टेनिसपटू सानिया मिर्झाचा संसार मोडला, क्रिकेटपटू शोएब मलिकने केले सना जावेदशी तिसरे लग्न!


इस्लामाबादः भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाचे वैवाहिक जीवन संपुष्टात आले आहे. पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी तिसरे लग्न केले आहे. त्याने तिसऱ्या लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

मागील अनेक दिवसांपासून सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत्या. सानिया मिर्झाने बुधवारीच एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामुळे तिच्या आणि शोएब मलिकच्या घटस्फोटांच्या अफवा अधिक वेगाने पसरू लागल्या होत्या.

शोएब आणि सानिया मिर्झा यांच्या घटस्फोटाच्या बातम्या येत असतानाच आज शोएब मलिकने तिसऱ्या लग्न सोहळ्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. एका समारंभात शोएब आणि सना यांचा निकाह झाल्याचे पाकिस्तानी माध्यमांनी म्हटले आहे. शोएबचे पहिले लग्न आयेशा सिद्दीकीशी, दुसरे लग्न सानिया मिर्झाशी तर तिसरे लग्न सना जावेदशी झाले आहे.

शोएब आणि सना जावेद एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या फार पूर्वीपासूनच येत होत्या. शोएबने अलीकडेच सना जावेदला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या आणि तिच्यासोबतचा एक फोटोही शेअर केला होता.

टेनिसपटू सानिया मिर्झा आणि शोएबमधील दुराव्याची बातमी पहिल्यांदा ११ नोव्हेंबर २०११ रोजी समोर आली होती. ‘टुटे दिल वाले लोग कहां जाते हैं?’ असे सानिया मिर्झावर इंस्टाग्रामवर लिहिले होते. त्यानंतर तिने मुलगा इझानसोबतचा एक फोटो शेअर करत ‘हा एक असा क्षण आहे जो मला कठीण काळातही धीर देतो,’ अशी पोस्ट सानियाने इंस्टाग्रामवर केली होती. शोएब मलिकने सानिया मिर्झाची फसवणूक केल्याचा दावा पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.

पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री जना जावेदशी तिसरा निकाह केला. त्यानेच इंस्टाग्रामवर ही छायाचित्रे शेअर केली.

कोण आहे सना जावेद?

शोएब मलिकची तिसरी पत्नी सना जावेद ही ३० वर्षांची असून ती प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री आहे. सनाने मॉडेलिंग करत आपल्या करिअरची सुरूवात केली होती. सना जावेदने २०१२ मध्ये ‘शहर-ए-जात’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तिने अनेक लोकप्रिय मालिकांमध्येही काम केले आहे.

‘खानी’ या रोमँटिक ड्रामामध्ये मुख्य भूमिका साकारल्यानंतर सना जावेदला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या भूमिकेसाठी तिला लक्स स्टाइल अवॉर्ड्ससाठीही नामांकन मिळाले होते. विशेष म्हणजे सना जावेदचेही यापूर्वी लग्न झाले होते. म्हणजेच शोएबचे हे तिसरे आणि सना जावेदचे दुसरे लग्न आहे. तिने २०२० मध्ये गायक उमेर जसवालशी लग्न केले होते. पण ते मोडले. लग्नानंतर सना जावेदने इंस्टाग्रामवरील तिच्या प्रोफाइलमध्ये नाव बदलून सना शोएब मलिक असे केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!