
मुंबईः द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या निवडणुकीसाठी ३ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आलेल्या मतदार यादीनुसारच सोसायटीची निवडणूक होईल, असा निर्वाळा देत मुंबई उच्च न्यायालयाने गुरूवारी या सोसायटीच्या निवडणुकीतील अध्यक्षपदाचे उमेदवार आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांची याचिका फेटाळून लावली. उच्च् न्यायालयाच्या या निर्णयामुळे ३ ऑक्टोबर २०२५ नंतर नोंदणी झालेल्या १ हजार ४६४ सभासदांना मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे.
द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या व्यवस्थापन समितीची निवडणूक या आधी १४ मार्च रोजी होणार होती. परंतु धर्मादाय आयुक्त अमोघ कलोटी यांनी निवडणुकीच्या एक दिवस आधी म्हणजेच १३ मार्च रोजी ही निवडणूक पुढे ढकलली आणि उपसमितीमार्फत पात्र मतदारांची यादी नव्याने तयार करण्याचा आदेश दिला होता. पात्र मतदारांची यादी अंतिम झाल्यानंतरच निवडणुकीचे नवीन वेळापत्रक जाहीर केले जाईल, असेही धर्मादाय आयुक्तांच्या आदेशात नमूद करण्यात आले होते.
धर्मादाय आयुक्तांच्या या आदेशाला माजी राज्यसभा सदस्य आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, विश्वस्त विश्वास उटगी, धनंजय शिंदे आणि स्वाती दाते यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. धर्मादाय आयुक्तांनी आदेश पारित करण्यापूर्वी सदस्यांना किंवा संस्थेला आपली बाजू मांडण्याची संधी दिली नाही. त्यामुळे या प्रक्रियेच्या निष्पक्षतेबद्दल गंभीर चिंता निर्माण झाली आहे. पारंपरिकरित्या मर्यादित मतदारांसह शांतपणे पार पडणाऱ्या या निवडणुकीत नवीन सदस्य नोंदणीच्या अर्जात लक्षणीय वाढ झाली असून मार्च २०२६ पर्यंत १,४०० हून अधिक नवीन सदस्यांची नोंदणी झाली आहे, असा दावा केतकर गटाने याचिकेत केला होता.
याचिकेवरील सर्व पक्षकारांचा युक्तिवाद गेल्या आठवड्यात पूर्ण झाला होता. न्या. फरहान दुबाश यांनी या याचिकांवरील निकाल राखून ठेवला होता.न्या. फरहान दुबाश यांनी या याचिकांवर निकाल देताना गुरूवारी दोन्ही याचिका फेटाळून लावल्या आणि धर्मादाय आयुक्तांच्या १३ मार्च रोजीच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला. द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या निवडणुकीसाठी ३ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर झालेली मतदारयादीच गृहित धरली जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ३ ऑक्टोबर २०२५ रोजी निवडणूक जाहीर झाल्यानंतर नव्याने सभासद म्हणून समाविष्ट करण्यात आलेले १ हजार ४६४ सभासद मतदानास अपात्र ठरले आहेत.
एशियाटिक सोसायटीच्या व्यवस्थापन समितीच्या १९ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. मात्र अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत माजी राज्यसभा सदस्य व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आणि भाजपचे माजी राज्यसभा सदस्य डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या थेट लढतीची शक्यता आहे. केतकर आणि सहस्त्रबुद्धे यांच्या पॅनेलने या निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या आहेत.
१८०४ मध्ये स्थापन झाली सोसायटी
भारतासंबंधी कला, विज्ञान आणि संस्कृतीच्या क्षेत्रातील संशोधन आणि ज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी तत्कालीन मुंबईचे रेकॉर्डर किंवा किंग्ज जज्ज जेम्स मॅकिंतोश यांनी १८०४ मध्ये एशियाटिक सोसायटीची स्थापना केली होती. दोनशे वर्षांहून जुनी ही संस्था दुर्मिळ हस्तलिखिते, प्राचीन ग्रंथ आणि भारताच्या सांस्कृतिक वारशाचा ठेवा जपणारी आहे.
