अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या एसएनसीयूमध्ये व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन भीषण आग, तीन नवजात बालकांचा गुदमरून मृत्यू


अमरावतीः अमरावतीच्या सरकारी जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील नवजात शिशू अतिदक्षता विभागात (एसएनसीयू) सोमवारी पहाटे चार वाजता व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत तीन नवजात बालकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. आग लागल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी धावपळ करून इतर बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढल्यामुळे ३६ बालकांना वाचवण्यात यश आले आहे. या घटनेमुळे जीवनरक्षक वैद्यकीय उपकरणांचे डिजिटल प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स ऑडिट आणि ऑटोमॅटिक पॉवर कट-ऑफ प्रणालीची आवश्यकता अधोरेखित झाली आहे.

सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास नवजात शिशू अतिदक्षता विभागातील व्हेंटिलेटरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन स्फोट झाला. त्यानंतर भीषण आग लागली. ही आग झपाट्याने पसरली. अमरावती जिल्हा स्त्री रूग्णालयाच्या एसएनसीयूच्या तीन कम्पार्टमेंटपैकी ज्या भागात ९ बालके दाखल होती, तेथे हा अपघात झाला, अशी माहिती अमरावतीचे पोलिस आयुक्त राकेश ओला यांनी दिली.

एसएनसीयूमध्ये आग लागताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी धावपळ करत या कक्षातील इतर बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर एसएनसीयूचे तीन कक्ष आहेत. या तीन कक्षांमध्ये प्रत्येकी १३ असे एकूण ३९ नवजात बालकांवर उपचार करण्याची क्षमता आहे. त्यापैकी एका कक्षाला आग लागली. या कक्षात १२ नवजात बालके दाखल होती.

एसएनसीयूला आग लागल्याचे लक्षात येताच कर्तव्यावर असलेल्या परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी उपचार सुरू असलेल्या नवजात बालकांना बाहेर काढले. मात्र यात तीन बालकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. विशेष म्हणजे वर्षभरापूर्वीच रुग्णालयाच्या नवीन इमारतीत एसएनसीयू सुरू करण्यात आले होते. व्हेंटिलेटरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्यानंतर रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा कार्यान्वति का झाली नाही? असा सवाल केला जात आहे.

या घटनेनंतर काही नवजात बालकांना पुढील उपचारासाठी जवळच असलेल्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. येथे चार बालकांवर उपचार सुरू असून एका बालकाची प्रकृती चिंताजनक आहे. या बालकाच्या हाताला आणि पायाला भाजले असून अन्य तीन बालके किरकोळ भाजली आहेत. काही बालकांना डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!