पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवले, मतदानाच्या तोंडावर निवडणूक आयोगाचा आदेश


मुंबईः  विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवले आहे. रश्मी शुक्ला यांच्या ठइकाणी तीन अधिकाऱ्यांची नावे पाठवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. विधानसभेचे मतदान १५ दिवसांवर असतानाच ही मोठी घडामोड घडली आहे.

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक निपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी रश्मी शुक्ला यांना पोलिस महासंचालकपदावरून हटवण्याची मागणी काँग्रेससह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवले असून त्यांच्या ठिकाणी तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे पाठवण्याचे निर्देश राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून राज्यातील राजकीय हिंसाचारात वाढ झाली आहे. विरोधी पक्षाचे उमेदवार आणि नेते मंडळींना धमकावले जात आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली आहे. काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) नेत्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. त्यामुळे पोलिस महासंचाल रश्मी शुक्ला यांना तातडीने पदावरून दूर करावे, असे पत्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांन निवडणूक आयोगाला पाठवले होते.

निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे आदेश दिल्यानंतर नव्या पोलिस महासंचालकांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मुख्य सचिवांच्या आदेशानुसार तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचे पॅनल स्थापन करून त्यांच्याकडे नव्या नवाबाबतचा अहवाल सादर करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. हे पॅनल आपला अहवाल राज्य सरकारला सादर करेल. त्यानंतर तो अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केला जाणार आहे. आज सायंकाळपर्यंतच नव्या पोलिस महासंचालकांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

कोणाची लागणार वर्णी?

राज्याचे नवीन पोलिस महासंचालक म्हणून विवेक फणसाळकर, संजयकुमार वर्मा आणि संजीवकुमार सिंघल या तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे चर्चेत आहेत. त्यापैकी मुंबईचे पोलिस आयुक्त असलेले विवेक फणसाळकर यांची निवड होण्याची दाट शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

शुक्लांवर फोन टॅपिंगचा आरोप

रश्मी शुक्ला यांच्यावर महाविकास आघाडीमधील काही नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याबाबत रश्मी शुक्ला यांची चौकशीही झाली होती. मात्र महाविकास आघाडीचे सरकार गेल्यावर महायुती सत्तेत आली आणि रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. रश्मी शुक्ला या १९८८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील अधिकारी म्हणून रश्मी शुक्ला यांची ओळख आहे.

महायुती सरकारची बेईमानी उघडः वडेट्टीवार

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी रश्मी शुक्ला यांची बदली करण्याच्या निवडणूक आयोगाचे स्वागत केले आहे. ‘राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचा निर्णय आज निवडणूक आयोगाने घेतला आहे. आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो. महायुतीचे सरकार बेईमानी करत होते हे आज स्पष्ट झाले.गंभीर स्वरूपाचे आरोप असलेल्या पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ देण्याची अशी कोणती मजबुरी महायुती सरकारची होती?, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पारदर्शक पद्धतीने होऊ नये म्हणून त्यांना सरकारने त्यांना मुदतवाढ दिली होती. असंवैधानिक मार्गाने आलेल्या सरकारने असंवैधानिक मार्गाने अधिकाऱ्यांना पदांवर बसवले होते हे आज स्पष्ट झाले आहे. मर्जीतील अधिकाऱ्यांना मुदतवाढ देऊन सत्तेचा दुरुपयोग महायुती सरकारने केला होता, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *