साखर झोपेतच हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, ४० ते ४५ गावांची झोपमोड!


हिंगोलीः अख्खा महाराष्ट्र साखर झोपेत असतानाच आज पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील तीन तालुक्यांना भूकंपाचा सौम्य धक्का बसला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.६ एवढी होती. नॅशनल सेंट्र फॉर सिसमॉलॉजीकडेही या भूकंपाच्या धक्क्याची नोंद झाली असून तेथेही या भूकंपाची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल नोंदली गेली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील वसमत, औंढानागनाथ आणि कळमनुरी तालुक्यातील ४० ते ४५ गावांना आज पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का बसला. वसमत तालुक्यातील बोथी, दांडेगाव, सिंदगी, बोल्डा, आसोला आणि औंढानागनाथ तालुक्यातील पिंपळदरी, राजदरी, सोनवाडी, आमदरी, कंजारा, पूर, वसई, जामगव्हाण, ललालदाभा, काकडदाभा आदी गावांत हे भूकंपाचे धक्के जाणवले.

हिंगोली जिल्ह्यातील गावकरी साखर झोपेत असताना आज पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास जमिनीतून आवाज येऊ लागले. त्यामुळे झोपमोड झालेले गावकरी घाबरून घराबाहेर पडले. या भूकंपाच्या धक्क्यामुळे कुठेही नुकसान झाले नसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने सांगण्यात आले. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, कुठल्याही नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचेही या कक्षाने म्हटले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी, औंढानागनाथ या तालुक्यात गेल्या आठ ते दहा वर्षांपासून भूगर्भातून आवाज येत आहेत. भूगर्भातील सुक्ष्म हालचालींमुळे हे आवाज येत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगितले जात आहे.  वारंवार जमिनीतून येणारे आवाज आणि भूकंपाचे सौम्य धक्के अशी जणू मालिकाच गेल्या काही दिवसांपासून सुरू असल्यामुळे नागरिकांनाही त्याची सवय झाली आहे. मात्र आज भूगर्भातून ऐकू आलेला आवाज आजपर्यंतच्या आवाजापेक्षा मोठा होता, असे गावकरी सांगतात.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!