छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): मराठवाड्यातील आघाडीच्या शिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळात वाद सुरू आहे. धर्मादाय सहआयुक्तांनी विद्यमान संचालक मंडळाचा चेंज रिपोर्ट फेटाळून लावत हे संचालक मंडळ बेकायदेशीर ठरवले असले तरी हेच संचालक मंडळ सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयात प्राध्यापकांची भरती करत आहे. त्यामुळे या अध्यापक भरतीच्या वैधतेबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असताना ही नोकरभरती तातडीने रद्द करण्याऐवजी विभागीय सहसंचालक डॉ. सुरेंद्र ठाकूर यांनी ढिम्म राहून या नियमबाह्य भरतीला मूकसंमती दिली आहे.
नियमाप्रमाणे कोणत्याही शिक्षण संस्थेचे श्येड्यूल-१, परिशिष्ट-१ आणि टीपीआर अद्ययावत आणि विनावाद असल्याशिवाय त्या शिक्षण संस्थेच्या अनुदानित महाविद्यालयात शिक्षक किंवा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या भरतीला परवानगी देऊ नये, अशी स्पष्ट तरतूद असलेला शासन निर्णय आहे.
हा शासन निर्णय पायदळी तुडवून सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळात वाद असताना आणि संस्थेचे श्येड्यूल-१, परिशिष्ट-१ आणि टीपीआर अद्ययावत नसताना आणि हा वाद धर्मादाय सहआयुक्तांकडे प्रलंबित असताना छत्रपती संभाजीनगरच्या (औरंगाबाद) विभागीय सहसंचालक कार्यालयाने या संस्थेतील प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्यास नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य शासनाकडे शिफारस केली. त्यामुळे काही दिवसांपूर्वी सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्यात आल्या. या मुलाखतींसाठी विभागीय सहसंचालक डॉ. सुरेंद्र ठाकूर हे स्वतः हजर होते.
या नोकरभरतीवर अनेकांनी लेखी स्वरुपात आक्षेप नोंदवूनही विभागीय सहसंचालक डॉ. सुरेंद्र ठाकूर यांनी सरस्वती भुवन शिक्षण संस्थेला अद्ययावत श्येड्यूल-१ सादर करण्याबाबतचे पत्र लिहिण्यापलीकडे कोणतीही कारवाई केली नाही. परिणामी या शिक्षण संस्थेतील पहिल्या टप्प्यातील मुलाखती पार पडल्या.
दरम्यानच्या काळात छत्रपती संभाजीनगरच्या (औरंगाबाद) धर्मादाय सहआयुक्तांनी सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या नवीन संचालक मंडळाचा चेंज रिपोर्ट फेटाळून लावत हे संचालक मंडळ बेकायदेशीर ठरवले. धर्मादाय सहआयुक्तांचा हा निर्णय आल्यानंतर सक्षम प्राधिकारी या नात्याने विभागीय सहसंचालक डॉ. सुरेंद्र ठाकूर यांनी सरस्वती भुवन शिक्षण संस्थेला ही नोकरभरती तातडीने थांबवण्याचे निर्देश देणे आवश्यक होते. परंतु तसे झाले नाही.
धर्मादाय सहआयुक्तांनी सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचा चेंज रिपोर्ट फेटाळून लावल्यानंतरही डॉ. ठाकूर यांनी धर्मादाय सहआयुक्तांच्या निर्णयाकडेही कानाडोळा करत कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे सरस्वती भुवन शिक्षण संस्थेने २८ ऑगस्टपासून पुन्हा प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी मुलाखतीची प्रक्रिया सुरू केली. या मुलाखती ५ सप्टेंबरपर्यंत चालणार असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे या मुलाखतीसाठी उच्च शिक्षण संचालाक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी शासन प्रतिनिधीही दिला आहे.
ज्या संस्थेचे संचालक मंडळच धर्मादाय सहआयुक्तांनी चेंज रिपोर्ट फेटाळून लावत बेकायदेशीर ठरवले, त्या संस्थेत होत असलेली नोकर भरती वैध कशी? ती जर वैध नसेल तर विभागीय सहसंचालक कार्यालय बेरोजगारांच्या भविष्याशी का खेळत आहेत? ही नोकर भरती रोखू नये म्हणून त्यांच्यावर दबाब आणणारी ‘शक्ती’ कोणती? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाले आहेत. सरस्वती भुवनच्या या संचालक मंडळाकडून ज्या पात्र उमेदवारांना नियुक्तीची पत्रे दिली जातील, त्याच्या कायदेशीर वैधतेलाच उद्या चालून आव्हान दिले गेले तर त्या उमेदवारांचे भवितव्यच टांगणीला लागणार आहे. त्याची जबाबदारी सहसंचालक डॉ. ठाकूर स्वीकारणार आहेत का? असा सवालही मुलाखतीला हजर राहिलेल्या काही उमेदवारांकडून केला जात आहे.