नवी दिल्लीः महाराष्ट्रासह देशभरात अनेक ठिकाणी रक्तपेढ्यांकडून रुग्णांच्या नातेवाईकांकडून रक्ताच्या पिशवीसाठी अव्वाच्या सव्वा रक्कम उकळण्यात येत असल्याचे आणि रुग्णांच्या नातेवाईकांची अडवणूक होत असल्याचे समोर आल्यानंतर केंद्रीय औषध नियामक मंडळ अर्थात डीसीजीआयने मोठा निर्णय घेतला आहे. रक्तही विकण्याची बाब नाही, रक्ताचा फक्त पुरवठा होऊ शकतो, असे स्पष्ट करत डीसीजीआयने रक्ताच्या पिशवीची विक्री करण्यावर बंदी घातली आहे. यापुढे रक्तपेढ्यांना रक्ताच्या पिशवीवर फक्त प्रक्रिया मूल्य आकारता येईल, असेही डीसीजीआयने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
देशभरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी अनेक रुग्णांना रक्ताची गरज भासते. अशा रुग्णांना लागणारे रक्त रुग्णालयांकडून किंवा खासगी अथवा सरकारी रक्तपेढ्यांकडून उपलब्ध करून दिले जाते. काही स्वयंसेवी संस्थाही रक्तपेढ्या चालवतात. परंतु अनेक रक्तपेढ्यांकडून रक्ताच्या पिशवीची विक्री करताना रुग्णांच्या नातेवाईकांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम उकळून त्यांची अडवणूक केली जात असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर डीसीजीआयने मोठे पाऊल उचलले आहे.
आता डीसीजीआयने या संदर्भातील नियमावलीच जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार आता कुणालाही रक्ताची विक्री करता यणार नाही. रक्ताचा फक्त पुरवठा केला जाऊ शकतो. त्यामुळे रक्ताच्या पिशवीवर यापुढे कोणतेही विक्रीमूल्य आकारता येणार नाही. रुग्णाला रक्त देण्याआधी त्यावर प्रक्रिया करून ते जतन करावे लागते. त्यामुळे रक्त पिशवीवर या प्रक्रियेसाठी लागणारा खर्चच आकारता येईल, असे डीसीजीआयने म्हटले आहे.
रक्तदान शिबिरांमधून गोळा करण्यात आलेले रक्त कोणत्याही रुग्णाला थेट चढवले जात नाही. त्या रक्तावर प्रक्रिया केली जाते. रक्तदान शिबिरामधून गोळा केलेल्या रक्तात रक्तदात्याच्या शरीरातील इतरही घटक असतात. हे घटक विलग करून लालपेशी, पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा अशा स्वरुपात हे रक्त शुद्ध केले जाते. त्यानंतर ते योग्य तापमानावर जतनही केले जाते. या सर्व प्रक्रियेचा खर्च प्रक्रिया खर्चात समाविष्ट होतो. या प्रक्रिया खर्चाच्या व्यतिरिक्त रक्ताच्या पिशवीवर कोणतेही विक्रीमूल्य आकारता येणार नाही, असे डीसीजीआयने स्पष्ट केले आहे.
केंद्र सरकारने २०२२ मध्ये जारी केलेल्या नियमावलीनुसार रक्ताचा प्रक्रिया खर्च निश्चित केला आहे. रक्तदात्याकडून घेण्यात आलेल्या रक्ताच्या प्रक्रियेवरील खर्च हा १ हजार ५५० रुपयांपेक्षा जास्त असू नये, असे या नियमावलीत स्पष्ट केले आहे. लालपेशी, प्लाझ्मा आणि प्लेटलेट्स यांच्यासाठी अनुक्रमे १ हजार ५५०, ४०० आणि ४०० रुपयांच्या प्रक्रिया खर्चाची मर्यादा घालून देण्यात आली हे. सरकारी रक्तपेढ्यांसाठी हा प्रक्रिया खर्च १ हजार १०० रुपये निश्चित करण्यात आला आहे.