‘१५ आमदार बाद होणार, अजित पवार भाजपबरोबर जाणार’, अंजली दमानियांच्या दाव्यामुळे राजकीय चर्चेला उधाण

मुंबईः  महाराष्ट्रातील १५ आमदार बाद होणार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपबरोबर जाणार, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एका ट्विटमध्ये केला आहे. दमानिया यांच्या दाव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबतचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय असेल आणि त्यानंतर महाराष्ट्राचे राजकीय चित्र कसे असेल? याबाबत अनेक जण आपापल्या परीने अंदाज बांधत असतानाच अंजली दमानिया यांनी मंत्रालयातील एका घटनेचा संदर्भ देत हा दावा केला आहे.

‘आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तेथे एका व्यक्तीने मला थांबवले आणि एक गमतीशीर माहिती दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे १५ आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजपबरोबर जाणार आहेत. तेही लवकरच. महाराष्ट्राच्या राजकारणाची आणखी किती दुर्शशा होतेय, ते बघू,’ असे दमानिया यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

महाराष्ट्रात २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक झाल्यानंतर निर्माण झालेल्या त्रिशंकू अवस्थेत कोणत्याही एका पक्षाला स्वबळावर सरकार स्थापन करणे शक्य झाले नव्हते. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन करून सरकार स्थापनेचे प्रयत्न करत होते.

महाविकास आघाडीकडून सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नात असतानाच एके दिवशी अजित पवार यांनी अचानक भाजपसोबत जाऊन भल्या पहाटे शपथविधी घेतला होता. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आला होता. हे सरकार फार दिवस टिकले नाही. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले होते. तेव्हापासून अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीच्या चर्चा होतच असतात. दमानिया यांच्या दाव्यामुळे ही चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!