आसामच्या मंदिरात राहुल गांधींना प्रवेश नाकारला, म्हणाले: आता मंदिरात कोणाला प्रवेश द्यायचा हेही मोदी ठरवणार का?


गुवाहटीः काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला सुरूवात झाली असून सध्या ते आसाममध्ये आहेत. आसामच्या बटाद्रवा येथे असलेल्या श्रीमंत शंकरदेव यांच्या मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आले आहे. त्यामुळे राहुल गांधी कार्यकर्त्यांसह धरणे आंदोलनाला बसले आहेत. मला मंदिर प्रवेश का नाकारला जात आहे? मंदिरात कोणाला प्रवेश द्यायचा हेही आता मोदी ठरवणार का? असा संतप्त सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.

१५ व्या शतकातील आसामी संत आणि विद्वान श्रीमंत शंकरदेव यांचे जन्मस्थळ असलेल्या बटाद्रवा येथे हे मंदिर आहे. या मंदिरात जाण्यापासून राहुल गांधींना रोखण्यात आले आहे. आम्ही मंदिरात जाऊन दर्शन घेऊ इच्छितो. मी काय गुन्हा केला आहे की मी मंदिरात जाऊ शकत नाही?  आम्हाला कोणतीही समस्या निर्माण करायची नाही. आम्ही फक्त मंदिरात जाऊन प्रार्थना करू इच्छितो, असे राहुल गांधी म्हणाले.

आसाममध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेत आतापर्यंत अनेक अडथळे आणण्यात आले आहेत. आतापर्यंत दोन ठिकाणी या यात्रेवर हल्ले करण्यात आल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता विस्वा सरमा यांच्या इशाऱ्यावर हे सगळे होत आहे. या मागे भाजप आणि त्यांच्या संघटनांचे लोक आहेत. परंतु कोणत्याही किंमतीवर ही यात्रा थांबणार नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे.

राहुल गांधी हे बटाद्रवामधील श्रीमंत शंकरदेव महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी आले होते. तेथे त्यांना पोलिसांनी अडवले. त्यावर ‘ब्रदर क्या इश्यू है? मला बॅरिकेटड्स पाहता येतील का? मला फक्त एक सांगा की माझी काय चूक आहे? मला मंदिरात जाण्यापासून का रोखले जात आहे? आम्ही कुठलाही नियम मोडलेला नाही,’ असे राहुल गांधी सुरक्षा अधिकाऱ्यांना म्हणाले.

मला परवानगी देण्यात आली आहे. निमंत्रणही मिळालेले आहे. पण तरी मला मंदिरात का जाऊ दिले जात नाही? मला मंदिरात जाऊन फक्त प्रार्थना करायची आहे, असे राहुल गांधी म्हणाले. आज बहुधा एकच व्यक्ती मंदिरात जाऊ शकत आहे, असे म्हणत राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. आता मंदिरात कुणी जायचे हेही मोदीच ठरवणार का? असेही राहुल गांधी म्हणाले.

 विनंती करूनही मंदिरात जाऊ दिले जात नाही, हे पाहून राहुल गांधी त्यांच्यासोबत असलेल्या शेकडो कार्यकर्त्यांसह धरणे आंदोलनाला बसले आहेत.  हे वृत्त लिहिपर्यंत राहुल गांधींचे धरणे आंदोलन सुरूच होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!