
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडाकर मराठवाडा विद्यापीठाचे राज्यपाल नामनिर्देशित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. गजानन सानप यांनी परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. भारती गवळी यांच्याशी केलेल्या कथित गैरवर्तनावरून उठलेले वादंग आणखी चिघळण्याची शक्यता आहे. डॉ. सानप यांच्याविरोधात परीक्षा विभागातील कर्मचारी आणि अधिसभा व व्यवस्थापन परिषदेच्या काही सदस्यांनी थेट कुलपतींकडे तक्रार केल्यानंतर आता सानप यांच्या बाजूने आणि विरोधात निवेदने-प्रतिनिवेदने देण्यात येऊ लागली आहेत. एकीकडे विद्यापीठात शिरकाव करू पाहणाऱ्या ‘आका’ संस्कृतीला तत्काळ पायबंद घाला, अशी मागणी करणारे पत्रक अधिसभा सदस्य डॉ. नरेंद्र काळे यांनी काढले आहे तर दुसरीकडे डॉ. सानप यांची बदनामी थांबवा आणि अपप्रवृतींना आळा घाला, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा देणारे निवेदन विद्यापीठ विकास मंचने दिले आहे.
व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. गजानन सानप यांनी कुलगुरूंच्या दालनात संवैधानिक अधिकाऱ्यांसमक्ष २३ जानेवारी रोजी परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. भारती गवळी यांच्याशी अरेरावी करत अर्वाच्च भाषा वापरून त्यांना अपमानित केल्यामुळे त्यांनी संचालकपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. डॉ. गवळी यांच्या राजीनाम्यानंतर परीक्षा विभागातील कर्मचारी व विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचारी सेवक संघाने कुलगुरू आणि कुलपतींकडे तक्रार करत डॉ. सानप यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
कर्मचारी व कर्मचारी संघटनेच्या तक्रारीनंतर व्यवस्थापन परिषद व अधिसभेच्या १७ सदस्यांनी थेट कुलपतींकडे तक्रार करत डॉ. सानप यांच्या गैरवर्तनाचा पाढाच वाचला आणि त्यांचा उच्च शिक्षणाशी तिळमात्र संबंध नसल्यामुळे व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून त्यांचे केलेल्या नामांकनाचा फेरविचार करून त्यांची या पदावरून हकालपट्टी करा, अशी मागणी केली आहे. त्यानंतर निवेदने-प्रतिनिवेदने आणि प्रसिद्धी पत्रके जारी करण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली आहे.
…अन्यथा रस्त्यावर उतरूः विकास मंच
व्यवस्थापन परिषद व अधिसभेच्या काही सदस्यांनी कुलपतींकडे निवेदन दिल्यानंतर आरएसएस-भाजपप्रणित विद्यापीठ विकास मंचचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शनिवारी कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांची भेट घेऊन निवेदन दिले आणि डॉ. गजानन सानप यांची बदनामी तत्काळ थांबवा, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा दिला आहे.
डॉ. सानप हे विद्यापीठाच्या विकासासाठी सातत्याने झटत असतात. विद्यापीठाच्या हितासाठी ते पोटतिडकीने भूमिका मांडत असतात, हेच काही मंडळींना अडचणीचे ठरत आहे. म्हणून ही मंडळी त्यांच्या बाबत सहा-सात दिवसांपासून बिनबुडाचे आरोप करून त्यांना सातत्याने बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही अपप्रवृत्ती वेळीच रोखली पाहिजे. आम्ही विद्यापीठ विकास मंचचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे कदापि खपवून घेणार नाही. हे चुकीचे प्रकार थांबले नाही तर आम्ही सर्व व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य व विद्या परिषद सदस्य तसेच अभ्यास मंडळे व विविध प्राधिकरणावर काम करणारे सर्व प्राध्यापक नाईलाजाने रस्त्यावर उतरू आणि आंदोलन करू, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
कुलगुरू कार्यालयावरच आळ
डॉ. सानप यांची बदनामी करणाऱ्या बातम्या कुलगुरू कार्यालयातूनच प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत, असा गंभीर आरोपही या निवदेनात करण्यात आला आहे. आपल्या कार्यालयाशी संबंधित असणारे गोपनीय अहवाल/पत्रे मीडियापर्यंत पोहोचतातच कसे? जे विषय फक्त कुलगुरू कार्यालयालाच माहिती असावेत, ते विषय पत्रकारांपर्यंत माहिती होतात कसे?, असे सवाल या निवेदनात करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे कुलगुरू कार्यालयावर आळ घेणाऱ्या विद्यापीठ विकास मंचच्या कार्यकर्त्यांमध्ये विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील प्राध्यापक व काही अधिकार मंडळांच्या सदस्यांचाही समावेश आहे.
बीडची ‘आका’ संस्कृती विद्यापीठातः डॉ. काळे
दरम्यान, अधिसभा सदस्य डॉ. नरेंद्र काळे यांनी बीडच्या राजकारणातील ‘आका’ संस्कृतीचा विद्यापीठात शिरकाव होऊ पहात असल्याचा गंभीर आरोप केला असून या संस्कृतीला वेळीच पायबंद घालण्याची मागणी केली आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडच्या राजकारणातील ‘आका’ संस्कृतीवरून बरेच वादंग माजले आहे. तीच प्रवृत्ती विद्यापीठातही शिरकाव करू पहात आहे, असे डॉ. काळे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
एका राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्याने २३ जानेवारी रोजी परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. भारती गवळी यांना अरेरावीची व अपमानास्पद भाषा वापरली. याबाबत विद्यापीठातील संघटना व अधिसभा सदस्यांनी त्या व्यवस्थापन परीषद सदस्यावर कारवाई करण्याची मागणी कुलगुरूकडे केली आहे. याच सदस्याने यापूर्वी ही एका प्राध्यापकासोबत ५ जुलै २०२४ रोजी प्रकुलगुरूंच्या दालनात गैरवर्तन केले आहे. त्यावरून व्यवस्थापन परिषदच्या सदस्याने ‘विद्यापीठाच्या कार्यालयीन कामकाजात हस्तक्षेप करू नये’ अशी तंबी राजभवनाने दिली. इतके महान प्रताप करणाऱ्या व्यवस्थापन परीषद सदस्याने आज (शनिवारी) राणा भिमादेवी थाटात त्यांच्यासारख्याच नियुक्त सदस्यांचा भरणा असलेल्या शिष्टमंडळाद्वारे कुलगुरूंना निवेदन दिले आहे. त्याचबरोबर समाजमाध्यमातूनही कम्युनिष्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पत्रकारांवर आगपाखड करत पतीव्रतेचा आव आणला आहे, असे डॉ. काळे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
मुळात कसलेही जनमत पाठीशी नसलेला हा सदस्य राज्यातील सत्तेच्या जोरावर प्रथमतः एका महिलेला दिलेली नियुक्ती रद्द करून या पदावर बसला आहे. गेल्या दोन्ही विद्यापीठ निवडणुकांतून पळ काढलेल्या या व्यक्तीने सत्तेच्या जोरावर नियुक्त झालेल्या अधिसभा सदस्यांचा भरणा असलेल्या शिष्टमंडळामार्फत कुलगुरूंवर दबाव आणण्याचा हा एक ‘संघटित प्रयत्न’ केलेला दिसतो, असा आरोपही काळे यांनी केला आहे.
सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करा
कुलगुरूंच्या उपस्थितीत २३ जानेवारी २०२५ रोजी डॉ.भारती गवळी यांच्या बाबतीत घडलेल्या प्रकाराची व प्रकुलगुरूंच्या दालनातील ५ जुलै २०२४ रोजी घडलेल्या प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज मीडिया व समाजमाध्यमातून प्रदर्शित करा, असे पतीव्रतेचा आव आणणार्या व या सदस्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणार्या विद्यापीठ प्रशासनाला माझे खुले आव्हान आहे. होऊन जाऊ द्या दूध का दूध और पानी का पानी, असेही डॉ. काळे यांनी म्हटले आहे.
विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करणार्या या ‘आका’ संस्कृती ला आम्ही विद्यापीठात थारा देणार नाही. विद्यापीठातील भयमुक्त वातावरण कायम ठेवण्यासाठी या सदस्याविरूध्द सरकार व कुलपतींकडे तक्रार करू, असा इशाराही डॉ. काळे यांनी दिला आहे.


सर माझ्याकडे शिवाजी विदयापीठ कोल्हापूर मधील एक बातमी आहे.. जे कोल्हापूर मध्ये कोणतेही दैनिक लावायला तयार नाहीय….
एका कॉलेज ने विदयापीठकडून सहा. प्राध्यपकांच्या बोगस मान्यता मिळवले आहे…. या संदर्भात बातमी आहे… तुम्ही काय मदत करू शकाल का