
नागपूरः दीक्षाभूमी स्मारक समितीतील वादाचा फटका डॉ. आंबेडकर महाविद्यालयालाही बसत असून महाविद्यालयाचे प्राचार्यपद नेमके कोणाकडे? यावरून गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला गोंधळ उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही सुटलेला नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने प्रभारी प्राचार्यपदाची मान्यता रद्द करूनही दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत सुरई ससाई गटाच्या डॉ. दीपा पान्हेकर यांनी शनिवारी पुन्हा प्राचार्यांच्या दालनाचे कुलूप तोडून स्वतःचे कुलूप लावल्याचा आरोप डॉ. राजेंद्र गवई यांच्या विरोधी गटाने केला आहे. त्यामुळे हा वाद आणखी विकोपाला जाण्याची शक्यता दिसू लागली आहे.
नागपूरच्या दीक्षाभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीत गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू आहे. या वादात डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्यपद नेमके कोणाकडे? असा गोंधळ सुरू आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि महाविद्यालय व विद्यापीठ न्यायाधिकरणाने डॉ. भुवनेश्वरी मेहेर यांची प्राचार्यपदी पुनर्स्थापना करण्याचा आदेश १ ऑक्टोबर २०२६ रोजी दिला होता. या निर्णयाविरुद्ध दाखल करण्यात आलेली रिट याचिका ( क्रमांक ९०७०/२०२६) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ३० ऑक्टोबर २०२६ रोजी फेटाळून लावली. दरम्यानच्या काळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने डॉ. दीपा पान्हेकर यांना दिलेली प्रभारी प्राचार्यपदाची मान्यता रद्द करून डॉ. भुवनेश्वरी मेहेर यांच्या प्राचार्यपदास मान्यता दिल्याचे ३ ऑक्टोबर २०२६ रोजी पत्राद्वारे कळवले होते.
हा सगळा घटनाक्रम घडलेला असतानाच दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत नागार्जुन सुरई ससाई यांच्या स्वाक्षरीने ७ नोव्हेंबर व १२ नोव्हेंबर रोजी दोन स्वतंत्र पत्रे जारी करण्यात आली. त्यात डॉ. भुवनेश्वरी मेहेर यांना निलंबित करण्यात आले असून त्यांना प्रशासकीय कामकाजापासून दूर ठेवण्यात येत असल्याचे आणि डॉ. दीपा पान्हेकर यांना प्रभारी प्राचार्य म्हणून कामकाज पाहण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. परंतु डॉ. पान्हेकर यांची प्रभारी प्राचार्यपदाची मान्यता विद्यापीठाने यापूर्वीच रद्द केलेली असल्यामुळे त्या नेमक्या कोणत्या वैध अधिकारांच्या आधारे प्रभारी प्राचार्यपदाचे कामकाज पहात आहेत?, असा सवाल डॉ. राजेंद्र गवई या विरोधी गटाने केला आहे.
हा वाद सुरू असतानाच डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराचे आणि प्राचार्यांच्या दालनाचे कुलूप तोडून प्रवेश करण्यात आल्याचा प्रकार शनिवारी (१४ नोव्हेंबर) सकाळी उघडकीस आला. या प्रकारामागे डॉ. दीपा पान्हेकर व इतरांचा सहभाग असल्याचा आरोप गवई गटाने केला आहे.
महाविद्यालयाच्या कार्यालयाला कुलूप लावून नियमित कर्मचाऱ्यांना प्रवेशापासून रोखण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. कार्यालयीन कर्मचाऱ्यांना प्रवेशापासून कुणी रोखले? कार्यालयाची कुलूपे कुणाच्या सांगण्यावरून आणि कोणत्या शासन आदेशान्वये उघडण्यात किंवा तोडण्यात आली?, याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या वादात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे आंबेडकरी अनुयायी चिंता व्यक्त करत आहेत.
