डॉ. अजित रानडे यांचा गोखले संस्थेच्या कुलगुरूपदाचा राजीनामा, पात्र-अपात्रतेच्या मुद्यावरून झाला होता वाद


पुणेः पुण्यातील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांनी कुलगुरूपदाचा राजीनामा दिला आहे. गोखले संस्थेचे कुलपती डॉ. संजीव संन्याल यांच्याकडे त्यांनी राजीनाम्याचे पत्र दिले आहे. डॉ. अजित रानडे हे कुलगुरूपदासाठी पात्र-अपात्र असल्याच्या मुद्यावरून मोठा वाद झाला होता. आता त्यांनी स्वतःच या पदाचा राजीनामा दिला आहे.

डॉ. अजित रानडे यांची गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेच्या कुलगुरूपदी निवड झाल्यानंतर वाद निर्माण झाला होता. डॉ. रानडे यांच्याकडे कुलगुरूपदासाठी आवश्यक पात्रता धारण करत नसल्याचा आक्षेप घेत त्यांना कुलगुरूपदावरून हटवण्याची मागणी करणाऱ्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्या तक्रारीवरून तत्कालीन कुलपती डॉ. बिबेक देबराय यांनी सत्यशोधन समिती स्थापन केली होती.

सत्यशोधन समितीने डॉ. रानडे हे कुलगुरूपदासाठी पात्र नसल्याचा अहवाल दिल्यानंतर डॉ. देबराय यांनी डॉ. अजित रानडे यांची कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द केली होती. त्या निर्णयाला डॉ. रानडे यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने कुलपती डॉ. देबराय यांच्या निर्णयाला स्थगिती देत डॉ. रानडे यांना दिलासा दिला होता. त्यानंतर डॉ. देबराय यांनीच कुलपतीपदाचा राजीनामा दिला होता.

डॉ. देबराय यांनी कुलपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या ठिकाणी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. संजीव संन्याल यांची कुलपतीपदी नियुक्ती करण्यात आली होती. कुलपतीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर डॉ. संन्याल यांनी डॉ. रानडे यांच्यावरील कारवाई मागे घेतल्याचे न्यायालयाला कळवले आणि त्यानंतर या वादावर पडदा पडला होता.

या वादावर पडदा पडलेला असतानाच डॉ. अजित रानडे यांनी कुलगुरूपदाचा राजीनामा कुलपती डॉ. संन्याल यांच्याकडे सादर केला. वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत आहे असे नमूद करून देशातील सर्वात चांगल्या संस्थेपैकी एक असलेल्या गोखले संस्थेचे अडीच वर्षे नेतृत्व करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

माझा राजीनामा २०२१ मध्ये संस्थेच्या कुलगुरूपदी माझ्या झालेल्या नेमणुकीसाठी कोणत्याही पद्धतीने त्रुटी किंवा अपात्रता दर्शवत नाही, असेही डॉ. रानडे यांनी राजीनामापत्रात नमूद केले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *