
मुंबईः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने आपल्या १०० दिवसांच्या कामाचे ‘प्रगती पुस्तक’ आज महाराष्ट्र दिनी जाहीर केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनीच महायुती सरकारच्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्याचा निकाल जाहीर केला. राज्य सरकारच्या ४८ विभागांपैकी आदिती तटकरे यांच्याकडे असलेल्या महिला व बालविकास विभागाने ८० टक्के गुण मिळवून बाजी मारली. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेला सामान्य प्रशासन विभाग, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास विभागाची कामगिरी ढिसाळ राहिली आहे. या प्रगती पुस्तकात या तीन विभागांना ३५ टक्क्यांहूनही कमी गुण मिळाले आहेत.
राज्यात महायुतीचे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला शिस्तीचे धडे मिळावेत या उद्देशाने ५ जानेवारी २०२५ रोजी सरकारच्या ४८ विभागांना १०० दिवसांसाठीचा ७ कलमी कृती आराखडा कार्यक्रम दिला होता. त्या कृती आराखड्याचे प्रगती पुस्तक आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतःच जाहीर केले.
‘राज्यात नवीन महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर शासनाच्या सर्व ४८ विभागांनी १०० दिवसांचा धोरणात्मक बाबींचा कार्यक्रम हाती घेऊन महत्वाची नवीन धोरणे, दूरगामी निर्णय व लोकाभिमुख उपक्रमांची आखणी सुरू केली. गेल्या १०० दिवसांत या सर्व विभागांनी निश्चित केलेल्या ९०२ धोरणात्मक उद्दिष्टांपैकी ७०६ उद्दिष्टे (उद्दिष्टपूर्तीची टक्केवारी ७८%) पूर्णतः साध्य केली आहेत. उर्वरित १९६ उद्दिष्टे पूर्ण होईपर्यंत संबंधित विभाग आपले काम चालूच ठेवतील. ४८ विभागांपैकी १२ विभागांनी १०० टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे. १८ विभागांनी ८० टक्क्यांपेक्षा जास्त उद्दिष्टे साध्य केली आहेत,’ अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा निकाल जाहीर करताना दिली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलेल्या या प्रगती पुस्तकात आदिती तटकरे यांचा महिला व बालविकास विभाग १०० पैकी ८० टक्के गुण मिळवून अव्वल स्थानी राहिला आहे. ७७.९५ टक्के गुण मिळवून सार्वजनिक बांधकाम विभाग दुसऱ्या स्थानी आहे. माणिकराव कोकाटे यांचा कृषी विभाग ६६.१५ टक्के गुण मिळवून तिसऱ्या स्थानी आहे. ६३.८५ टक्के गुण मिळवून चौथ्या स्थानी तर ६१.२८ टक्के गुणांसह परिवहन व बंदरे विभाग पाचव्या स्थानी राहिला आहे. म्हणजेच या प्रगती पुस्तकात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी बाजी मारली आहे.
शंभर दिवसांच्या कृती आराखड्याच्या कामगिरीच्या या स्पर्धेत सामान्य प्रशासन विभाग, नगरविकास विभाग आणि अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मात्र नापास झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या सामान्य प्रशासन विभागाला १०० पैकी केवळ २४ टक्के गुण मिळाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असलेल्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाला ३३ टक्के गुण मिळाले आहेत. (आधी हे खाते धनंजय मुंडे यांच्याकडे होते. मस्साजोगचे सरपंच देशमुख हत्याप्रकरणात त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यामुळे हे खाते अजितदादांकडे आले आहे.) तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास विभागाला अवघे ३४ टक्के गुण मिळाले आहेत. म्हणजेच प्रगती पुस्तकात या तिन्ही विभागाची कामगिरी ढिसाळ राहिलेली आहे.
या शंभर दिवसांच्या कृती आराखड्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या शासकीय कार्यालयांचे प्रगती पुस्तकही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. ते असेः
सर्वोत्तम आयुक्त/संचालक
राज्याचे तंत्र शिक्षण संचालक ७७.४३ टक्के गुणांसह पहिल्या क्रमांकावर, ७२.८६ टक्के गुण मिळवून जमाबंदी आयुक्त दुसऱ्या स्थानावर, ७२.५७ टक्के गुण मिळवून आदिवासी विकास आयुक्त तिसऱ्या स्थानावर, ७०.१८ टक्के गुणांसह महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चौथ्या स्थानावर तर ६९.४३ टक्के गुण मिळवून वैद्यकीय शिक्षण आयुक्त पाचव्या स्थानावर राहिले आहेत.
सर्वोत्तम जिल्हाधिकारी
चंद्रपूरचे जिल्हाधिकारी ८४.२९ टक्के गुण मिळवून पहिल्या स्थानावर, ८१.१४ टक्के गुण मिळवून कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दुसऱ्या स्थानावर, ८०.८६ टक्के गुणांसह जळगावचे जिल्हाधिकारी तिसऱ्या स्थानावर, ७८.८६ टक्के गुण मिळवून अकोल्याचे जिल्हाधिकारी चौथ्या स्थानावर तर ६६.८६ टक्के गुण मिळवून नांदेडचे जिल्हाधिकारी पाचव्या स्थानावर आहेत.
सर्वोत्त पोलिस अधीक्षक
पालघरचे पोलिस अधीक्षक ९०.२९ टक्के गुण मिळवून पहिल्या स्थानावर, ८० टक्के गुण मिळवून गडचिरोली व नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक दुसऱ्या स्थानावर, ६५.७१ टक्के गुण मिळवून जळगावचे पोलिस अधीक्षक तिसऱ्या स्थानावर तर ६४ टक्के गुण मिळवून सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक चौथ्या स्थानावर आहेत.
सर्वोत्तम जिल्हा परिषद सीईओ
ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ९२ टक्के गुण मिळवून पहिल्या स्थानावर, ७९.४३ टक्के गुण मिळवून नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दुसऱ्या स्थानावर, ७५.४३ टक्के गुणांसह नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तिसऱ्या स्थानावर, ७२ टक्के गुण मिळवून वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चौथ्या स्थानावर आहेत.
सर्वोत्तम मनपा आयुक्त
उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त ८६.२९ टक्के गुण मिळवून पहिल्या स्थानावर, ८५.७१ टक्के गुण मिळवून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त दुसऱ्या स्थानावर तर ७९.४३ टक्के गुण मिळवून पनवेल आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर राहिले आहेत.
सर्वोत्तम पोलिस आयुक्त
मीरा भाईंदरच्या पोलिस आयुक्तांनी ८४.५७ टक्के गुण मिळवून पहिला क्रमांक पटकावला आहे. ठाण्याच्या पोलिस आयुक्तांनी ७६.५७ टक्के गुण मिळवून दुसरा तर मुंबई रेल्वेच्या पोलिस आयुक्तांनी ७३.१४ टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला आहे.
सर्वोत्तम विभागीय आयुक्त
कोकणचे विभागीय आयुक्त ७५.४३ टक्के गुण मिळवून पहिल्या, नाशिक आणि नागपूरचे विभागीय आयुक्त ६२.२९ टक्के गुण मिळवून संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत.
सर्वोत्तम पोलिस महानिरीक्षक
कोकण परीक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक ७८.८६ टक्के गुण मिळवून पहिल्या क्रमांकावर तर नांदेड परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक ६१.१४ टक्के गुण मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत.
