र यांच्या निमित्ताने भिक्खू संघ आणि धम्म चळवळच बदमान करण्याचे षडयंत्र रचले असल्यामुळे त्यांचा खरा चेहरा या निमित्ताने समोर आला आहे.

हेही वाचाः पीईएसमध्ये ‘आरएसएस’च्या घुसखोरीविरुद्ध धडकला आंबेडकरी जनतेचा विभागीय आयुक्तालयावर मोर्चा, तरूणाईने दिला थेट इशारा

उपासकांनो, ही मग्रुरी मोडून काढा!

अन्य धर्मीयांच्या धर्मगुरूंपेक्षा भिक्खू संघाची देशात वेगळी प्रतिमा आणि प्रतिष्ठा आहे. काही विशिष्ट धर्माचे धर्मगुरू गांजा मारतात, चिलीम ओढतात, व्याभिचार करतात, अनैतिक मार्गांचा अवलंब करतात, असे चित्र वारंवार समोर आले आहे. परंतु भिक्खू संघाच्या बाबतीत तसे कधीच झाले नाही. परंतु बुद्ध लेणी परिसरातील जमीन बळकावण्याच्या शुद्र हेतूपायी भीमराव हत्तीअंबीरे हे तसे चित्र केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आणि जगात निर्माण करू पहात आहेत. ही धम्म चळवळ आणि भिक्खू संघासाठी धोक्याची घंटा असून एखाद्या व्यक्तीच्या स्वार्थासाठी धम्म चळवळ आणि भिक्खू संघ बदनाम होऊ द्यायचा काय? याचा विचार करण्याची वेळ आली असून बौद्ध उपासकांनी रस्त्यावर उतरून वेळीच ही मग्रुरी मोडून काढली नाही तर भविष्यात भिक्खू संघ आणि धम्म चळवळीला ग्लानी आल्याशिवाय राहणार नाही.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!