छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): विहित प्रक्रियेचे पालन न करताच मौलाना आझाद कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी फेरनियुक्ती मिळवलेले डॉ. मझहर अहेमद फारूकी यांची कन्या डॉ. समरीन फातेमा मझहर अहेमद फारूकी यांची मौलाना आझाद महाविद्यालयात रसायनशास्त्र विषयाच्या सहायक प्राध्यापकपदी करण्यात आलेली नियुक्तीही नियमबाह्यच असल्याचे धक्कादायक पुरावे न्यूजटाऊनच्या हाती आले आहेत.
मौलाना आझाद एज्युकेशन सोसायटीच्या रोजाबाग येथील मौलाना आझाद कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मझहर फारूकी यांची दुसऱ्या टर्मसाठी प्राचार्यपदी झालेली फेरनियुक्ती विद्यापीठ अनुदान आयोगाची मार्गदर्शक तत्वे आणि महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या शासन निर्णयाची पायमल्ली करूनच झालेली आहे. डॉ. फारूकी यांच्या नियुक्तीतील अनियमितता आणि बेकायदेशीरपणाचा भंडाफोड न्यूजटाऊनने यापूर्वीच केला आहे. आता डॉ. फारूकी यांची कन्या डॉ. समरीन फातेमा यांचीही नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे धक्कादायक पुरावे न्यूजटाऊनच्या हाती आले आहेत.
महाराष्ट्र शासनाने ३ नोव्हेंबर २०१८ रोजी शासन निर्णय जारी करून उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील रिक्त पदे भरण्यावरील निर्बंध शिथील केल्यानंतर मौलाना आझाद महाविद्यालयाने शिक्षक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी १३ फेब्रुवारी २०१९ रोजी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केला. त्या अर्जानुसार शासनाने २५ फेब्रुवारी २०१९ रोजी या महाविद्यालयाला प्राणीशास्त्रातील १, रसायनशास्त्रातील ३, गणितातील १ आणि भौतिकशास्त्रातील १ अशी सहायक प्राध्यापकांची एकूण ६ पदे भरण्यास नाहरकत प्रमाणपत्र दिले.
मौलाना आझाद महाविद्यालयाला सहायक प्राध्यापकाची सहा रिक्त पदांची भरती करण्यास मंजुरी देताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाने एकूण १२ अटी व शर्ती घालून दिल्या होत्या. त्यात ‘नाहरकत प्रमाणपत्र मिळाल्याच्या दिनांकापासून पद भरण्याची कार्यवाही सहा महिन्यांच्या आत पूर्ण करण्यात यावी. सहा महिन्यांनंतर सदरचे नाहरकत प्रमाणपत्र आपोआप रद्द समजण्यात येईल,’ अशी बाराव्या क्रमांची मुख्य अट होती.
एनओसी एक्सपायर, तरीही घेतल्या मुलाखती
सहायक प्राध्यापकाची रिक्त पदे भरण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिलेली सहा महिन्यांची मुदत ऑगस्ट २०१९ मध्ये संपुष्टात आली. ही मुदत संपुष्टात येत असल्यामुळे मौलाना आझाद एज्युकेशन सोसायटीने २० ऑगस्ट २०१९ रोजी छत्रपती संभाजीनगरच्या (औरंगाबाद) विभागीय सहसंचालकांना मुदतवाढीची विनंती करणारे पत्र दिले आणि शासनाकडून अधिकृत मुदतवाढ मिळण्याच्या आधीच २८ व २९ सप्टेंबर २०१९ रोजी सहायक प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्यासाठी मुलाखती ठेवल्या. त्यात रसायनशास्त्र विषयासाठी डॉ. मझहर फारूकी यांची कन्या डॉ. समरीन फातेमा मझहर अहेमद फारूकी २८ सप्टेंबर रोजी मुलाखतीला हजर राहिल्या आणि निवड समितीने त्यांची सहायक प्राध्यापकपदी निवडही केली.
मुलाखती आटोपल्यानंतरची मुदतवाढ वैध कशी?
उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिलेली सहा महिन्यांची मुदत संपून महिना उलटलेला असताना आणि शासनाकडून मुदतवाढीचे अधिकृत पत्र हाती पडलेले नसतानाही नियमबाह्यपणे सहायक प्राध्यापकाची रिक्त पदे भरण्यासाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि त्यात प्राचार्य डॉ. मझहर अहेमद फारूकी यांची कन्या डॉ. समरीन यांची सहायक प्राध्यापकपदी निवड करण्यात आली. मुलाखतीची ही प्रक्रिया नियमबाह्यपणे पार पाडण्यात आल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी म्हणजेच २१ नोव्हेंबर २०१९ रोजी तत्कालीन विभागीय सहसंचालक डॉ. सतीश देशपांडे यांनी स्वतःच्या अधिकारात मौलाना आझाद एज्युकेशन सोसाटीला मुदतवाढीचे पत्र दिले. तोपर्यंत संपूर्ण निवड प्रक्रिया आटोपण्यात आली होती फक्त नियुक्ती आदेश देणेच बाकी ठेवण्यात आले होते.
विशेष म्हणजे या निवड समितीवर शासन प्रतिनिधी म्हणून स्वतः डॉ. सतीश देशपांडेच हजर होते. नाहरकत प्रमाणपत्राची सहा महिन्यांची मुदत संपुष्टात आलेली आहे आणि शासनाकडून अद्याप अधिकृत मुदतवाढ मिळालेली नाही, हे माहीत असूनही डॉ. देशपांडे यांनी या मुलाखतीच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतला नाही. त्यामुळे या नियमबाह्य निवड प्रक्रियेत डॉ. देशपांडेही सामील झाले होते, हे स्पष्ट होते.
विभागीय सहसंचालकांची खाबुगिरी
ज्या भरती प्रक्रियेसाठी शासनाने दिलेली सहा महिन्यांची मुदत संपल्यानंतर मुलाखती घेण्यात आलेल्या असल्यामुळे ही एकूणच भरती प्रक्रिया नियमबाह्य ठरते. असे असतानाही तत्कालीन विभागीय सहसंचालक डॉ. सतीश देशपांडे यांनी निवड समितीच्या अहवालावर स्वाक्षऱ्या कशा केल्या? आणि मुलाखतीची प्रक्रिया आटोपल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी स्वतःच्या अधिकारात मुदतवाढीचे पत्र कसे दिले? हा संशोधनाचा विषय असून या प्रकरणातून विभागीय सहसंचालक कार्यालयाची खाबुगिरीही उघडकीस आली आहे.
सांगा डॉ. फारूकी, यात खोटे आणि चुकीचे काय?
डॉ. मझहर फारूकी यांच्या प्राचार्यपदावरील फेरनियुक्तीचा घोळ आणि फिटनेस प्रमाणपत्र सादर करण्यास त्यांच्याकडून वारंवार होत असलेली टाळाटाळ यावर न्यूजटाऊनने प्रकाश टाकल्यानंतर डॉ. फारूकी यांनी न्यूजटाऊनला नोटीस बजावून खोटी आणि चुकीची माहिती प्रकाशित करून आपली बदनामी केल्याचा कांगावा त्यांनी केला आहे. डॉ. समरीन फातेमा यांच्या निवड प्रक्रियेबाबतच्या या तपशीलातील खोटे आणि चुकीचे काय? या दस्तावेजांपैकी कोणता दस्तावेज ‘वास्तविक’ नाही? हे आता डॉ. फारूकी यांनीच सांगावे, असे न्यूजटाऊनचे त्यांना जाहीर आव्हान आहे.
कोणत्याही महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून समाजाला प्रामाणिकपणा आणि उच्च नैतिक आचरणाची अपेक्षा असते. ही अपेक्षा शासनाने निर्धारित केलेल्या ‘व्यावसायिक आचारसंहितेत’ही समाविष्ट आहे. डॉ. समरीन यांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेत त्यांनी कोणता प्रामाणिकपणा आणि नैतिकतेचा आदर्श घालून दिला? याचाही खुलासा त्यांनीच करावा, असेही आमचे त्यांना आव्हान आहे.