
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): परभणीचा कट्टर आंबेडकरी कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशींच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यूची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या तपास अधिकाऱ्यांच्या कामकाजावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली असून तपास अधिकाऱ्यांनी या संदर्भात कोणताही निर्णय घेऊ नये किंवा कुठलाही अहवाल सादर करू नये, असे आदेशही दिले आहेत.
सोमनाथ सूर्यवंशींच्या आई विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी यांनी ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी (२९ एप्रिल) दुसरी सुनावणी झाली. या सुनावणीत राज्य सरकारने ज्या तपास अधिकाऱ्यांची नियुक्ती केली, त्या तपास अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत गंभीर चर्चा करण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालायाने राज्य सरकारने नियुक्त केलेल्या चौकशीला स्थगिती दिली.
राज्य सरकारने नियुक्त केलेल्या तपास अधिकाऱ्यांनी २८ आरोपींना नोटिसा पाठवून त्यांनी चौकशीत काय बोलले पाहिजे, हे नोटिशीतच नमूद केले होते. त्यामुळे ही चौकशी निष्पक्ष नाही, असा युक्तिवाद करत ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी तपास अधिकाऱ्यांच्या कामकाजावर स्थगिती आणावी, अशी मागणी सुनावणीदरम्यान केली.
राज्य सरकारने नियुक्त केलेली चौकशी फॉरेन्सिक पोस्टमार्टेम अहवालाच्या विरोधी दिशेने चालली आहे. सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू श्वाच्छोश्वासाच्या समस्येमुळे समस्येमुळे झाल्याच्या दिशेने ही चौकशी नेली जात असल्याचा युक्तिवादही ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आणि चौकशीतील दिशाभूल आणि पूर्वग्रहदूषित तपास न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने ऍड. प्रकाश आंबेडकर यांची मागणी मान्य करत तपास अधिकाऱ्यांच्या कामकाजाला स्थगिती दिली आणि त्यांनी कोणताही निर्णय घेऊ नये किंवा कुठलाही अहवाल सादर करू नये, असे आदेश दिले.
या याचिकेवरील पुढील सुनावणी ८ मे रोजी होणार असून या सुनावणीत विशेष तपास पथकाची स्थापना (एसआयटी) आणि न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्यानंतर चौकशी अहवाल आल्यावर पुढे काय निर्णय घ्यावा याबाबत कायद्यात तरतूदच नसल्याच्या मुद्यावर चर्चा होणार असल्याची माहिती ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
सोमनाथची आई म्हणते, आमचा बाळासाहेबांवर विश्वास!
मंगळवारी औरंगाबाद खंडपीठातील सुनावणीवेळी ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतच सोमनाथ सूर्यवंशीच्या आई विजयाबाई सूर्यवंशीही हजर होत्या. आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. १३५ दिवस झाले सरकारने तर आम्हाला न्याय दिला नाही पण बाळासाहेब आंबेडकर आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी लढत आहेत. त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. मला कायद्यातील काही कळत नसले तरी बाळासाहेब आंबेडकरांना कायद्यातील सगळे कळते. त्यामुळे ते जे काही करत आहेत, ते योग्यच आहे, असे विजयाबाई यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
