
लातूरः प्रसिद्ध संस्थाचालक संजीव सोनवणे यांनी आपल्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे लातूरसह शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
६२ वर्षीय सोनवणे यांचे कुटुंबीय परदेशात गेलेले आहे. त्यामुळे पद्मानगर भागातील निवासस्थानी ते एकटेच होते. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास सोनवणे यांनी स्वतःवर गोळी झाडली. सोनवणे यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. पोलिस सर्व बाजूंनी सखोल तपास करत असून तपासाअंतीच त्यांच्या आत्महत्येमागचे कारण स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनवणे यांनी त्यांच्या परवानाधारक पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. आपल्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरू नये आणि स्वतःच्या इच्छेनुसार आपण हे पाऊल उचलत आहे. आपल्या मृत्यूचा तपासही करू नये, असेही सोनवणे यांनी चिठ्ठीत म्हटले आहे. मात्र चिठ्ठीतील मजकूर, हस्ताक्षर आणि घटनेमागील नेमके कारण याबाबत पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे.
संजीव सोनवणे यांनी बेंगळुरू येथून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेतून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. परळी येथे संकल्प कोचिंग क्लासेसची स्थापना करून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातील कारकिर्दीस सुरूवात केली. त्यानंतर सन २००० च्या आसपास त्यांनी लातूर येथे संकल्प कोचिंग क्लासेसची स्थापना केली. कोचिंग क्लासेस चालवत असतानाच त्यांनी २००५ च्या सुमारास चंद्रभानू सोनवणे महाविद्यालय सुरू केले. त्यानंतर सोलापूरमधील बार्शी आणि पुण्यातील खडकवासला येथेही शाळा-महाविद्यालय सुरू केले होते.
सोनवणे यांनी गुणवंत व प्रगतीशील विद्यार्थी घडवण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात अनेक नवनवीन व प्रयोगशील उपक्रम राबवले. महाराष्ट्रभर गाजलेल्या लातूर पॅटर्नची निर्मिती आणि विस्तार करण्यात त्यांच्या प्रयोगशीलतेचे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे. संजीव सोनवणे यांच्या पश्चात एख मुलगा आणि एक मुलगी असून दोघेही इंजिनिअर आहेत आणि ते परदेशात नोकरी करतात. सोनवणे यांचे वडील चंद्रभानू सोनवणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या हिंदी विभागात विभागप्रमुख होते.
