औरंगाबादः वाढदिवसाच्या पार्टीचे थकित बील मागणाऱ्या केटरिंग व्यावसायिकाला शिंदे गटातील आमदार संजय शिरसाठ यांचे पुत्र सिद्धांत शिरसाठ यांनी हातपाय तोडण्याची धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ‘माझ्या डोक्याला ताप देऊ नकोस, साहेबांनी दिले तेवढेच पैसे घे नाहीतर हातपाय तोडेन’ अशी धमकी सिद्धांत शिरसाठ यांनी केटरिंग व्यावसायिकाला दिल्याचे या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे. या व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल आ. शिरसाठ किंवा सिद्धांत शिरसाठ यांनी अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
आमदार संजय शिरसाठ यांनी २०१७ मध्ये आपल्या पुत्राच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी केटरिंग व्यावसायिक त्रिशरण गायकवाड यांना ऑर्डर दिली होती. एकूण साडेचार लाख रुपयांची ही ऑर्डर होती. त्यातील काही रक्कम आमदार शिरसाठ यांनी या केटरिंग व्यावसायिकाला देऊन टाकली. मात्र उरलेल्या पैशासाठी त्यांनी मला त्रास दिला. मी कित्येक फोन केल्यानंतर काहीतरी डिस्काऊंट कर असे ते म्हणाले. म्हणून मी त्यांना ७५ हजार रुपयांची सूट दिली. त्यानंतर शिरसाठ यांनी ४० हजार रुपये देण्याचे कबूल केले, असे त्रिशरण गायकवाड यांचे म्हणणे आहे.
जेव्हा मी पैसे आणायला त्यांच्या कार्यालयात गेलो तर त्यांनी मला केवळ २० हजार रुपयेच दिले. त्यानंतर मी आमदार संजय शिरसाठ यांचे पुत्र सिद्धांत शिरसाठ यांना फोन केला असता, ‘साहेबांनी दिले तेवढेच पैसे घे… आता पैसे मागू नको… तुला तर ४० हजार रुपये पाहिजे होते तर मग आम्ही दिलेले २० हजार रुपये तू का घेतले? माझ्या डोक्याला ताप देऊ नकोस, साहेबांनी दिले तेवढेच पैसे घे. तू जर असेच पैसे मागत राहिलास तर तुझे हातपाय तोडेन,’ अशी उघड धमकीच सिद्धांत शिरसाठ यांनी केटरिंग व्यावसायिक त्रिशरण गायकवाड यांना दिली आहे.
या प्रकरणी अद्याप तरी पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नाही किंवा आमदार संजय शिरसाठ आणि त्यांचे पुत्र सिद्धांत शिरसाठ यांच्यापैकी कोणीही याबद्दल स्पष्टीकरण दिलेले नाही. ते काय स्पष्टीकरण देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.