वादग्रस्त कोहिनूर महाविद्यालयावर अखेर प्रशासक नेमणार, विद्यापीठ पाठवणार राज्य सरकारकडे प्रस्ताव


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): बोगस पदवी घोटाळ्याचा मास्टर माइंड डॉ. मझहर खान अध्यक्ष असलेल्या कोहिनूर शिक्षण संस्थेच्या खुलताबाद येथील वादग्रस्त कोहिनूर महाविद्यालयावर प्रशासकाची नियुक्ती करण्याच्या मागणीचा ठराव राज्य सरकारकडे पाठवण्याचा निर्णय आज झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. व्यवस्थापन परिषदेच्या या निर्णयामुळे डॉ. मझहर खान यांच्या मनमानी आणि अनागोंदी कारभाराला चांगलीच चपराक बसणार आहे. न्यूजटाऊनने ‘कोहिनूर’मधील अनागोंदीचा सातत्याने पर्दाफाश केला आहे.
कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. मझहर खान यांनी कोहिनूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविदयालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर २०२४चे वेतन अनुदान उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाला परत केल्यामुळे निर्माण झालेल्या वादानंतर छत्रपती संभाजीनगरचे (औरंगाबाद) विभागीय सहसंचालक डॉ. रणजितसिंह निंबाळकर यांनी ६ फेब्रुवारी २०२५ रोजी विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे यांना पत्र लिहून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील तरतुदींनुसार कार्यवाही करण्याचे सूचित केले होते.

हेही वाचाः कोहिनूर महाविद्यालयाने हडपले १ कोटी २५ लाख १८ हजार ८७८ रुपयांचे वेतन अनुदान, ‘काल्पनिक’ कार्यभार दाखवून केली मनमानी प्राध्यापक भरती?
सहसंचालकांच्या पत्रानंतर कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या आदेशानुसार डॉ. भालचंद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली चार अधिष्ठातांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. या चौकशी समितीत विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. महेंद्र शिरसाठ, मानव्य विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. संजय सांळुके, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्या शाखेच्या अधिष्ठाता डॉ. वीणा हुंबे आणि आंतरविद्या शाखेच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली खापर्डे यांचा समावेश होता.

हेही वाचा: कोहिनूर महाविद्यालयात खंडीभर अभ्यासक्रमांसाठी नेमलेले ढीगभर प्राध्यापक कागदोपत्रीच; ना हजेरी, ना पगाराचा पत्ता, चौकशी समितीने केली पोलखोल!
या चौकशी समितीने ११ फेब्रुवारी आणि ३ मार्च रोजी महाविद्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता अनेक धक्कादायक बाबी चौकशी समितीच्या निदर्शनास आल्या आहेत. चौकशी समितीने आपला अहवाल कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्याकडे सादर केला असून या अहवालावर विद्यापीठाने कोहिनूर महाविद्यालयाला २८ मार्च रोजी नोटीस बजावून सात दिवसांच्या आत खुलासा मागवला होता.

हेही वाचाः कोहिनूर महाविद्यालयाने ढापले मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचेही पैसे, कोट्यवधींच्या अनामत रकमेवरही डल्ला!
या नोटिशीनंतर कोहिनूरचे अध्यक्ष डॉ. मझहर खान यांनी ४ एप्रिल रोजी विद्यापीठाला पत्र लिहून मुदतवाढ मागितली होती. त्यानुसार कुलगुरू डॉ. फुलारी यांनी नोटिशीला उत्तर देण्यासाठी १० दिवसांची मुदतवाढ दिली होती. तसे पत्रच ५ एप्रिल रोजी कोहिनूरच्या अध्यक्षांना पाठवले होते. परंतु १० दिवसांची वाढीव मुदत संपूनही कोहिनूरचे अध्यक्ष डॉ. मझहर खान यांनी खुलासा सादर केला नाही.

हेही वाचाः कोहिनूर महाविद्यालयाने हडपले चार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या डीसीपीएस, जीपीएफचेही लक्षावधी रुपये; आता तरी कारवाई होणार का?
कोहिनूर महाविद्यालयाकडून खुलासाच प्राप्त न झाल्यामुळे ३ मे रोजी विद्यापीठाने कोहिनूर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यांना पत्र पाठवून पाच दिवसांच्या आत खुलासा सादर केला नाही तर आपले काहीही म्हणणे नाही,असे ग्रहित धरून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे बजावले होते. तरीही कोहिनूर महाविद्यालयाने विद्यापीठाच्या नोटिशीवर खुलासा सादर केलाच नाही.

हेही वाचाः शासनाकडून पदवी अभ्यासक्रमांच्या प्रत्येकी एकाच तुकडीला मंजुरी असतानाही चार-चार तुकड्या दाखवून कोहिनूर महाविद्यालयाची खुलेआम दुकानदारी!
कोहिनूर महाविद्यालयाने खुलासाच न दिल्यामुळे डॉ. वायकर समितीचा अहवाल आज झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विचारार्थ ठेवण्यात आला होता. या बैठकीत या अहवालावर चर्चा झाली आणि चर्चेअंती कोहिनूर महाविद्यालयावर प्रशासक नियुक्त करण्याच्या मागणीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला.

आता पुढे काय?

व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयानुसार विद्यापीठ प्रशासनाकडून कोहिनूर महाविद्यालयावर प्रशासक नियुक्त करण्यात यावा, अशा शिफारशीचा ठराव राज्याच्या उच्च शिक्षण संचालकांकडे पाठवण्यात येईल. हा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर नैसर्गिक न्यायाचा भाग म्हणून कोहिनूर महाविद्यालयाला नोटीस बजावून आपली बाजू मांडण्याची आणि खुलासा करण्याची संधी दिली जाईल.

हेही वाचाः आणखी एक ‘चारसौ बीसी’: ‘कोहिनूर’च्या सचिव डॉ. आस्मा खान आणि सहसचिव मकसूद खान  यांची डीवाय पाटील विद्यापीठाची एमफिल पदवीही बोगस!
हा खुलासा समाधानकारक न वाटल्यास आदेश जारी करून उच्च शिक्षण संचालक कोहिनूर महाविद्यालयावर ठराविक मुदतीसाठी प्रशासक नियुक्त करतील. प्रशासक नियुक्तीच्या दिवसापासून कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. मझहर खान, सचिव डॉ. आस्मा खान व अन्य पदाधिकाऱ्यांची कोहिनूर महाविद्यालयाच्या कामकाजातील लुडबुड थांबेल.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!