विधान परिषदेच्या औरंगाबाद, पुणे, नागपूर पदवीधर आणि अमरावती, पुणे शिक्षक मतदारसंघांची निवडणूक जाहीर; २३ ऑक्टोबरला मतदान, २७ ऑक्टोबरला मतमोजणी


मुंबई: भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेतील पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार औरंगाबाद विभाग पदवीधर, पुणे विभाग पदवीधर, नागपूर विभाग पदवीधर, अमरावती विभाग शिक्षक आणि पुणे विभाग शिक्षक या पाच मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे. विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर २०२६ रोजी संपुष्टात येणार आहे.

या निवडणुकीसाठी २९ सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसिद्ध होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर, अर्जांची छाणनी ७ ऑक्टोबर, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ९ ऑक्टोबर आहे. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होईल. २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी करण्यात येणार असून निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण केली जाणार आहे.

महाराष्ट्रातील या पाच जागांमध्ये औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून अरुण लाड, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून अभिजीत वंजारी, अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून किरण सरनाईक आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर या विद्यमान सदस्यांचा समावेश आहे.

भारत निवडणूक आयोगाने या निवडणुकांची घोषणा केल्यापासून संबंधित मतदारसंघांत आदर्श आचारसंहिता तत्काळ लागू झाली आहे. पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसह विधान परिषद निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहितेच्या तरतुदी लागू करण्याबाबत आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांमध्येही स्पष्टता देण्यात आली असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळवले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!