देशातील विद्यापीठांमध्ये ‘शहरी नक्षलवादी’, सामाजिकशास्त्राच्या प्राध्यापकांकडूनच विद्यार्थ्यांना देशविरोधी प्रशिक्षण: दिल्ली विद्यापीठाच्या कुलगुरूंचे आरोप


नवी दिल्लीः विद्यापीठ कॅम्पसमध्ये ‘शहरी नक्षलवादी’ सक्रीय आहेत. प्राध्यापकांकडूनच विद्यार्थ्यांचे मेंदू दूषित केले जात आहेत. शैक्षणिक जगतात अनियंत्रित शहरी नक्षलवादाचा उदय झाला आहे. सामाजिकशास्त्राच्या प्राध्यापकांकडून विद्यार्थ्यांना देशविरोधी प्रशिक्षण दिले जात आहे. ‘पिंजरा तोड’सारख्या विद्यार्थ्यांच्या चळवळी ‘कृतघ्नपणा’ने प्रेरित आहेत….हे आरोप केले आहेत दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू योगेश सिंह यांनी. असोसिएशन ऑफ यूर्निव्हर्सिटीजच्या संयुक्त विद्यमाने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांनी केलेल्या त्यांच्या भाषणाचा  व्हिडीओ त्यांनीच आपल्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर जारी केला आणि नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या भाषणाचा प्राध्यापक, विद्यार्थी आणि शैक्षणिक जगतातून निषेध केला जात आहे.

योगेश सिंह यांनी दिल्लीच्या विज्ञान भवनात २८ सप्टेंबर रोजी आयोजित ‘भारत मंथन २०२५: नक्षलमुक्त भारत-मोदींच्या नेतृत्वात लाल दहशतवादाचा अंत’ या कार्यक्रमात हे २४ मिनिटांचे भाषण दिले. आजकाल नक्षलवाद केवळ जंगलांमधून नव्हे तर विद्यापीठे आणि शहरांमधून संचलित होत आहे, असे योगेश सिंह यांनी म्हटले  आहे. २०२६ पर्यंत देशातून नक्षलवाद समाप्त करण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांचे कौतुक करतानाच शैक्षणिक जगतात ‘अनियंत्रित शहरी नक्षलवादा’चा उदय झाल्याबद्दल त्यांनी ‘गंभीर चिंता’ही व्यक्त केली. ‘दि प्रिंट’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

हेही वाचाः १ ऑक्टोबर २०२५ च्या विद्यार्थी संख्येवर अनुदानित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर पदांचा कार्यभार निश्चितीचे आदेश, अनेकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर?

हे शहरी नक्षलवादी बुद्धीवादी मुखवट्यामागे लपून राहतात. ते प्राध्यापक, डॉक्टर, कर्मचारीही असू शकतात. ते गरिबांसाठी बोलताना दिसतात परंतु त्यांना ते गरिबीमध्येच ठेवतात. विद्यापीठांमध्ये ‘स्वप्ने आणि निरागसते’सह प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची वैचारिकदृष्ट्या दिशाभूल केली जात आहे. ते शिकवत नाहीत, तर शिकवण देतात, असा तर्कही योगेश सिंह यांनी दिला.

जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) २०१६ मधील देशद्रोहासंबंधीच्या वादाचा संदर्भ देत ‘भारत तेरे टुकडे होंगे, इन्शाअल्लाह इन्शाअल्लाह’सारख्या घोषणांची कुलगुरू योगेश सिंह यांनी आठवण करून दिली आणि जर प्राध्यापकच अशा विचारसरणीचे स्त्रोत बनत असतील तर देशातील शिक्षण व्यवस्था अपयशी ठरली आहे का? असा सवालही उपस्थित केला.

हेही वाचाः ‘तुम्हीच एकटे शहाणे आणि बाकीचे सगळे गाढव आहेत का?’ अधिसभा बैठकीत कुलगुरू फुलारींनी मुक्ताफळे उधळताच गदारोळ, अखेर शब्द मागे घेत हाराकिरी!

सिंह यांनी आपल्या भाषणात विवेक अग्नीहोत्री यांचा ‘बुद्धा इन ट्रॅफिक जॅम’ हा चित्रपट पाहण्याची शिफारस केली. या चित्रपटात प्राध्यापक आपला वैचारिक अजेंडा पूर्णत्वास नेण्यासाठी कश्या पद्धतीने विद्यार्थ्यांना भावनिकदृष्ट्या प्रभावित करतात, हे दाखवले असल्याचे सांगत ही ‘मृदू, शैक्षणिक भाषा’ राष्ट्रीय प्रगतीला कमकुवत करण्याचे एक अत्यंत धोकादायक मिशन लपवते, असे सिंह म्हणाले.

राष्ट्रविरोध अभ्यासक्रमाचा भाग कधी बनला?

सिंह यांनी विद्यापीठांच्या वर्गखोल्यामध्ये दिल्या जात असलेल्या ‘शिकवणी’वर चिंता व्यक्त केली. हिंदी शिकवणे केव्हापासून राष्ट्रविरोधी बनले? इंग्रजीचे वर्ग केव्हापासून विचारसरणी थोपवण्याचे अड्डे बनले? सामाजिकशास्त्राच्या प्राध्यापकांनी केव्हापासून विद्यार्थ्यांना देशविरोधी प्रशिक्षण देणे सुरू केले? राष्ट्रविरोधी विचार अभ्यासक्रमाचा भाग कधी बनले?, असे सवालही योगेश सिंह यांनी केले. हे बदल आकस्मिक नव्हते तर शिक्षण व्यवस्था उद्धवस्त करण्यासाठी ‘काळजीपूर्वक निर्मित आख्यानां’चे परिणाम आहेत. ‘मृदू शब्द आणि निष्पाप चेहऱ्यां’पासून देशाच्या भवितव्यालाच धोका आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

हेही वाचाः पारदर्शकतेलाच तिलांजलीः उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नियम डावलून ज्ञानस्त्रोत केंद्र संचालकपदाची तब्बल १६ महिन्यांनी भरती प्रक्रिया, ‘मर्जीतील भिडू’साठीच खटाटोप?

विद्यापीठ शिकणारे विद्यार्थी कृतघ्न

दिल्ली तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कार्यरत असताना तेथील विद्यार्थिनींनी विद्यापीठाच्या जाचक नियमांविरुद्द केलेल्या ‘पिंजरा तोड’ आंदोलनाचा संदर्भ देत योगेश सिंह म्हणाले की, हे आंदोलन विद्यार्थ्यांमधील वाढत्या ‘कृतघ्नपणा’चे उदाहरण आहे. आजकाल विद्यापीठांमध्ये कोणत्या प्रकारच्या विचारांना प्रोत्साहन दिले जात आहे?  विद्यापीठांमध्ये ‘बंडखोरांसाठी बंडखोरी’ची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. परदेशी विद्यापीठांमध्य अशा प्रवृत्ती आढळूनच येत नाहीत, असा दावाही योगेश सिंह यांनी केला. विद्यापीठे सरकारी पैश्यांवर चालतात. प्रत्येक नागरिक त्यासाठी योगदान देतो परंतु विद्यापीठांमध्ये शिकणारे विद्यार्थी त्याबाबत कृतज्ञता दाखवतच नाहीत, असेही सिंह म्हणाले.

हेही वाचाः आधार कार्ड अद्यतनीकरणाच्या शुल्कात तब्बल ५० टक्क्यांपर्यंत वाढ, सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त भूर्दंड!

सिंह यांचे भाषण नीचपणाचा कळस

योगेश सिंह यांच्या भाषणावरून आता वाद सुरू झाला आहे. विद्यापीठाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या एखाद्या व्यक्तीने केलेली ही टिप्पणी ‘नवीन निचपणा’ आहे, असे दयालसिंह महाविद्यालयातील भौतिकशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक नवीन गौर यांनी म्हटले आहे. ही अत्यंत प्रतिग्रामी वृत्ती आहे. ही टिप्पणी प्रशासनासाठी गैरसोयीचे असलेल्या मुद्दे उपस्थित करू नका, हा समाजासाठी संदेश देण्यासाठीचा प्रयत्नही असू शकतात, असेही गौर म्हणाले.

विचारसरणी आणि दृष्टिकोनाच्या आधारावर लक्ष्य करणे लोकशाहीविरोदी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अंकुश लावण्याचा प्रयत्न आहे, असे दिल्ली विद्यापीठाच्या राजधानी महाविद्यालयातील प्राध्यापक राजेश झा म्हणाले. हा शैक्षणिक संस्कृतीमध्ये लोकशाही ठिकाणे कमी करण्याचा प्रयत्न आहे. तो अत्यंत धोकादायक आहे. विद्यापीठीय व्यवस्थेत प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे ब्रँडिंग आणि लेबलिंग करणे अवांछनीय आहे, असेही झा म्हणाले.

हेही वाचाः प्राध्यापकाने सुट्टी घेतली म्हणून थेट सेवासमाप्ती, कुलगुरूंचा वादग्रस्त निर्णय; वैयक्तिक खुन्नस काढण्यासाठीच कारवाई केल्याचा आरोप

दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थीनी आणि एआयएसए या डाव्या विद्यार्थी संघटनेची सदस्य अंजली हिनेही कुलगुरू योगेश सिंह यांच्या या वक्तव्याचा निषेध केला. त्यांची ही टिप्पणी सत्तेला सवाल करणाऱ्या प्रत्येकासाठीच धोका आहे, असे अंजली म्हणाली. ‘उद्या जर आम्ही शुल्कवाढीविरुद्ध आवाज उठवला तर आम्हाला शहरी नक्षलवादी ठरवले जाईल. जर आम्ही आमच्या अधिकारांबाबत बोललो तर आम्ही शहरी नक्षलवादी बनू. आम्ही या टिप्पणींचा विशेषतः पिंजरा तोड’सारख्या ऐतिहासिक आंदोलनाला लक्ष्य करणाऱ्या टिप्पणींचा तीव्र निषेध करतो, असे अंजलीने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओत म्हटले आहे.

 पिंजरा तोड ही महिलांच्या नेतृत्वातील विद्यार्थी चळवळ आहे. विद्यापीठांतील भेदभावपूर्ण वसतिगृह संचारबंदी आणि लैंगिक आधारावरील निर्बंधांविरुद्ध मोहीम चालवण्यासाठी या चळवळीची स्थापना करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!