
जालनाः निवडून येईपर्यंत जनतेच्या चरणी लीन होणारे राजकारणी एकदा निवडून आल्यानंतर कसे शिरजोर होतात, याचाच प्रत्यय भाजप आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिला आहे. एका गावातील टिकाकारावर बोलताना ते चांगलेच घसरले. ‘तुझ्या अंगावर जे कपडे, बूट व चपला आहेत, ते आम्हीच दिले. तुझ्या हातातलं डबडं ते देखील आमच्यामुळेच आहे. तुझ्या बापाला पेरणीचे पैसे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले’ अशी भाषा त्यांनी जाहीर भाषणात वापरली. त्यांच्या या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
जालना जिल्ह्यातील परतूर येथे सोलार योजनेच्या शुभारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात आ. लोणीकरांनी भाषण केले. आपल्या भाषणात आ. लोणीकर म्हणाले की, ‘ते कुचळवाट्यावर बसलेले पाच-सहा कारटे… त्याच्या मायचा पगार बबनराव लोणीकरने केला. त्याच्या बापाला पेरणीसाठी सहा हजार रुपये प्रधानमंत्री मोदी यांनी दिले. तुझ्या मायच्या, तुझ्या बहिणीच्या व बायकोच्या नावावर लाडकी बहीण योजनेचे पैसे आले ते आम्हीच दिले.’
आ. लोणीकर एवढ्यावरच थांबले नाहीत. तर ते पुढे म्हणाले,’तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारने दिले. तुझ्या पायातील बूट व चप्पल आमच्यामुळेच आहेत. तुझ्या हातातलं मोबाईलचं डबडं ते देखील आमच्यामुळेच आहे. आमचेच पैसे घेतो आणि आमच्यावरच तंडग्या वर करतो. आमचंच घेतो आणि आम्हालाच बोलतो? आमचंच घेऊन आमच्याबद्दल लिहितोस का?’ अशी मग्रुरीची भाषा त्यांनी वापरल्याचे व्हायरल व्हिडीओत ऐकायला मिळते. पहा व्हिडीओः
ही ब्रिटिशांची देशी आवृत्तीः दानवे
भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांकडून टिकेची झोड उठवण्यात येत आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) आमदार अंबादास दानवे यांनी बबनराव लोणीकर यांचा हा व्हिडीओ ‘एक्स’ या समाजमाध्यमावर शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
‘ही ब्रिटिशांची देशी आवृत्ती! लोकशाहीत ही भाषा बरी नव्हे बबनराव, कारण.. तुमचे कपडे, बूट या जनतेमुळेच आहेत. तुमची आमदारकी जनतेमुळे… तुमच्या कारमधील डिझेल जनतेमुळे… तुमचे विमानाचे तिकिटही जनतेमुळे…तुमची नेतागिरी जनतेमुळे… तुमचं विधानसभेतील स्तानही जनतेमुळेच आहे…यांचे बोल लक्षात ठेवा, निवडणूक येते आहे!.’ अशा शब्दांत आ. दानवे यांनी बबनराव लोणीकरांचा समाचार घेतला आहे.
जनतेला असे हिणवणे बरे नव्हे: काँग्रेस
आ. लोणीकरांच्या या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही टिकास्त्र सोडले असून भाजपने त्यांनी निलंबित करावे, अशी मागणी केली आहे. ‘हे खूपच घृणास्पद वक्तव्य आहे. लोणीकरांनी किती लोणी खाल्ले, किती तूप खाल्ले, त्याचे काय काय केले, हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो. अशा पद्धतीने जनतेला, शेतकऱ्याला कोणी हिणवत असेल तर आम्ही ते सहन करणार नाही. लोणीकरांनी याबाबत माफी मागावी अथवा भाजपने त्यांना पक्षातून निलंबित करावे, अन्यथा आम्ही त्यांना कुठल्याही गावात फिरू देणार नाही,’ असा इशाराही सपकाळ यांनी दिला आहे.
बापाला भिकारी समजतात का?: आ. पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनीही आ. बबनराव लोणीकरांच्या वक्तव्यावर टिका केली आहे. ‘भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांवर उपकार करत असल्याची केलेली भाषा म्हणजे त्यांच्या पक्षाचे संस्कार दर्शवते. एकीकडे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला असताना त्यांना दिलासा देण्याऐवजी उपकाराची भाषा नेत्यांना शोभते का? भाजप नेते शेतकरी बापाला भिकारी समजतात का? निवडणुकीआधी नरमी दाखवणारे, कर्जमाफीचे आश्वासन देऊन सत्ता मिळवणारे आता शेतकऱ्यांवर खालच्या भाषेत बोलून गुरगुरत असतील तर अशा लबाड लांडग्यांना शेतकऱ्यांचा आसूड दाखवावाच लागेल,’ असे आ. रोहित पवार यांनी म्हटले आहे.
