नवी दिल्ली: लोकप्रिय उर्दू कवी, शायर, गीतकार गुलजार यांना ५८ वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. गुलजार यांच्यासोबतच संस्कृत पंडित रामभद्राचार्य यांनाही ज्ञानपीठ जाहीर झाला आहे. ज्ञानपीठ पुरस्कार निवड समितीने आज या दोघांच्या नावाची घोषणा केली.
ज्ञानपीठ हा भारतातील सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार आहे. भारतीय साहित्यातील अतुलनीय योगदानाबद्दल भारतीय ज्ञानपीठ स्ट्रस्टच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. १९६५ मध्ये पहिला ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. प्रसिद्ध मल्याळम कवी जी. शंकर कुरूप यांना त्यांच्या ओडक्कुझल या काव्यसंग्रहासाठी हा पुरस्कार जाहीर झाला होता. ११ लाख रुपये रोख, मानपत्र आणि वाग्देवीची कांस्यमूर्ती असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे उर्दू कवी, शायर अशी ओळख असलेले गुलजार यांचे हिंदी चित्रपटसृष्टीत मोठे योगदान आहे.
कवी गुलजार यांचे संपूर्णसिंह कालरा असे आहे. गुलजार यांचा जन्म १८ ऑगस्ट १९३६ रोजी पंजाबमधील दीना शहरात झाला होता. आता दीना हे शहर पाकिस्तानात आहे.फाळणीनंतर गुलजार यांचे कुटुंब अमृतरमध्ये आले होते. त्यानंतर त्यांनी मुंबई गाठली आणि ते मुंबईतच स्थायिक झाले.
कवी गुलजार यांना उर्दू साहित्यातील योगदानाबद्दल २००२ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. २००४ मध्ये त्यांना पद्मभूषण नागरी सन्मानाने गौरवण्यात आले होते. २०१३ मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारही मिळाला. याशिवाय त्यांना पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाले आहे.
चित्रकुटमधील तुलसीपीठाचे संस्थापक आणि प्रमुख रामभद्राचार्य हे संस्कृत पंडित, हिंदू अध्यात्मिक नेते, शिक्षक आणि १०० हून अधिक पुस्तकांचे लेखक आहेत. रामभद्राचार्य यांना भारत सरकारने २०१५ मध्ये पद्मविभूषण देऊन सन्मानित केले होते. त्यांना २२ भाषांचे ज्ञान असल्याचे सांगितले जाते.