जालनाः मराठा आरक्षणप्रश्नी जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणास बसलेले मनोज जरांगे यांची प्रकृती आणखीच खालावली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना सलाइन लावून उपचार सुरू केले आहेत. जरांगे यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस असून गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्या पोटात अन्नाचा कणही गेलेला नाही. आज नवव्या दिवशी जरांगे यांची प्रकृती आणखी खालावल्यामुळे डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून सलाइन लावले आहे. तरीही जरांगे हे उपोषणावर ठाम आहेत.
मराठवाड्यातील मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जातीची प्रमाणपत्रे देण्यात यावीत, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसले आहेत. राज्य सरकार जोपर्यंत मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जातीची प्रमाणपत्रे देण्याबाबतचा जीआर काढत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी जाहीर केली आहे.
दरम्यान, काल राज्य सरकारचे शिष्टमंडळ आंतरवाली सराटीमध्ये येऊन जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून गेले. मी आरक्षण घेतल्याशिवाय उठणार नाही. गरज भासल्यास सलाइन लावतो, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी राज्य सरकारच्या शिष्टमंडळापुढे मांडली होती.
मराठा आरक्षणासाठी सरकार तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही सरकारला किमान महिनाभर तरी वेळ द्या, अशी विनंती राज्य सरकारच्या वतीने गिरीश महाजन यांनी जरांगे पाटील यांना केली होती. त्यावर मी तुम्हाला चार दिवसांचा वेळ देतो. आता आरक्षण घेतल्याशिवाय उठणार नाही. विनाकारण मी ताणून धरणार नाही. आरक्षण दिल्याचा अध्यादेश काढा, तेव्हा मी तुमचे स्वागत करेन आणि उपोषण सोडेन, असे जरांगे पाटील यांनी या शिष्टमंडळाला सांगितले होते.
२९ ऑगस्टपासून जरांगे पाटील हे उपोषणास बसलेले आहेत. काल मंगळवारीही ते झोपूनच होते. आज त्यांची प्रकृती आणखी खालावल्यामुळे डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून सलाइन लावले आहे. जरांगे पाटील यांना अशक्तपणा जाणवत असून त्यांना बोलण्यासही त्रास होत आहे. तरीही ते उपोषणावर ठाम आहेत.