
मुंबईः दिवंगत अभिनेता सुशातसिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणी अखेर सहा वर्षांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांचा जबाब नोंदवून घेतल्यानंतर सीबीआयने हा गुन्हा दाखल केला.
दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर दिशाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी दिशाचे वडील सतीश सालियन यांचा जबाब नोंदवून घेऊन एफआयआर दाखल करावा आणि सीबीआयमार्फत या प्रकरणाचा तपास करावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने २ सप्टेंबर रोजी दिले होते.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिशाचे वडील सतीश सालियन यांनी ११ सप्टेंबर रोजी मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील सीबीआयच्या कार्यालयात हजर राहून आपला जबाब नोंदवला. जबाब नोंदवते वेळी त्यांचे वकील निलेश ओझाही त्यांच्या सोबत होते. जबाब नोंदवण्याची प्रक्रिया अनेक तास चालली. हा जबाब नोंदवून घेतल्यानंतर सीबीआयने भादंविच्या कलम ३०२ (हत्या), ३७६ (सामूहिक अत्याचार), १२०(ब) कट रचणे, २०१ (पुरावे नष्ट करणे) या कलमांसह २१७ आणि २१८ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
सीबीआयकडे नोंदवलेल्या जबाबात सतीश सालियन यांनी अनेक बड्या व्यक्तींची नावे घेतल्याचे वृत्त आहे. त्यांच्या जबाबानुसार सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये नेमकी कोणाकोणाची नावे आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र सतीश सालियन यांनी ज्या ज्या लोकांची नावे घेतली आहेत, त्यांची चौकशी केली जाईल. परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तपासातून पुरेसे आणि वाजवी संशय निर्माण करणारे ठोस पुरावे समोर येईपर्यंत कोणत्याही व्यक्तीला आरोपी म्हणून पाहिले जाणार नाही किंवा आरोपीसारखे वागले जाणार नाही.
दिशा सालियन ही ८ जून २०२० रोजी तिचा प्रियकर व वाग्दत्त वर रोहन रॉय याच्या मालवणी येथील रिजेंट गॅलक्सी इमारतीच्या १४ व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या पार्टीत सहभागी झाली होती. त्यावेळी मध्यरात्री १४ व्या मजल्यावरून पडून तिचा संशयास्पद मृत्यू झाला होता. मालवणी पोलिसांनी या प्रकरणाचा दोनदा तपास केला होता.
दिशाचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन दिशाच्या मृत्यूची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाने दिशाच्या मृत्यू प्रकरणी सीबीआयमार्फत नव्याने तपास करण्याचे आदेश २ सप्टेंबर रोजी दिले होते. सीबीआयने आता या प्रकरणी गुन्हा नोंदवल्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरण सुरूवातीपासूनच राजकीयदृष्ट्या संवेदनशील राहिले आहे. आता एफआयआर दाखल झाल्यामुळे पुन्हा एकदा हे प्रकरण तापण्याची शक्यता आहे.
