मुंबईः शनिवारी मध्यरात्रीपासून मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांत पावसाने धुमाकूळ घातला असतानाच येत्या २४ तासांत मराठवाडा आणि उत्तर-मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किमी राहण्याची शक्यता आहे.
शनिवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने मराठवाड्यात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. मराठवाड्यातील ४२० महसूल मंडळांपैकी २८४ महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतात पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच आता पुन्हा मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दक्षिण-मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटास वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्हानिहाय हवामानाचा अंदाज असा राहीलः
सोमवार, २ सप्टेंबरः धुळे, नंदूरबार, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.
जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), जालना, बीड, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून या जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर,, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, भंडारा, बुलढाणा चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मंगळवार, ३ सप्टेंबरः धुळे, नंदूरबार, जळगाव, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), जालना, परभणी, अकोला, अमरावती जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
सातारा जिल्ह्यात पुढील पाच दिवस म्हणजेच ६ सप्टेंबरपर्यंत आणि पुणे जिल्ह्यात पुढील तीन दिवस म्हणजेच ५ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
गोदावरी नदी काठच्या १०० गावांना सतर्कतेचा इशारा
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील पैठणच्या जायकवाडी धरणात येणाऱ्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे कोणत्याही क्षणी जायकवाडी धरणातून पाणी सोडले जाऊ शकते. त्यामुळे गोदावरी नदी काठच्या १०० गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गोदावरील नदीवरील आपेगाव, हिरडपुरी, राजाटाकळी, मुदगल, लोणी सावंगी या उच्चपातळी बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. जायकवाडी धरणात २५ ते ३० हजार क्यूसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे जायकवाडी धरण ९५ टक्के भरल्यानंतरच पाणी सोडायचे की नाही, याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. परंतु पाण्याची आवक लक्षात घेता जायकवाडी धरणातून कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो, त्यामुळे गोदावरी नदी काठच्या १०० गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मराठवाड्यात तीन ठार, अनेक गावात पुराचे पाणी
मराठवाड्यात पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे लातूर, बीड आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी एक अशा तीन जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ८० जनावरे वाहून गेल्यामुळे दगावली आहेत तर ११६ कच्चा घरांची पडझड झाली आहे. परभणी, हिंगोली, बीड आणि नांदेड जिल्ह्यातील अनेक गावात पुरावेच पाणी शिरल्याचेही वृत्त आहे.