तीर्थक्षेत्र पंढरपूर कॉरिडॉरचा वादः मुख्यमंत्री म्हणाले, सर्वांना विश्वासात घेऊनच विकास आराखडा तयार करणार


नागपूर: श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो तर दररोज मोठ्या प्रमाणात भाविक येतात. पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना व स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात यादृष्टीने प्रस्तावित तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत नव्याने कामे समाविष्ट करण्यात आली आहेत. या विकास कामात ऐतिहासिक व पुरातन वास्तूचे जतन करुन कामे करण्यात येणार आहेत. तसेच लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक, व्यापारी, वारकऱ्यांना विश्वासात घेऊनच तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. याबाबत कोणावरही अन्याय होणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली.

आमदार अमोल मिटकरी यांनी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा कॉरीडोरबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा हा राज्य आणि देशाच्या दृष्टीने महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा आराखडा सर्वंकष होण्यासाठी वाराणसी आणि तिरुपती या देवस्थानाला सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली आहे.

त्याच धर्तीवर मंदिरात येणाऱ्या वारकरी भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, श्रींचे दर्शन सुखकर व्हावे यासाठी मंदिरातील मूळ वास्तूचे व वारकरी सांप्रदायाच्या प्रथा परंपरेचे जतन करून पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार मंदिर व परिसराचा विकास करण्यात येणार आहे. यासाठी वाराणसी आणि तिरुपतीच्या धर्तीवर स्वच्छता, चांगले रस्ते, शौचालये, हॉस्पिटल आणि चंद्रभागा घाट याकडे लक्ष देऊन कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात येणार आहे, असे शिंदे म्हणाले.

शंकांचे निरस्सरन करणारः छोटे व्यापारी, स्थानिक रहिवासी यांच्या शकांचे निरस्सन करून त्यांना विश्वासात घेऊन सर्वांच्या सहकार्याने योग्य मोबदला देण्यात येणार आहे. शिवाय त्यांचे योग्य पुनर्वसन करण्यात येईल. पंढरपूर तीर्थक्षेत्राचा बहुआयामी व सर्वंकष विकास करण्यासाठी कॉरीडॉरचा नियोजित प्रारूप विकास आराखडा सामान्य जनतेच्या प्रतिक्रिया, आकांक्षा, अपेक्षा जाणून घेण्यासाठी जाहीर करण्यात आला आहे. प्राप्त झालेल्या सर्व हरकती, सूचना यांचा विचार करून कोणावरही अन्याय होणार नसल्याची ग्वाही शिंदे यांनी दिली.

 होळकरवाडा, शिंदेवाड्याचे जतन करणारः तीर्थक्षेत्र आराखड्यामध्ये नदी स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, पार्कींग, पाणी आदी पायाभूत  सुविधेची  कामे प्राधान्याने करण्यात येणार आहेत. ही कामे करताना वारकरी परंपरेला व संस्कृतीला धक्का पोहोचणार नाही याची काळजी घेतली जाईल. होळकरवाडा, शिंदेवाडा याबाबत पुरातत्व विभागाच्या सूचनांनुसार जतन करून कॉरिडॉर केला जाईल, असे यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

पुढील २५ वर्षानंतर होणारी गर्दी व वाहतूक व्यवस्था विचारात घेऊन तीर्थक्षेत्र विकासाचा प्रारुप आराखडा करण्यात आला आहे. ९६४ सूचना/हरकती प्राप्त झाल्या असून यात ३६६ सूचना रस्ता रुंदीकरण व मोबदला याबाबत आहेत, असेही सामंत यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सचिन अहिर, शशिकांत शिंदे, प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!